Why Users Are Cancelling ChatGPT Subscription: या वर्षी चॅटजीपीटी एआय क्षेत्रात जोरदार पुनरागमन करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे आणि जेव्हा ओपनएआयच्या बाजूने काही गोष्टी घडू लागल्या, तेव्हाच एक नवीन वाद निर्माण झाला आहे, ज्यामुळे कंपनीला आर्थिक अडचणी येत आहेत.
इंटरनेटवर सध्या “क्विटजीपीटी” नावाची एक चळवळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे, जी युजर्सना चॅटजीपीटीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन करत आहे.
‘क्विटजीपीटी’ चळवळीला जन्म
ओपनएआयचे अध्यक्ष ग्रेग ब्रॉकमन आणि त्यांच्या पत्नीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या सुपर पीएसीला १२.५ दशलक्ष डॉलर्सची देणगी दिली होती. तसेच यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट चॅटजीपीटी ४ चे रिझ्युमे स्क्रीनिंग टूल वापरत असल्याचे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केले. कॉर्पोरेट आणि राजकीय संबंधांना विरोध म्हणून ‘क्विटजीपीटी’ चळवळीला जन्म झाला, ज्याद्वारे हजारो युजर्सनी त्यांची सशुल्क चॅटजीपीटी सदस्यता (सब्सक्रिप्शन) रद्द केली आहे.
इंस्टाग्राम आणि रेडिटवर ‘क्विटजीपीटी’ चळवळीने फेब्रुवारी २०२६ मध्ये वेग घेतला, जिथे युजर्सनी त्यांच्या रद्द केलेल्या सब्सक्रिप्शनचे स्क्रीनग्रॅब पोस्ट करण्यास सुरुवात केली आणि अलीकडील अपडेट्स व चॅटजीपीटीच्या टोनवर टीका करणाऱ्या पोस्ट टाकल्या.
या चळवळीचा उद्देश युजर्सना चॅटजीपीटी डिलिट, सशुल्क सदस्यता रद्द करण्यास आणि पर्यायी एआय प्लॅटफॉर्मवर स्विच करण्यास प्रेरित करणे आहे.
‘क्विटजीपीटी’ आणि त्याचा आतापर्यंतचा परिणाम
‘क्विटजीपीटी’ चळवळीच्या आयोजकांच्या मते, १७,००० हून अधिक लोकांनी त्यांच्या वेबसाइटवर साइन अप केले आहे आणि त्यांचे चॅटजीपीटी सब्सक्रिप्शन रद्द करण्याचे तसेच या चळवळीत इतरांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे वचन दिले आहे. ट्रम्प प्रशासन आणि दिग्गज टेक कंपन्यांमधील वाढत्या संबंधांबद्दलही अनेक युजर्सनी चिंता व्यक्त केली आहे.
या चळवळीत कोणाचा सहभाग?
‘क्विटजीपीटी’ चळवळीबद्दल बोलायचे झाले तर, बरेच तरुण कार्यकर्ते यात भाग घेत आहेत. यामध्ये हवामान संघटक, कामगार समर्थक आणि अगदी तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या चळवळीची प्रेरणा मार्केटिंग प्रोफेसर स्कॉट गॅलोवे यांच्या व्हिडिओवरून मिळाली. ते म्हणाले की, सब्सक्रिप्शन रद्द केल्याने कंपन्यांना असा संदेश जाऊ शकतो की, जनतेने न स्वीकारलेल्या सरकारी धोरणांना पाठिंबा दिल्यास कंपन्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
‘द इन्फॉर्मेशन’नुसार, डिसेंबर २०२५ पर्यंत चॅटजीपीटीचे जवळपास ९० कोटी साप्ताहिक सक्रिय युजर्स होते. चॅटजीपीटीविरोधातील या चळवळीत किती युजर्स सहभागी झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एआयविरुद्ध लढू इच्छिणाऱ्यांसाठी…
रेडिटसह इंस्टाग्रामवरही ‘क्विटजीपीटी’ चळवळीने लोकप्रियता मिळवली आहे. इंस्टाग्रामवर अभिनेता-कार्यकर्ता मार्क रफालो यांच्यासोबत “क्विट जीपीटी” नावाचे एक पेज आहे. त्यांच्या अलीकडील पोस्टवरील कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “चॅटजीपीटी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सर्वात मोठे देणगीदार आहेत. बहिष्कार टाकण्याची वेळ आली आहे. एआयविरुद्ध लढू इच्छिणाऱ्या आणि मिनियापोलिसच्या बाजूने उभे राहू इच्छिणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी ही एक संधी आहे.”
तज्ज्ञ काय म्हणाले?
अमेरिकन युनिव्हर्सिटीच्या समाजशास्त्रज्ञ डाना फिशर म्हणाल्या की, जेव्हा मोठ्या संख्येने ग्राहक एकत्र येतात, तेव्हाच आर्थिक दबाव कॉर्पोरेट वर्तनावर परिणाम करू शकतो. सध्या, ‘क्विटजीपीटी’ प्रमुख तंत्रज्ञान कंपन्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल आणि सार्वजनिक जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या प्रभावाबद्दल अस्वस्थता दर्शवते.

