निनाद झारे
RBI Repo Rate Decision :
रिझर्व्ह बँकेची पतधोरण समिती (एमपीसी) उद्या, ७ ऑक्टोबर रोजी आपला निर्णय जाहीर करणार आहे. रेपो दर सध्या ५.२५ टक्के आहे. महागाईची चिंता रास्त असली, तरी याच टप्प्यावर दरवाढ केल्यास ‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ ठरण्याचा धोका आहे. दर स्थिर ठेवणेच शहाणपणाचे ठरेल, आणि त्यासाठी चार ठोस कारणे आहेत.

१. वाढीला खीळ, तेही ग्रामीण अर्थव्यवस्था आधीच संकटात असताना

यंदाचा मान्सून सन २००० नंतरचा चौथा सर्वांत कमी पावसाचा ठरला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) केवळ ८७ टक्के पाऊस झाला असून, ४३ टक्के जिल्ह्यांत पाऊस अपुरा राहिला. तीव्र एल निनोची स्थिती आणि ऑक्टोबरमधील सरासरीपेक्षा कमी पाऊस यामुळे रब्बी हंगामावरही परिणाम होण्याची भीती आहे. शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला या संकटाचा फटका आधीच बसू लागला आहे.
अशा वेळी दरवाढ केली, तर हेच संकट शहरी अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचून मागणी गडगडण्याचा धोका आहे. सध्याची महागाई पुरवठ्याच्या बाजूची आहे. दरवाढ मागणीवर घाव घालते, पण पुरवठा वाढवत नाही.

२. कर्जाची मागणी आणखी अडचणीत येईल

व्याजदर वाढले की गृह, वाहन, वैयक्तिक आणि एमएसएमई कर्जे महाग होतात. बाह्य मानकाशी (एक्स्टर्नल बेंचमार्क) जोडलेल्या कर्जांचे दर तातडीने बदलत असल्याने कर्जदारांवर बोजा लगेच येतो. उत्पन्नाबाबत अनिश्चितता वाढलेली असताना कर्ज घेण्याची इच्छा आणि क्षमता, दोन्ही घटतात. कमकुवत उपभोग आणि कर्जवाढीच्या टप्प्यात आणखी एक कडक धोरणात्मक धक्का देणे योग्य नाही.

३. तरलतेचा प्रश्न असेल तर त्यासाठी इतर साधने उपलब्ध

व्यवस्थेतील तरलता (लिक्विडिटी) हाताळणे हा दरवाढीमागचा हेतू असेल, तर त्यासाठी रेपो दरापेक्षा अधिक लवचिक साधने आहेत. रोख राखीव प्रमाण (सीआरआर), व्हेरिएबल रेट रेपो/रिव्हर्स रेपो आणि खुल्या बाजारातील व्यवहार (ओएमओ) यांद्वारे वित्तीय स्थिती घट्ट करता येते. परिस्थिती बदलल्यास ही पावले सहज मागे घेता येतात. दरवाढ मात्र चिकट असते. ती उलटवणे कठीण असते आणि बाजाराला चुकीचा संकेत देणारे ठरू शकते.

४. ‘ट्रान्समिशन’चा प्रश्न पुन्हा उफाळून येईल

दरवाढ झाली की रेपो दरातील बदल बँकांच्या कर्ज आणि ठेव दरांपर्यंत पोहोचण्याचा (ट्रान्समिशन) जुना प्रश्न पुन्हा ऐरणीवर येईल. कर्जदर झपाट्याने वाढतात, तर ठेवींचे दर तुलनेने हळू बदलतात. शिवाय बँकांनुसार परिणामही वेगवेगळा दिसतो. रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता स्थिर आणि अंदाजक्षम भूमिकेवर उभी आहे. ही टाळता येण्याजोगी चर्चा स्वतःहून ओढवून घेण्याचे कारण नाही.

आकडे काय सांगतात?

  • महागाई अद्याप मर्यादेत : ऑगस्टमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई ४.८२ टक्के होती (जुलैमध्ये ४.४५ टक्के). हा दर रिझर्व्ह बँकेच्या लक्ष्य पट्ट्यात आहे. पुढील वाढ प्रामुख्याने अन्नपदार्थांच्या पुरवठ्याशी निगडित असून तात्पुरत्या स्वरूपाची असण्याची शक्यता आहे.
  • ऑगस्टचा निर्णय एकमताचा : त्या बैठकीत एमपीसीच्या सर्व सदस्यांनी रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्याच्या बाजूने मत दिले होते आणि ‘न्यूट्रल’ भूमिका कायम ठेवली होती.
  • कोअर महागाई हीच कसोटी : सिटीचे अर्थतज्ज्ञ समीरन चक्रवर्ती यांच्या मते, कोअर महागाई सातत्याने ४.५ टक्क्यांच्या वर राहिल्याशिवाय २०२६ मध्ये दरवाढ संभवत नाही. आर्थिक वर्ष २०२७ साठी रिझर्व्ह बँकेचा कोअर महागाईचा अंदाज ४.३ टक्के आहे.

दुसरी बाजू आणि त्याला उत्तर

रॉयटर्सच्या पाहणीत ६१ पैकी ३५ अर्थतज्ज्ञांनी (सुमारे ६० टक्के) ऑक्टोबरमध्ये २५ बेसिस पॉइंट दरवाढीची अपेक्षा व्यक्त केली आहे. एसबीआय रिसर्चच्या अंदाजानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये महागाई ६.५ टक्क्यांच्या वर जाऊ शकते. महाग कच्चे तेल, कमकुवत रुपया, कडक जागतिक वित्तीय स्थिती आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने नुकतीच केलेली दरवाढ ही कारणेही ‘ईवाय’ने नमूद केली आहेत.

मात्र आयातित तेलाचे भाव आणि रुपयावरील दबाव २५ बेसिस पॉइंटच्या देशांतर्गत दरवाढीने सुटणारे नाहीत. उलट त्याची किंमत देशातील वाढ, ग्रामीण उत्पन्न आणि कर्जदारांना मोजावी लागेल.

निष्कर्ष

ही महागाई पुरवठ्यातील धक्क्यातून आलेली असल्याने तिचे उत्तरही तेथेच शोधावे लागेल. अशा वेळी व्याजदर वाढवून मागणी दाबणे म्हणजे आधीच दुष्काळाच्या सावटाखाली असलेल्या अर्थव्यवस्थेला आणखी ताण देणे होय. रिझर्व्ह बँकेने रेपो दर स्थिर ठेवून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि गरज भासल्यास तरलतेची लवचिक साधने वापरावीत, हाच विवेकी मार्ग आहे.
लेखक मुक्त पत्रकार आहेत.