नवी दिल्ली / मुंबई: देशातील ६ कोटींहून अधिक नोकरदारांच्या हक्काच्या पैशांचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’च्या डिजिटल कारभाराचा बोजवारा उडाला आहे. गेल्या सलग ७ दिवसांपासून (२६ जूनपासून) ईपीएफओचे मुख्य पोर्टल, एम्प्लॉयर पोर्टल आणि ‘उमंग’ ॲपवरील सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.

या अभूतपूर्व तांत्रिक खोळंब्यामुळे देशभरातील लाखो कर्मचाऱ्यांना आपल्या खात्यातून तातडीने पैसे काढणे, नवीन क्लेम फाईल करणे, जुने क्लेम ट्रॅक करणे किंवा साधे पीएफ पासबुक डाउनलोड करणेही अशक्य झाले आहे. मेडिकल इमर्जन्सी किंवा घराच्या खरेदीसाठी ज्यांना पैशांची अत्यंत निकड आहे, अशा नोकरदारांची यामुळे मोठी कोंडी झाली असून सोशल मीडियावर संतापाचा लाट उसळली आहे.

नियोजित अपग्रेडच्या नावाखाली दोनदा ‘डेडलाईन’ हुकली!

वास्तविक पाहता, हा कोणताही सायबर हल्ला किंवा तांत्रिक बिघाड नाही. ‘EPFO 3.0’ या नव्या डिजिटल प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी, डेटाबेस एकत्रीकरण आणि सॉफ्टवेअर अपग्रेड करण्यासाठी ईपीएफओने २५ जूनच्या मध्यरात्रीपासून (२६ जून ००:०० वाजल्यापासून) सेवा तात्पुरत्या बंद केल्या होत्या. सुरुवातीला हा मेंटेनन्स २६ ते २८ जून दरम्यान होणार होता आणि सेवा २९ जूनला सुरू होणार होत्या. काम पूर्ण न झाल्याने ही मुदत वाढवून १ जुलै करण्यात आली.

१ जुलैपासून सेवा पूर्ववत होणे अपेक्षित असताना, ईपीएफओने संकेतस्थळावर नवीन नोटीस लावत ही मुदत ३ जुलै २०२६ पर्यंत वाढवली आहे. म्हणजेच, सलग ७ ते ८ दिवस नोकरदारांना आपल्याच पैशांसाठी डिजिटल वनवासाला सामोरे जावे लागत आहे.

कोणत्या सेवांवर बसलाय थेट फटका?

१. पीएफ क्लेम आणि विथड्रॉवल: वैद्यकीय उपचार, शिक्षण किंवा इतर तातडीच्या कामांसाठी नवीन क्लेम सबमिट करता येत नाहीयेत.
२. ई-पासबुक डाऊनलोड: ग्राहकांना आपल्या खात्यात किती पैसे जमा आहेत, हे देखील तपासता येत नाहीये.
३. कंपन्यांना ईसीआर फाईल करण्यात अडचण: कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांचे मासिक पीएफ चालान भरता येत नसल्याने कंपन्यांचे व्यवस्थापनही अडचणीत आले आहे.
४. नव्या कर्मचाऱ्यांचे यूएएन लिंकिंग: नवीन नोकरीत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचे यूएएन नंबर आधारशी लिंक करण्याचे काम पूर्णपणे थांबले आहे.

‘नवा स्कीम, जुनाच त्रास’— नोकरदारांमध्ये तीव्र संताप

केंद्र सरकारने नुकतीच जुनी १९५२ ची चौकट बदलून ‘ईपीएफ स्कीम २०२६’ ही नवीन, डिजिटल-फर्स्ट आणि सुटसुटीत नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये आजारपण, शिक्षण आणि लग्नासाठी तातडीने पैसे काढण्याचे नियम सोपे करण्यात आले आहेत. मात्र, एकीकडे डिजिटल सुधारणांचे दावे केले जात असताना, दुसरीकडे मुख्य पोर्टलच आठवडाभर बंद राहिल्याने “नवे नियम काय कामाचे?” असा उद्विग्न सवाल पीएफ धारक करत आहेत.

“नियोजित मेंटेनन्सची वेळ कधीच संपली आहे, तरीही पोर्टल सुरू झालेले नाही. लाखो लोकांचे पैसे अडकले आहेत, ईपीएफओने याचे स्पष्टीकरण देऊन तात्काळ सेवा सुरू कराव्यात!” — एक्स (X) वर संतापलेला एक पीएफ धारक

पर्यायी मार्ग काय: ऑनलाईन सेवा बंद असताना बॅलन्स कसा तपासायचा?

वेबसाईट आणि उमंग ॲप बंद असले तरी, जर तुमचा ‘यूएएन’ क्रमांक आधार, पॅन आणि बँक खात्याशी लिंक असेल, तर तुम्ही खालील ऑफलाईन पर्यायांद्वारे तुमचा पीएफ बॅलन्स तपासू शकता:

मिस्ड कॉलद्वारे: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या. काही वेळातच एसएमएसद्वारे बॅलन्स समजेल.
एसएमएस (SMS) द्वारे: तुमच्या मोबाईलवरून EPFOHO UAN MAR (मराठीत माहितीसाठी) किंवा EPFOHO UAN ENG टाईप करून 7738299899 या क्रमांकावर मेसेज पाठवा. शिवाय कार्यलयात जाऊन देखील निधी प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज करून निधी मिळवता येणार आहे.

ईपीएफओच्या आयटी (IT) विभागाच्या या संथ कारभारामुळे नोकरदार वर्गाचा संयम सुटत चालला आहे. आता नव्या नोटीसनुसार ३ जुलै रोजी तरी हे महापोर्टल पूर्ण कार्यक्षमतेने सुरू होणार की नोकरदारांची प्रतीक्षा आणखी ताणली जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.