IPL Foreign Players Taxation rules and Income Tax rates for NRI cricketers in India: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात श्रीमंत आणि सर्वाधिक लोकप्रिय क्रीडा लीगपैकी एक आहे. ही लीग जगभरातील अव्वल दर्जाच्या खेळाडूंना आकर्षित करते मोबदल्यात या खेळाडूंना अत्यंत मोठी आर्थिक रक्कम मिळते.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामाच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या ‘महा-लिलावा’मध्ये (Mega Auction), ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन ग्रीन हा सर्वाधिक मानधन मिळवणारा खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्स संघाने या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूसाठी २५.२० कोटी रुपये मोजले.
या कमाईवर कर कसा आकारला जातो? अनिवासी (NR) खेळाडूंसाठी विशेषतः विदेशी क्रिकेटपटूंसाठी आयपीएमधून मिळणाऱ्या उत्पन्नावरील कर आकारणीची प्रक्रिया काहीशी गुंतागुंतीची असू शकते. विदेशी खेळाडूंना एका बाजूला भारतीय कर-कायद्यांच्या चौकटीचे पालन करणे आवश्यक असते, तर दुसऱ्या बाजूला त्यांना आपल्या आर्थिक हितसंबंधांचेही कार्यक्षमतेने व्यवस्थापन करावे लागते.
आयपीएल खेळाडूंना विविध स्रोतांतून उत्पन्न मिळते आणि या सर्व स्रोतांची एकत्रित बेरजेतून त्यांच्या एकूण कमाईचा एक मोठा हिस्सा तयार होता.
आयपीएल खेळाडूंची कमाई कुठून होते?
मूळ वेतन / लिलावातील किंमत:
ज्या रकमेला खेळाडूला करारबद्ध केले जाते त्याला मूळ वेतन किंवा लिलावातीलल किंमत म्हणतात. ही रक्कम करारबद्ध खेळाडूला संपूर्ण हंगामासाठी मिळते. खेळाडूची कामगिरी, अनुभव आणि मागणी यांसारख्या घटकांवर आधारित राहून लिलावाच्या वेळी ही रक्कम निश्चित केली जाते.
सामना शुल्क (मॅच फी):
मूळ वेतनाव्यतिरिक्त, खेळाडूंना ते खेळलेल्या प्रत्येक सामन्यासाठी शुल्क दिले जाते, जे सामान्यतः त्यांनी खेळलेल्या सामन्यांच्या संख्येवर आधारित असते.
बक्षीस रक्कम आणि पुरस्कार:
खेळाडू सांघिक विजयांमधून (जसे की आयपीएल ट्रॉफी जिंकणे) तसेच सामनावीर, सर्वाधिक धावा करणाऱ्यासाठी ऑरेंज कॅप, सर्वाधिक बळी घेणाऱ्यासाठी पर्पल कॅप आणि कामगिरीवर आधारित इतर बोनस यांसारख्या वैयक्तिक सन्मानांमधून अतिरिक्त कमाई करू शकतात.
जाहिराती:
खेळाडूंना उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा हा जाहिराती आणि सोशल मीडियावरील भागीदारींमधूनही प्राप्त होतो.
विदेशी खेळाडूंवरील कर आकारणी
अनिवासी (विदेशी) आयपीएल खेळाडूंनी कमावलेले उत्पन्न भारतात करपात्र असते. ‘आयकर अधिनियम, २०२५’ अन्वये, विदेशी (अनिवासी) आयपीएल खेळाडूंवर कलम २११ अंतर्गत कर आकारला जातो. हे कलम अनिवासी खेळाडूंवरील कर आकारणीचे नियमन करते.
“भारतात कोणत्याही खेळात किंवा क्रीडा प्रकारात सहभागी होऊन, जाहिरातींमधून, अथवा भारतातील वर्तमानपत्रे, मासिके किंवा नियतकालिकांमध्ये खेळ किंवा क्रीडाविषयक लेख लिहून विशिष्ट प्रकारचे उत्पन्न कमावणारा कोणताही अनिवासी विदेशी खेळाडू, भारतात २० टक्के (अधिक अधिभार आणि उपकर) या सरळ दराने कर भरण्यास बांधील असतो. हा कर एकूण उत्पन्नावर आकारला जातो आणि त्यातून खर्चापोटी कोणतीही वजावट दिली जात नाही”, असे एनए शहा असोसिएट्सचे कर-विषयक भागीदार गोपाल बोहरा यांनी सांगितले.
“या कलमांतर्गत, अशा उत्पन्नावर कोणतीही वजावट किंवा करमाफी मिळत नाही”, असे दिल्लीस्थित चार्टर्ड अकाउंटंट फर्म ‘दिनेश आरजव अँड असोसिएट्स’च्या भागीदार आणि अनिवासी भारतीयांच्या करविषयक तज्ज्ञ, प्रियल गोयल जैन यांनी सांगितले. याबाबत मनीकंट्रोलच्या वृत्तात उल्लेख आहे.
अधिभार (Surcharge) हा वर्षादरम्यान कमावलेल्या उत्पन्नावर आधारित असतो आणि करपात्र रकमेवर १० टक्के ते ३७ टक्के दराने अधिभार आकारला जातो. कर आणि अधिभाराच्या एकूण रकमेवर ४ टक्के दराने उपकर (Cess) आकारला जातो.
उदाहरणार्थ, ‘कॅमेरॉन ग्रीन’ यंदाच्या लिलावत कोलकाता नाईट रायडर्सने २५.२० कोटी रुपयांना करारबद्ध केले. म्हणजेच ही त्याची एकूण कमाई झाली. त्याला रक्कम अदा करतानाच, त्याच्या कराची २० टक्के दराने (अधिक अधिभार आणि उपकर) कपात केली जाईल.
जर एखाद्या खेळाडूला भारतातून अन्य कोणताही उत्पन्न स्रोत असेल, तर अशा उत्पन्नावर आयपीएल सामन्यांतून मिळणाऱ्या उत्पन्नासह लागू दरांनी कर आकारला जाईल आणि अशा परिस्थितीत कर विवरणपत्र (Return) दाखल करणे अनिवार्य ठरते.
कोणत्या परिस्थितीत होऊ शकते करमाफी?
अनिवासी खेळाडू, भारत सरकारने संबंधित अनिवासी खेळाडूंच्या मूळ देशाशी केलेल्या ‘दुहेरी कर टाळणी करारां’चा (DTAA) किंवा कर-करारनाम्यांचा (Tax Treaties) लाभ घेऊ शकतात. ज्या अंतर्गत त्यांना करात सवलती किंवा कमी कर दर उपलब्ध होतात (असे करार अस्तित्वात असल्यास).
काय आहे ‘DTAA’ करार?
“आयकर कायदा, २०२५ च्या कलम १५९ अन्वये सरकारला इतर देशांशी अशा प्रकारचे DTAA किंवा कर-विषयक व्यवस्था (Arrangements) करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. DTAA चा मुख्य उद्देश म्हणजे, एकाच उत्पन्नावर दोन वेगवेगळ्या कर-क्षेत्रांमध्ये दुहेरी कर आकारणी होणे टाळणे हा आहे”, असे श्री टॅक्स चेंबर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर के.एस. यांनी सांगितले. सध्या अशा प्रकारचे सुमारे ९६ कर-करार अस्तित्वात आहेत, ज्यापैकी ९४ करार सध्या अंमलात आहेत, असे मनीकंट्रेलच्या वृत्तात म्हटले आहे.
