Meta CRED investment data privacy : जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीयांचा दबदबा वाढत आहे. यात आणखी एका नावाची भर पडली आहे. देशातील आघाडीची फिनटेक कंपनी क्रेडचे संस्थापक कुणाल शाह व्हॉट्सअ‍ॅप’चे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी बनणार आहेत. कला शाखेचा पदवीधर, एमबीएचे अर्धवट शिक्षण ते दिग्गज टेक कंपनीचे नेतृत्व हे यश अचंबित करणारे आहे. या नियुक्तीसोबत मेटाने क्रेडमध्ये तब्बल सुमारे ८,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मात्र, या मेगाडीलमागे भारतीयांचा अत्यंत महत्त्वाचा ‘डेटा’ तर नाही ना? असा संशय इकॉनॉमिक थिंक-टँक ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ने व्यक्त केला आहे.

भारतीयांचा डेटा मेटाकडे जाणार?

मेटाने क्रेडमध्ये मोठी गुंतवणूक केल्याने भारतीयांचा डेटा सुरक्षित राहणार का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. यावर कुणाल शाह यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, “मेटा ही ‘क्रेड’मध्ये एक अल्पसंख्याक गुंतवणूकदार म्हणून सामील होत आहे. क्रेडच्या कोणत्याही सदस्याचा वैयक्तिक किंवा आर्थिक डेटा मेटाला दिला जाणार नाही.” कुणाल शाह आता क्रेडमधील त्यांच्या दैनंदिन व्यवस्थापकीय भूमिकेतून बाजूला होणार असून, केवळ एक भागधारक म्हणून कायम राहतील.

कॉलेज ड्रॉपआउट ते व्हॉट्सअ‍ॅप प्रमुख

अहमदाबादमध्ये जन्मलेल्या आणि मुंबईत वाढलेल्या कुणाल शाह यांचं मन शिक्षणात जास्त रमलं नाही. त्यांनी विल्सन कॉलेजमधून तत्त्वज्ञान या विषयात बीएची पदवी घेतली. त्यानंतर व्यवसायात रस असल्याने एमबीएचे शिक्षण अर्धवट सोडलं. शाह म्हणाले, की ‘मी कधीही खोट्या प्रतिष्ठेसाठी जगलो नाही. मी चुका करायला आणि शिकायला तयार होतो. मला आश्चर्य वाटते की, भारतातील अनेक तरुण अशी प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न करतात, जी त्यांनी अजून कमावलेलीच नाही.”

‘फ्रीचार्ज’ ते ‘क्रेड’: स्टार्टअप क्षेत्रातील किंगमेकर

कुणाल शाह हे स्टार्टअप क्षेत्रातील जुनं नाव आहे. २०१० मध्ये त्यांनी पहिल्यांदा ‘फ्रीचार्ज’ची स्थापना केली, २०१५ मध्ये हे स्टार्टअप ‘स्नॅपडील’ने सुमारे ४०-४५ कोटी डॉलर्सला विकत घेतलं. हा त्या काळातील सर्वात मोठा एक्झिट मानला गेला होता. मधल्या काळात त्यांनी अनेक स्टार्टअप आणि व्यवसायात गुंतवणूक केली. २ वर्षानंतर २०१८ मध्ये त्यांनी ‘क्रेड’ची स्थापना केली. भारतातील क्रेडिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना त्यांनी आकर्षित केले. आज क्रेडचे १.७ कोटी युजर्स असून, भारतातील ४० टक्क्यांहून अधिक क्रेडिट कार्ड बिलांचा भरणा याच प्लॅटफॉर्मवरून होतो. याशिवाय त्यांनी रेझरपे, अनअकॅडमी आणि स्पिनी सारख्या अनेक युनिकॉर्न कंपन्यांमध्ये सुरुवातीची गुंतवणूक केली आहे.

ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह संस्थेकडून गंभीर आक्षेप

  • कुणाल शाह यांच्या नियुक्तीचे कार्पोरेट जगतातून स्वागत होत असताना दिल्लीतील नामांकित इकॉनॉमिक थिंक-टँक ‘ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्ह’ने या व्यवहारावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
  • जीटीआरआयचे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, “या करारामुळे भारताच्या फिनटेक क्षेत्रावर आणि भारतीयांच्या वित्तीय डेटावर अमेरिकन कंपन्यांचे नियंत्रण प्रचंड वाढेल. भारताची सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधा (UPI, इंडिया स्टॅक) वापरून उभ्या राहिलेल्या बाजारपेठेवर आता परदेशी दिग्गजांचा ताबा निर्माण होत आहे.”
  • सध्या भारतातील डिजिटल पेमेंट व्यवस्थेमध्ये वॉलमार्ट (PhonePe – ७२% वाटा), गुगल (Google Pay) आणि मेटा (WhatsApp Pay) चे वर्चस्व आहे. क्रेड आज डेटा देणार नाही असे म्हणत असले, तरी भविष्यात हा सर्व डेटा अप्रत्यक्षपणे मेटाच्या ‘एआय मॉडेल्स’च्या ट्रेनिंगसाठी वापरला किंवा विकला जाण्याची दाट शक्यता आहे, अशी भीती जीटीआरआयनेने व्यक्त केली आहे.