reliance jio ipo valuation comparison : शेअर बाजारात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘जिओ प्लॅटफॉर्म्सचा आगामी आयपीओ’. १२ ते १३ लाख कोटी रुपयांच्या अवाढव्य मूल्यांकनासह येऊ घातलेला हा आयपीओ देशातील टेलिकॉम क्षेत्राचे चित्र पूर्णपणे बदलून टाकणार आहे. ही कंपनी सूचिबद्ध होताच आपली सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी ‘भारती एअरटेल’ला बाजार मूल्यात मागे टाकू शकते. यामुळेच आता गुंतवणूकदारांमध्ये जिओ की एअरटेल, दीर्घकाळासाठी कोणती कंपनी सर्वोत्तम परतावा देईल, यावरून मोठी चर्चा रंगली आहे.

जिओ आणि एअरटेल स्पर्धेत सध्या कोण कुठे?

रिलायन्स जिओच्या आगामी आयपीओच्या पार्श्वभूमिवर एअरटेल आणि जिओमध्ये तुलना सुरू झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत जिओचे वर्चस्व असले तरी जागतिक स्तरावर एअरटेल खूप पुढे आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या आकडेवारीनुसार, जिओचा एकत्रित शुद्ध नफा (PAT) ३०,०५३ कोटी रुपये आणि महसूल १.४७ लाख कोटी रुपये होता. याउलट, भारती एअरटेलने ३३,८२३ कोटी रुपयांचा अधिक नफा आणि २.११ लाख कोटी रुपये महसूल नोंदवला होता. विशेष म्हणजे टेलिकॉम क्षेत्रातील महत्त्वाचा निकष मानला जाणारा प्रति ग्राहक सरासरी महसूल एअरटेलचा सर्वाधिक म्हणजेच २५७.४ रुपये प्रतिमहिना आहे, तर जिओ २१४ रुपयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. नफा आणि प्रति ग्राहक महसूल जास्त असूनही जिओच्या आयपीओला एवढी मागणी का? यामागे बाजाराची तीन मुख्य गणिते आहेत.

भारतातील अवाढव्य ग्राहक संख्या

भारती एअरटेलचे जगभरातील १५ देशांमध्ये मिळून एकूण ६६.६ कोटी ग्राहक आहेत, ज्यापैकी ४८.२ कोटी ग्राहक भारतात आहेत. याउलट, जिओ सध्या केवळ देशांतर्गत बाजारपेठेत काम करते. मात्र, असे असूनही जिओचा भारतातील ग्राहक बेस तब्बल ५२.४ कोटी आहे, जो देशातील एकूण मोबाईल युजर्सच्या तब्बल ४०% वाटा व्यापतो. एअरटेलला अजूनही त्याचा ७५% महसूल भारतीय बाजारपेठेतूनच मिळतो. त्यामुळे भारतातील ग्राहक संख्येचा विचार करता जिओ सध्या आघाडीवर आहे. सेंट्रम ब्रोकिंगचे वरिष्ठ विश्लेषक पीयूष पांडे यांच्या मते, ग्राहक संख्या आणि प्रति ग्राहक महसूल यांचा एकत्रित गुणाकार पाहिला तर जिओचा महसूल आणि पकड अधिक मजबूत दिसून येते. तसेच ‘रिलायन्स’ या ब्रँडने आयपीओमधून नेहमीच गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिला आहे, यामुळे हा आयपीओ गुंतवणूकदारांना आकर्षित करत असल्याचे आदित्य बिर्ला सन लाईफ एएमसीचे एमडी आणि सीईओ ए. बालसुब्रमण्यम यांनी म्हटले आहे.

५जी इन्फ्रास्ट्रक्चरमधील तांत्रिक आघाडी

२०२२ मध्ये जेव्हा देशात ५जीचे वारे वाहू लागले. तेव्हा दोन्ही कंपन्यांनी दोन वेगवेगळे मार्ग निवडले. एअरटेलने ‘नॉन-स्टँडअलोन’ मार्ग निवडला, ज्यामध्ये त्यांनी जुन्या ४जी टॉवर्सचा वापर करून ५जी सेवा सुरू केली. यामुळे त्यांचा खर्च वाचला आणि ५जी लवकर सुरू होण्यास मदत झाली. मात्र, त्याचवेळी जुने तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा वेग आणि प्रगत वापराच्या मर्यादा आल्या.

जिओची नेटवर्कमध्ये आघाडी

दुसरीकडे, जिओने ‘स्टँडअलोन’ हा पूर्णपणे नवीन आणि आधुनिक मार्ग निवडला. यासाठी जिओने तब्बल २ लाख कोटी रुपयांचा प्रचंड खर्च केला. एलारा कॅपिटलच्या अहवालानुसार, जिओचे हे क्लाउड-नेटिव्ह ५जी स्टँडअलोन नेटवर्क आणि स्वतःचे तंत्रज्ञान भविष्यात कमी खर्चात इंटरनेटचा वेग वाढवण्यासाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्राला सेवा देण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. एअरटेलनेही फेब्रुवारी २०२५ पासून एरिक्सनच्या सोबतीने या मार्गावर काम सुरू केले असले, तरी जिओ या शर्यतीत खूप पुढे निघून गेली आहे.

डिजिटल इकोसिस्टम आणि भविष्यातील कमाईचे मार्ग

जिओ आता केवळ एक टेलिकॉम ऑपरेटर राहिलेली नसून मोठा ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’ झाला आहे. जिओकडे जिओ क्लाउड, जिओ सावन आणि जिओ सिनेमा सारख्या डिजिटल सेवांची संपूर्ण साखळी उपलब्ध आहे. सध्या दोन्ही कंपन्यांचा ९०% हून अधिक महसूल मोबाईल सेवांमधूनच येत असला, तरी भविष्यात जिओ या डिजिटल सेवांवर कृत्रिम बुद्धिमत्ता सेवा जोडून आपल्या ५२.४ कोटी ग्राहकांकडून अतिरिक्त कमाई करू शकते. याचे संकेत जिओने आपल्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीत दिले आहेत.

दीर्घकालीन आव्हाने काय आहेत?

ट्रायच्या एप्रिल २०२६ च्या आकडेवारीनुसार, भारतात मोबाईल नेटवर्क ९०.२८% पर्यंत पोहोचले असून ग्राहक वाढीचा दर वर्षाला केवळ ०.५% इतकाच राहिला आहे. म्हणजेच भारतीय बाजारपेठेत वाढीस आता मोठी संधी नाही. अशा वेळी जिओची केवळ भारतावर असलेली भिस्त पुढील ७-८ वर्षांत वाढ रोखू शकते, तर एअरटेलचा आफ्रिकेतील व्यवसाय वेगाने वाढत असल्याने त्यांना भौगोलिक विविधतेचा फायदा मिळू शकतो, असेही काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.