Nepal Floods Economy Impact : साधारणपणे वर्षभरापूर्वी राजकीय स्थित्यंतर अनुभवलेल्या नेपाळी जनतेवर आता मोठं नैसर्गिक संकट कोसळलं आहे. दोन दिवसांपासून ढगफुटी आणि त्यानंतर आलेल्या महापुरापुढे कित्येक गावं अन् खेडी भुईसपाट झाली. या घटनेचे काळजाचा थरकाप उडवणारे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात केवळ मनुष्यहानीच नाही तर मोठी आर्थिक हानीही झाली आहे. काही वर्षांपासून राजकीय अस्थिर असलेल्या नेपाळच्या अर्थव्यवस्थेला हा मोठा तडाखा मानला जात आहे. यातून पुन्हा उभं राहण्यासाठी नेपाळला मोठा काळ लागेल. या पार्श्वभूमीवर नेपाळची अर्थव्यवस्था आणि उत्पन्नाचे स्त्रोत समजून घेणे आवश्यक आहे.
देशातील ६० टक्के जनता अजूनही शेतीवर अवलंबून
नेपाळचा बहुतांश भाग हिमालयाच्या पर्वतरांगांनी व्यापलेला आहे. अतिउंच टेकड्या आणि खडकाळ जमिनीमुळे तिथे शेती करणे कठीण आहे. इथे शेतीयोग्य क्षेत्र केवळ २० टक्के आहे. असे असूनही देशातील सुमारे ६०% पेक्षा जास्त लोकसंख्या अजूनही उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. भात (तांदूळ), मका, गहू, ऊस आणि ताग ही या देशातील प्रमुख पिके आहेत. तर वेलची, चहा, आले आणि सेंद्रिय भाज्या/फळे ही नगदी पिके आहेत. नेपाळचा सर्वाधिक व्यापार हा भारतासोबतच आहे.
रेमिटन्स (परदेशी कामातून येणारा पैसा)
गेल्या काही वर्षांपासून नेपाळच्या अर्थव्यवस्थेत रेमिटन्समधून मोठे योगदान होत आहे. नेपाळच्या अर्थव्यवस्थेत रेमिटन्सचा वाटा जिडीपीच्या सुमारे २५ ते ३० टक्के आहे. लाखो नेपाळी तरुण आखाती देश (कतार, यूएई, सौदी अरेबिया), मलेशिया आणि भारतात काम करतात. त्यांनी मायदेशी पाठवलेला पैसा देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लावतो.
पर्यटन उद्योग
नेपाळमध्ये जगातील सर्वोच्च शिखर ‘माऊंट एव्हरेस्ट’सह १० पैकी ८ सर्वात उंच पर्वत शिखरे आहेत. त्यामुळे ट्रेकिंग आणि पर्वतारोहणासाठी जगभरातून पर्यटक येतात. पोखरा, काठमांडू, अन्नपूर्णा रीजन आणि लुंबिनी (भगवान बुद्ध यांचे जन्मस्थान) ही प्रमुख पर्यटन आणि धार्मिक स्थळांमुळे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळते. भारतातून लाखो भाविक दरवर्षी नेपाळला भेट देत असतात.
४. जलविद्युत प्रकल्प
हिमालयाच्या सानिध्यात असलेल्या नेपाळची सर्वात मोठी ताकद म्हणजे वेगाने वाहणारे पाणी. नेपाळमध्ये हिमालयातून वाहणाऱ्या अनेक नद्या असल्यामुळे जलविद्युत निर्मितीची प्रचंड क्षमता आहे. नेपाळ स्वतःची विजेची गरज पूर्ण करून भारत आणि बांग्लादेशला अतिरिक्त वीज विकतो, ज्यामुळे देशाच्या महसुलात वाढ होत आहे. आज या नद्यांनी रौद्ररुप धारण केलं असलं तरी देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठा पैसा यामुळे खळबळतो.
नेपाळचे लोकप्रिय ब्रँड
- नेपाळ छोट देश असला तरी येथील काही ब्रँड जगभरात लोकप्रिय आहेत. नेपाळची सर्वात मोठी बहुराष्ट्रीय कंपनी सीजी कॉर्प ग्लोबल, ज्याला चौधरी ग्रुप म्हणूनही ओळखले जाते. या कंपनीचे वाई वाई नूडल्स जगभरात प्रसिद्ध आहे. हा ब्रँड नेस्लेच्या मॅगी आणि भारतीय आयटीसीच्या यिप्पीलाही टक्कर देतो. भारताच्या नूडल बाजारात त्याचा सुमारे २५ टक्के वाटा आहे.
- नेपाळचा इलाम चहा जगातील अनेक भागात त्याची अनोखी चव आणि गुणवत्तेसाठी ओळखला जातो. नेपाळ टी कलेक्टिव्ह विशेषतः अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये सेंद्रिय नेपाळी चहा निर्यात करते.
- नेपाळच्या हिमालयीन डिस्टिलरीच्या ‘खुकरी रम’ने जगाला आकर्षित केले. जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, इटली, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये त्याची निर्यात केली जाते.
