How to Improve CIBIL Score : आजच्या काळात कर्ज हे केवळ घर किंवा वाहन खरेदी करण्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, डिजिटल कर्ज, ‘Buy Now, Pay Later’ यांसारख्या सुविधांमुळे सामान्य ग्राहकाच्या आर्थिक जीवनात क्रेडिटचे महत्त्व वाढले आहे. त्याचवेळी CIBIL Score हा कर्ज घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी महत्त्वाचा घटक बनला आहे. CIBIL Score म्हणजे काय, तो कसा ठरतो, तो खराब झाल्यास सुधारता येतो का, तरुणांनी क्रेडिटचा वापर कसा करावा, डिजिटल कर्जामुळे कोणती आव्हाने निर्माण होत आहेत, तसेच भविष्यात AIमुळे कर्जवाटपाची पद्धत कशी बदलणार आहे, अशा विविध मुद्द्यांवर CIBILचे उपाध्यक्ष भूषण पडकील यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न : आजच्या काळात कर्ज घेणे पूर्वीपेक्षा खूप सोपे झाले आहे. CIBILच्या डेटामधून भारतीय ग्राहकांच्या कर्ज घेण्याच्या सवयींमध्ये नेमके कोणते बदल दिसतात?

भूषण पडकील : गेल्या काही वर्षांत भारतातील क्रेडिट इकोसिस्टममध्ये मोठा बदल झाला आहे. पूर्वी कर्ज म्हणजे प्रामुख्याने गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा व्यवसायासाठी घेतले जाणारे कर्ज, अशी धारणा होती. आता ग्राहकांच्या गरजा आणि आर्थिक व्यवहार दोन्ही बदलले आहेत.
क्रेडिट कार्ड, वैयक्तिक कर्ज, डिजिटल कर्ज यामुळे ग्राहकाला विविध प्रकारचे क्रेडिट सहज उपलब्ध होत आहे. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे अधिकाधिक लोक औपचारिक वित्तीय व्यवस्थेत येत आहेत.
मात्र, क्रेडिटची उपलब्धता वाढणे आणि त्याचा योग्य वापर करणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. कर्ज उपलब्ध आहे म्हणून ते आवश्यक आहेच असे नाही. ग्राहकाने आपल्या उत्पन्नाचा, खर्चाचा आणि भविष्यातील परतफेडीच्या क्षमतेचा विचार करूनच कर्ज घ्यायला हवे.
आमच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट म्हणजे credit penetration सोबत credit awareness देखील वाढणे. ग्राहकाला कर्ज कसे काम करते, EMI म्हणजे काय, व्याजाचा खर्च किती आहे, credit utilisation म्हणजे काय आणि वेळेवर परतफेड का महत्त्वाची आहे, याची माहिती असणे आवश्यक आहे.

प्रश्न : CIBIL Score म्हणजे सामान्य ग्राहकाच्या भाषेत नेमके काय?

भूषण पडकील : CIBIL Score हा ग्राहकाच्या credit history चे संक्षिप्त प्रतिबिंब आहे. एखाद्या व्यक्तीने यापूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली, त्याच्या क्रेडिट खात्यांचा वापर कसा झाला, त्याच्यावर किती कर्ज आहे आणि त्याच्या क्रेडिट बिहॅविअरमध्ये कोणते नमुने दिसतात, यासारख्या विविध घटकांचा त्यात विचार केला जातो.
पण ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की CIBIL Score हा अंतिम निर्णय नाही. कर्ज देणारी संस्था ग्राहकाचे उत्पन्न, कर्जफेडीची क्षमता, रोजगार किंवा व्यवसायाची स्थिरता आणि स्वतःची क्रेडिट पॉलिसी यासह अनेक बाबींचा विचार करू शकते.
त्यामुळे ‘माझा Score चांगला आहे म्हणजे मला कोणतेही कर्ज मिळेल’ किंवा ‘Score कमी आहे म्हणजे मला कधीच कर्ज मिळणार नाही’, अशा दोन्ही धारणा योग्य नाहीत.

प्रश्न : चांगला CIBIL Score किती मानला जातो?

भूषण पडकील : सामान्यतः स्कोअर जितका चांगला तितका ग्राहकाच्या क्रेडिट प्रोफाईलकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जाण्याची शक्यता असते. मात्र, केवळ एका आकड्याच्या आधारावर ग्राहकाचे आर्थिक आरोग्य ठरवणे योग्य नाही.
ग्राहकाने स्कोअरच्या मागे धावण्यापेक्षा सातत्यपूर्ण आर्थिक शिस्तीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. EMI वेळेवर भरणे, क्रेडिट कार्डचे देयक वेळेवर भरणे, गरजेपेक्षा जास्त कर्ज न घेणे आणि आपल्या उपलब्ध क्रेडिट मर्यादेचा जबाबदारीने वापर करणे या सवयी महत्त्वाच्या आहेत.

प्रश्न : एखाद्या व्यक्तीचा CIBIL Score कमी झाला तर तो पुन्हा सुधारता येतो का?

भूषण पडकील : नक्कीच. क्रेडिट हिस्ट्री ही कायमची शिक्षा नाही. एखाद्या व्यक्तीकडून पूर्वी काही चुका झाल्या असतील, तर भविष्यातील चांगल्या आर्थिक वर्तनामुळे त्याच्या क्रेडिट प्रोफाईलमध्ये सुधारणा होऊ शकते.
यासाठी सर्वप्रथम आपल्या क्रेडिट रिपोर्टकडे लक्ष द्यावे. कोणती कर्जे सुरू आहेत, कोणत्या कर्जाची परतफेड बाकी आहे, काही चुकीची माहिती आहे का, हे तपासावे.
त्यानंतर EMI आणि क्रे़डिट कार्ड पेमेंट्स वेळेवर करणे, अनावश्यक कर्ज घेणे टाळणे आणि उपलब्ध क्रेडिटचा जबाबदारीने वापर करणे या बाबींवर सातत्याने लक्ष दिले पाहिजे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सुधारणा एका दिवसात होत नाही. क्रेडिट बिहॅविअरमध्ये सातत्य असणे आवश्यक आहे.

प्रश्न : एखादी EMI चुकला तर CIBIL Score वर किती परिणाम होतो?

भूषण पडकील : परतफेडीचा इतिहास हा क्रेडिट प्रोफाईलमधील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे EMI किंवा क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
एखादी देय रक्कम वेळेवर भरली गेली नाही, तर त्याची नोंद क्रेडिट हिस्ट्रीमध्ये होऊ शकते. मात्र, ग्राहकाने एखादी चूक झाली म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. पुढील काळात सातत्याने वेळेवर परतफेड करणे महत्त्वाचे आहे.
यातूनच एक मूलभूत संदेश जातो—कर्ज घेणे ही आर्थिक सुविधा आहे; पण त्याची वेळेवर परतफेड करणे ही आर्थिक जबाबदारी आहे.

प्रश्न : क्रेडिट कार्डचा वापर करताना सर्वात मोठी चूक ग्राहक कोणती करतात?

भूषण पडकील : क्रेडिट कार्डला अतिरिक्त उत्पन्न समजणे ही मोठी चूक आहे. क्रेडिट कार्ड म्हणजे आज खर्च करण्यासाठी उपलब्ध झालेली क्रेडिट सुविधा आहे; ते अतिरिक्त उत्पन्न नाही.
ग्राहकाने आपल्या परतफेडीच्या क्षमतेचा विचार करूनच खर्च करावा. बिल वेळेवर भरणे आणि उपलब्ध क्रेडिट लिमिटचा अतिवापर न करणे महत्त्वाचे आहे.
विशेषतः फक्त minimum amount due भरून उर्वरित रक्कम पुढे ढकलण्याची सवय दीर्घकाळात महाग ठरू शकते. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या क्रेडिट कार्डचा वापर शिस्तीने करणे आवश्यक आहे.

प्रश्न : क्रेडिट कार्डची मर्यादा ₹१ लाख आहे आणि ग्राहक दर महिन्याला ₹८० हजार वापरतो; पण पूर्ण बिल वेळेवर भरतो. तरीही याचा क्रेडिट प्रोफाईलवर परिणाम होऊ शकतो का?

भूषण पडकील : ग्राहकाने उपलब्ध क्रेडिट पैकी किती वापर केला आहे, हा क्रेडिट बिहॅविअर समजून घेण्यासाठी महत्त्वाचा घटक असू शकतो. त्यामुळे ग्राहकाने केवळ वेळेवर बिल भरले आहे एवढेच न पाहता आपल्या एकूण क्रेडिट युटीलायझेशनकडेही लक्ष दिले पाहिजे.
म्हणूनच ग्राहकाने जितके कर्ज किंवा क्रेडिट आवश्यक आहे तितकेच वापरणे ही चांगली आर्थिक सवय आहे.

प्रश्न : स्वतःचा CIBIL Report तपासल्याने Score कमी होतो, असा गैरसमज आहे. यात तथ्य आहे का?

भूषण पडकील : स्वतःचा क्रेडिट रिपोर्ट तपासणे ही चांगली सवय आहे. ग्राहकाने आपल्या नावावर कोणती कर्जे आहेत, कोणती खाती बंद झाली आहेत, परतफेडीची माहिती योग्य आहे का आणि अनोळखी व्यवहार किंवा खाते दिसत आहे का, हे तपासण्यासाठी क्रेडिट रिपोर्टकडे लक्ष द्यायला हवे.
विशेषतः आजच्या डिजिटल युगात आयडेंटी थेफ्ट किंवा चुकीच्या माहितीचा धोका लक्षात घेता क्रेडिट रिपोर्टचे नियमित निरीक्षण करणे अधिक महत्त्वाचे झाले आहे.

प्रश्न : अनेक बँका किंवा वित्तीय संस्थांकडे एकाच वेळी कर्जासाठी अर्ज केल्यास Score कमी होतो का?

भूषण पडकील : ग्राहकाने वारंवार विविध वित्तीय संस्थांकडे कर्जासाठी अर्ज केल्यास त्या संस्थांकडून credit enquiry होऊ शकते. त्यामुळे ग्राहकाने केवळ गरजेनुसार आणि विचारपूर्वक कर्जासाठी अर्ज करणे चांगले.
कर्ज घेण्यापूर्वी वेगवेगळ्या पर्यायांचा अभ्यास करणे योग्य आहे; मात्र फक्त कर्ज मिळतेय म्हणून अनेक ठिकाणी एकाच वेळी अर्ज करण्याची सवय टाळावी.

तरुण आणि कर्जसंस्कृती

प्रश्न : आजचा तरुण क्रेडिट कार्ड, BNPL आणि डिजिटल कर्जाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतो. हा बदल सकारात्मक आहे की धोकादायक?
भूषण पडकील : याकडे आपण संतुलित दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. क्रेडिटची उपलब्धता वाढणे ही आर्थिक समावेशनाच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे. तरुणाला योग्य वेळी शिक्षण, व्यवसाय, वाहन किंवा अन्य गरजांसाठी कर्ज मिळू शकते.
पण त्याच वेळी क्रेडिट आणि उत्पन्न यांच्यातील संबंध समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आज ‘Buy Now, Pay Later’मुळे वस्तू किंवा सेवा तातडीने घेणे शक्य होते. पण ग्राहकाने भविष्यातील उत्पन्नातून त्याची परतफेड करावी लागणार आहे, हे विसरता कामा नये.
तरुणांनी सुरुवातीपासूनच क्रेडिटला जबाबदारीने हाताळले, तर चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार होऊ शकते. भविष्यात गृहकर्ज किंवा व्यवसायासाठी मोठे कर्ज घेताना याचा फायदा होऊ शकतो.

प्रश्न : ज्याने कधीच कर्ज घेतलेले नाही, त्याचा CIBIL Score नसतो. मग पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसमोर कोणते आव्हान असते?

भूषण पडकील : क्रेडिट हिस्ट्री नसणे आणि खराब क्रेडिट हिस्ट्री असणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत.
एखाद्या तरुणाने कधीही कर्ज घेतले नसेल तर त्याच्याकडे क्रेडिट हिस्ट्री नसू शकते. याचा अर्थ त्याचा क्रेडिट बिहॅविअर खराब आहे असा होत नाही.
हळूहळू औपचारिक क्रेडिट सिस्टीममध्ये प्रवेश करून, उपलब्ध क्रेडिटचा जबाबदारीने वापर करून आणि वेळेवर परतफेड करून ग्राहक आपली क्रेडिट हिस्ट्री तयार करू शकतो.

Digital Lending आणि AI
प्रश्न : Digital lendingमुळे कर्जवाटपाचा चेहरामोहरा बदलला आहे. CIBILसाठी याचा काय अर्थ आहे?

भूषण पडकील : Digital lendingमुळे ग्राहकांपर्यंत क्रेडिट पोहोचण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ग्राहकाला शाखेत जाण्याची गरज नसते आणि कर्जाच्या प्रक्रियेचा कालावधीही कमी होऊ शकतो.

पण यासोबत जबाबदार lendingचे महत्त्व वाढते. ग्राहकाला किती कर्ज देणे योग्य आहे, त्याची परतफेड करण्याची क्षमता किती आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

भविष्यात data, analytics आणि technology यांची भूमिका आणखी वाढेल. मात्र तंत्रज्ञानाचा वापर ग्राहकाच्या हिताचा आणि जबाबदार पद्धतीने होणे तितकेच महत्त्वाचे आहे.

प्रश्न : भविष्यात AIमुळे CIBIL Scoreची पद्धतच बदलू शकते का?

भूषण पडकील : AI आणि advanced analyticsमुळे credit ecosystemमध्ये मोठ्या संधी निर्माण होत आहेत. मोठ्या प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून ग्राहकाच्या credit behaviourचे अधिक चांगले आकलन करता येऊ शकते.
परंतु AIचा वापर करताना डेटाची गुणवत्ता, अचूकता, पारदर्शकता आणि ग्राहकांच्या गोपनीयतेचे संरक्षण हे मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत.
AI हे मानवी निर्णयाची जागा घेण्यापेक्षा निर्णयप्रक्रियेला अधिक माहितीपूर्ण आणि कार्यक्षम बनविणारे साधन ठरू शकते.

ग्राहकांच्या तक्रारी आणि चुकीचा Credit Report

प्रश्न : अनेकदा ग्राहक म्हणतात की त्यांनी कर्ज पूर्ण फेडले आहे, पण credit reportमध्ये ते कर्ज अजूनही सुरू असल्याचे दिसते. अशा वेळी काय करावे?

भूषण पडकील : Credit reportमध्ये चुकीची माहिती दिसत असल्यास ग्राहकाने प्रथम संबंधित माहिती काळजीपूर्वक तपासली पाहिजे. चुकीची माहिती आढळल्यास त्याबाबत संबंधित वित्तीय संस्थेकडे तक्रार करता येते आणि आवश्यक correction processचा वापर करता येतो.
ग्राहकांनी आपला credit report नियमितपणे तपासण्याची सवय लावून घेतली तर अशा चुका लवकर लक्षात येऊ शकतात.

प्रश्न : एखाद्याच्या नावावर त्याच्या परवानगीशिवाय कर्ज घेतले गेले तर?

भूषण पडकील : हा अत्यंत गंभीर विषय आहे. डिजिटल व्यवहार वाढत असताना ग्राहकांनी आपली वैयक्तिक आणि आर्थिक माहिती सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.
अनोळखी कर्ज किंवा खाते credit reportमध्ये दिसल्यास ग्राहकाने तातडीने त्याची नोंद घ्यावी आणि संबंधित संस्थेशी संपर्क साधावा. कोणतीही संशयास्पद बाब दुर्लक्षित करू नये.
यासाठी financial awareness आणि नियमित credit monitoring दोन्ही महत्त्वाचे आहेत.

भारतातील Credit Economy

प्रश्न : भारत वेगाने ‘credit-driven economy’कडे जात आहे. पुढील पाच-दहा वर्षांत काय बदल पाहायला मिळतील?

भूषण पडकील : भारतातील credit ecosystem अजूनही मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यात आहे. अधिकाधिक ग्राहक औपचारिक वित्तीय व्यवस्थेत येत आहेत. डिजिटल व्यवहार, UPI, fintech आणि डेटा analyticsमुळे ग्राहकापर्यंत financial services पोहोचवण्याची क्षमता वाढली आहे.
पुढील काळात credit अधिक वैयक्तिकृत आणि तंत्रज्ञानाधारित होऊ शकते. पण त्याचवेळी responsible lending आणि responsible borrowing यांना तितकेच महत्त्व राहील.
आपल्याला केवळ अधिक लोकांना कर्ज द्यायचे नाही, तर योग्य ग्राहकाला योग्य प्रमाणात आणि योग्य कारणासाठी credit उपलब्ध करून द्यायचे आहे. त्याचबरोबर ग्राहकानेही आपल्या क्षमतेनुसार कर्ज घ्यावे, हा संतुलित विकास महत्त्वाचा आहे.

प्रश्न : शेवटी सामान्य ग्राहकाला CIBIL Scoreबाबत आपण कोणता एक महत्त्वाचा संदेश देऊ इच्छिता?

भूषण पडकील : CIBIL Scoreकडे केवळ कर्ज मिळवून देणारा आकडा म्हणून पाहू नका. तो आपल्या credit behaviourचा एक संकेत आहे.
वेळेवर EMI भरा, credit cardचा जबाबदारीने वापर करा, गरजेपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका, आपल्या credit reportवर लक्ष ठेवा आणि कोणतीही चुकीची माहिती आढळल्यास ती दुरुस्त करून घ्या.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आर्थिक शिस्त ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. आजची चांगली credit behaviour उद्याच्या आर्थिक संधींसाठी महत्त्वाची ठरू शकते.