Gold Silver Price Drop Commerzbank Outlook : या वर्षीच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किमतीने ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला होता. सोने १ लाख ८० हजार रुपये तोळा, तर चांदी प्रतिकिलो तब्बल ४ लाख रुपयांच्या भावावर विकली गेली. मात्र, ऑक्टोबर महिन्यात या तेजीला मोठा ब्रेक लागला असून मौल्यवान धातू मोठ्या प्रमाणात कोसळले आहे. दरम्यान, सोने-चांदी खरेदी करण्याची ही योग्य संधी आहे का? अशा प्रश्न सध्या गुंतवणूकदार आणि खरेदीदारांच्या मनात येत आहे. जर्मनीची दिग्गज बँक कॉमर्जबँकेच्या मते सोन्याच्या दरात झालेली ही घसरण गरजेपेक्षा खूपच जास्त झाली आहे. विशेष म्हणजे, सोन्याच्या किमतींना वर नेणारे मूलभूत घटक अद्यापही कायम असून, दीर्घकाळात सोन्यात पुन्हा मोठी तेजी पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ऑक्टोबर महिना ठरला सोन्यासाठी ‘ब्लॅक मंथ’
ऑक्टोबर महिना सोन्याच्या इतिहासात अत्यंत खराब राहिला. या महिन्यात सोन्याच्या किमतीत तब्बल ७ टक्क्यांपर्यंतची घसरण नोंदवली गेली. गेल्या शुक्रवारी तर सोन्यात तब्बल ४ टक्क्यांची मोठी पडझड पाहायला मिळाली होती. या काळात सोन्याचे भाव घसरून ३,८७० डॉलर प्रति औंस या पातळीवर पोहोचले होते, जो गेल्या एका वर्षातील सर्वात नीचांकी स्तर होता. या निचांकी पातळीवरून सोन्याने काहीशी सावरत पुन्हा भरारी घेतली असून सध्या भाव ३,९०० डॉलर प्रति औंसच्या वर स्थिर आहेत.
सोन्याच्या घसरणीमागे नेमकी कोणती कारणे?
- कॉमर्जबँकचे कमोडिटी विश्लेषक कार्स्टन फ्रिट्श यांनी आपल्या ताज्या अहवालात सोन्याच्या घसरणीची कारणे स्पष्ट केली आहेत. साधारणपणे महागाई आणि आर्थिक संकटात सोन्याकडे संरक्षण कवच म्हणून पाहिले जाते. मात्र, यावेळी सोन्याशी थेट संबंध नसलेल्या घटकांनी किमतीवर परिणाम केल्याचे दिसत आहे.
- कच्च्या तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्याने महागाई पुन्हा भडकण्याची चिंता वाढली. साधारणपणे सोने हे महागाईविरुद्धचे कवच मानले जाते. परंतु, महागड्या तेलामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरे वेगाने वाढवेल या शक्यतेने सोन्याच्या अडचणी वाढवल्या.
- फेडरल रिझर्व्हने यापूर्वी व्याजदर स्थिर ठेवल्यामुळे अमेरिकन सरकारी बाँड्सवरील रिटर्न खाली आले होते. नियमानुसार, बाँड रिटर्न घटल्यास सोन्याचे आकर्षण वाढायला हवे होते. कारण सोन्यावर कोणतेही व्याज मिळत नाही. मात्र, या वेळी बाँड रिटर्न घसरूनही सोन्याच्या किमतीत मोठी विक्री थांबली नाही.
- तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या कमकुवत निकालांमुळे मागील आठवड्यात टेक शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. परिणामी, शेअर बाजारातील नुकसान भरून काढण्यासाठी आणि ‘मार्जिन कॉल’ची पूर्तता करण्यासाठी अनेक मोठ्या गुंतवणूकदारांनी सोन्यातील आपली हिस्सेदारी नाईलाजाने विकली. या विक्रीचा सोन्यावर ताण आला.
अमेरिकेचे वाढते कर्ज देणार सोन्याला आधार
अल्पकालीन चढ-उताऱ्यांनंतरही कॉमर्जबँकने सोन्याच्या दीर्घकालीन भविष्याबद्दल कमालीचा आशावाद व्यक्त केला आहे. अमेरिकेची बिघडलेली आर्थिक स्थिती आणि वाढणारा सरकारी कर्जाचा डोंगर येत्या काळात सोन्याच्या किमतींना सर्वात मोठा आधार देणार असल्याचे बँकेचे म्हणणे आहे.
गुंतवणूकदारांसाठी काय आहे सल्ला?
तज्ज्ञांच्या मते, सोन्यातील ही तात्कालिक मंदी नसताना निर्माण झालेली भीती आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी सध्याच्या भावात सोने खरेदी करणे ही एक सुवर्णसंधी ठरू शकते.
आज सोने-चांदीचा भाव काय?
बुलियन वेबसाईटनुसार, आज बुधवार ४ नोव्हेंबर रोजी १० ग्रॅम शुद्ध सोन्याच्या किमतीत ६९० रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेटचा भाव १ लाख ४० हजार ५८० रुपये झाला आहे, तर चांदीच्या किमतीतही ८९० रुपयांची वाढ झाल्याने प्रतिकिलोचा दर १ लाख ८१ हजार ३७० रुपये झाला आहे.
