EPFO PF Interest Credit Marathi News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आर्थिक वर्षासाठी निश्चित केलेले ८.२५% दराने पीएफचे व्याज खातेधारकांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तुम्ही घरबसल्या मेंबर पोर्टल, उमंग ॲप किंवा मिस्ड कॉलद्वारे पीएफची रक्कम तपासू शकता.

ईपीएफओने आर्थिक वर्षासाठी ठरवलेले ८.२५% दराने पीएफचे व्याज खातेधारकांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठा निधी जमा होणार आहे.

पीएफ खातेधारकांची संख्या देशात खूप मोठी आहे. त्यामुळे सर्वांच्या खात्यात एकाच वेळी पैसे दिसणार नाहीत. प्रत्येकाच्या पासबुकमध्ये व्याजाची रक्कम एक-एक करून अपडेट केली जात आहे.

तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे आले की नाही, हे तपासण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पीएफ ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या डिजिटल पद्धतीने हे सर्व चेक करू शकता.

व्याज तपासण्यासाठी सर्वात आधी ईपीएफओच्या (EPFO) अधिकृत ‘मेंबर पासबुक’ वेबसाइटला भेट द्या. तिथे तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. त्यानंतर तुमची मेंबर आयडी (Member ID) निवडून तुम्हाला एकूण शिल्लक आणि व्याजाचा तपशील पाहता येईल.

जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल, तर तुम्ही फक्त एक मिस्ड कॉल देऊनही बॅलेन्स तपासू शकता. तुमच्या पीएफ खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. काही वेळातच तुमच्या फोनवर पीएफ बॅलेन्सचा मेसेज येईल.

तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ‘उमंग’ ॲप डाउनलोड करूनही पीएफचे पैसे चेक करू शकता. ॲप उघडून ‘EPFO Service’ निवडा, त्यानंतर ‘View Passbook’ वर क्लिक करा आणि तुमचा UAN नंबर वापरून लॉगिन करून पासबुक डाउनलोड करा.

ईपीएफओने आपल्या सॉफ्टवेअर आणि डेटाबेसचे मोठे अपग्रेडेशन (सिस्टम अपडेट) पूर्ण केले आहे. यामुळे आता ईपीएफओचे ‘मेंबर पोर्टल’ नवीन डिझाइन आणि अधिक क्षमतेसह पुन्हा व्यवस्थित सुरू झाले आहे.

सिस्टम अपग्रेडचे काम नुकतेच पूर्ण झाल्यामुळे, पुढील दोन आठवड्यांपर्यंत पीएफ क्लेम (पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करणे) प्रक्रियेला थोडा उशीर होऊ शकतो.

क्लेम प्रक्रियेला उशीर होत असल्यामुळे, ईपीएफओने सर्व सदस्यांना विनंती केली आहे की, त्यांनी पोर्टलवर वारंवार नवीन अर्ज सबमिट करू नयेत. नवीन सिस्टममुळे येत्या काळात सेवा अधिक वेगवान आणि सुटसुटीत होणार आहे.

सिस्टिम मजबूत करण्यासाठी काही सेवा आता उमंग ॲपवर शिफ्ट करण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, UAN ॲक्टिव्हेशन करण्यासाठी आता उमंग ॲपवर आधार कार्ड आधारित ‘फेस ऑथेंटिकेशन’ वापरावे लागेल. तसेच, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मिळणारा पीएफ क्लेम यासारख्या महत्त्वाच्या सेवा मुख्य पोर्टलवरच उपलब्ध राहतील.
