Elon Musk X Platform Misleading Blue Tick Issue: युरोपियन युनियनच्या वादग्रस्त कंटेंट-मॉडरेशन कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल एलॉन मस्क यांच्या एक्स या सोशल नेटवर्कला १४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. युरोपियन युनियनने लादलेला हा दंड मस्क यांच्या ४६७ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीचा एक छोटासा भाग असला तरी, यामुळे युरोपियन युनियन आणि अमेरिकेमध्ये भाषण स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञान नियमनावरून तणाव वाढण्याची शक्यता आहे.
काय आहे ब्लू टीकचा मुद्दा?
डिजिटल सेवा कायद्यांतर्गत पहिल्यांदाच दंड आकारताना, युरोपियन कमिशनने असा निष्कर्ष काढला की एक्सच्या पेड-फॉर ब्लू टिक चिन्हाने युजर्सची दिशाभूल केली आहे. एक्सने संशोधकांना डेटा देण्यास टाळाटाळ केली आणि जाहिरात-संग्रहाचे व्यवस्थापन करण्यास ते अपयशी ठरले, असे शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे.
एक्सला या त्रुटी दूर करण्यासाठी आणि यावर उपाय काढण्यासाठी ६० दिवस आणि बदल अंमलात आणण्यासाठी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अन्यथा त्यांना अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो, असे युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्याने सांगितले.
ट्रम्प यांची टीका
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या अनेक महिन्यांपासून युरोपियन युनियनच्या कठोर दंडात्मक तरतुदींवर सातत्याने टीका करत आहेत. त्यांनी युरोपियन युनियन अमेरिकन टेक कंपन्यांना लक्ष्य करत असल्याचे आरोपही केले होते. तुलनेने कमी दंड असूनही, यामुळे डिजिटल सार्वभौमत्वावर आणि इंटरनेट युगात अभिव्यक्ती स्वातंत्र्य व गोपनीयता यासारख्या मूलभूत अधिकारांबाबतच्या चर्चेला तोंड फुटले आहे.
अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांची पोस्ट चर्चेत
या प्रकरणावर टीका करताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ म्हणाले की, “युरोपियन कमिशनचा १४० दशलक्ष डॉलर्सचा दंड हा केवळ एक्सवरील हल्ला नाही, तर तो सर्व अमेरिकन टेक प्लॅटफॉर्मवर आणि अमेरिकन लोकांवर परदेशी सरकारांनी केलेला हल्ला आहे. अमेरिकन लोकांना ऑनलाइन सेन्सॉर करण्याचे दिवस आता संपले आहेत.”
या प्रकरणाचे राजकीय महत्त्व
या प्रकरणाची चौकशी डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाली होती. पुढे २०२४ मध्ये एलॉन मस्क अमेरिकन राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या बाजूने प्रचारात उतरले होते. ट्रम्प विजयी झाल्यानंतर सुरुवातीला अनेक महिने ते अमेरिकेच्या सरकारी कार्यक्षमता विभागाचे प्रमुख म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार होते. त्यामुळे या प्रकरणाला अधिक राजकीय महत्त्व आले आहे.
इतर अमेरिकन कंपन्यांवरही दंड
युरोपियन युनियन एक्ससह अनेक प्रमुख अमेरिकन टेक कंपन्यांची देखील डिजिटल सेवा कायद्यांतर्गत चौकशी करत आहे, ज्याचा उद्देश कंपन्यांना त्यांच्या एकाधिकारशाहीचा गैरवापर करण्यापासून रोखणे हा आहे.
युरोपियन युनियनने अलीकडेच त्यांच्या डिजिटल अँटीट्रस्ट नियमांनुसार अॅपल आणि मेटाला अनुक्रमे ५०० दशलक्ष युरो आणि २०० दशलक्ष युरोंचा दंड ठोठावला आहे.
