HDFC Bank Safety RBI : देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘एचडीएफसी बँक’मध्ये गेल्या काही महिन्यांत लागोपाठ घडलेल्या वादग्रस्त घडामोडींमुळे सर्वसामान्य खातेदार आणि गुंतवणूकदारांच्या मनात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेच्या अर्धवेळ अध्यक्षांचा अचानक झालेला राजीनामा, एमएसआरडीसीला (MSRDC) दिलेला ४५ कोटींचा निधी आणि त्यानंतर आता बँकेच्या थेट सीईओ (CEO) आणि सीएफओ (CFO) यांना झालेला दंड, यांमुळे बँकेच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे. या सर्व घडामोडींनंतर एचडीएफसी बँकेत आपले पैसे सुरक्षित आहेत का? असा थेट प्रश्न सामान्य ग्राहकांकडून विचारला जात आहे.

गेल्या ५ महिन्यांत एचडीएफसी बँकेत नक्की काय घडले?

  • अर्ध-वेळ अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा: मार्च २०२६.
    बँकेचे अर्ध-वेळ अध्यक्ष अतनु चक्रवर्ती यांनी आपल्या पदाचा अचानक राजीनामा दिला. पद सोडताना बँकेचे काही व्यवहार आणि निर्णय आपल्या ‘सद्सद्विवेकबुद्धीस पटणारे नाहीत’ असे जाहीर वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
  • ४५ कोटींच्या ‘मार्केटिंग’ खर्चाचा वाद समोर: मे २०२६.
    बँकेने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास (MSRDC) ४५ कोटी रुपये दिल्याचे उघडकीस आले. ही रक्कम बँकेच्या पुस्तकात ‘मार्केटिंग खर्च’ म्हणून दाखवण्यात आल्याने आक्षेप घेण्यात आला. या प्रकरणाचा थेट संबंध माजी अध्यक्ष चक्रवर्ती यांच्या राजीनाम्याशी जोडला गेला.
  • सीईओ आणि सीएफओला प्रत्येकी १ लाखाचा दंड: जुलै २०२६ (ताजी घडामोड).
    बँकेच्या व्यवस्थापनानेच अंतर्गत कारवाई करत बँकेचे व्यवस्थापकीय संचालक (MD), मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) या तिघांना प्रत्येकी १ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून त्यांच्या कृत्याबद्दल लेखी इशारा दिला आहे.

HDFC च्या गैरकारभारावर तज्ज्ञांचे मत काय?

“एचडीएफसी बँकेचा गैरकारभार समोर आल्यानंतर आरबीआयने स्पष्ट केले आहे की बँकेच्या स्थिरतेला कोणताही धोका नाही आणि ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. मात्र, सार्वजनिक क्षेत्रातील (सरकारी) बँकांमध्ये सरकारचा थेट सहभाग असल्याने जी नैसर्गिक सुरक्षितता असते, तशी पूर्ण सुरक्षितता कोणत्याही खासगी बँकेत नसते, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.” देविदास तुळजापूरकर, चेअरमन, बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग रिसर्च अकादमी (माजी संचालक, बँक ऑफ महाराष्ट्र).

HDFC मध्ये ग्राहकांचे पैसे कितपत सुरक्षित?

बँकेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले असले, तरी सर्वसामान्य ग्राहकांनी आणि ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेला ‘डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक’ म्हणून घोषित केले आहे. या बँकांना टू बिग टू फेल मानले जाते. म्हणजेच, या बँकांचे अपयश संपूर्ण देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडवू शकते. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि सरकार अशा बँकांवर अत्यंत कडक आणि विशेष लक्ष ठेवून असते. उद्या कोणतीही तांत्रिक गडबड झाल्यास सरकार व आरबीआय स्वतः मध्यस्थी करून या बँकांना संरक्षण पुरवते.

एचडीएफसी बँकेच्या शेअरवर परिणाम

या सर्व घडामोडींचा एचडीएफसी बँकेच्या शेअरवर देखील परिणाम झाला आहे. गेल्या ६ महिन्यात शेअर तब्बल १९.५५ टक्के इतका आपटला आहे. महिन्याचा विचार केला तर शेअर ६.४६ टक्के इतकी घसरण झाली असून आठवड्यात १.५७ टक्के कोसळला आहे. आज शेअरमध्ये २ टक्के वाढ झाली आहे. सध्या बँकेचा शेअर ७४८ रुपयांवर व्यवहार करत आहे.

निष्कर्ष
एचडीएफसी बँकेतील सध्याच्या प्रशासकीय कारभाराची चौकशी आणि तपास सुरू आहे. मात्र, रिझर्व्ह बँकेचे कडक नियंत्रण आणि ‘डोमेस्टिक सिस्टिमॅटिकली इम्पॉर्टंट बँक’ चा दर्जा असल्यामुळे सध्यातरी सर्वसामान्य खातेदारांच्या आणि ठेवीदारांच्या पैशाला कुठलाही प्रत्यक्ष धोका नाही.