Tata Sons AGM Adjourned And Tata Group Crisis Explained: मीठ ते सॉफ्टवेअर उद्योगापर्यंत विस्तारलेल्या टाटा समूहाची नियंत्रक कंपनी असलेल्या टाटा सन्सची महत्त्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवारी पुरेशा गणपूर्तीअभावी तहकूब करावी लागली. अंतर्गत वादाने ग्रस्त असलेल्या देशातील या सर्वात प्रतिष्ठित उद्योग समूहाला आपल्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रसंगाला सामोरे जावे लागले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये नियोजित कार्यकाळ संपल्यानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पुनर्नियुक्ती नाकारल्याची माहिती समोर आल्यानंतर, अवघ्या आठवड्याभरातच टाटा समूहाच्या दृष्टीने हा दुसरा धक्का मानला जात आहे.

टाटा सन्सची वार्षिक सर्वसाधारण सभा का तहकूब करण्यात आली?

टाटा सन्समध्ये सर्वाधिक मालकी राखणाऱ्या दोन ट्रस्ट्सच्या प्रतिनिधींची सभेला अनुपस्थिती आणि परिणामी गणपूर्तीअभावी सभा तहकुबीचा निर्णय घ्यावा लागला, असे सूत्रांनी सांगितले. सर दोराबजी टाटा ट्रस्ट (एसडीटीटी) आणि सर रतन टाटा ट्रस्टचे (एसआरटीटी) या ट्रस्ट्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्यांच्या गैरहजेरीमागे महाराष्ट्र धर्मादाय आयुक्तांनी या ट्रस्ट्सवर घातलेले निर्बंध हे कारण आहे.

धर्मादाय आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशांमुळे या ट्रस्ट्सवर अनेक कठोर निर्बंध आहेत. ज्यात त्यांना कोणतेही मोठे निर्णय न घेण्यास किंवा सभा न घेण्यास सूचित केले गेले आहे. हे निर्बंध घातले जाण्यामागे प्रामुख्याने विश्वस्त मंडळातील अंतर्गत वाद, कारभारात पारदर्शकतेचा अभाव आणि ट्रस्ट्सच्या प्रशासनाविरोधात मिळालेल्या तक्रारी ही मुख्य कारणे आहेत. त्याबद्दल सुनावणी आणि निवाडा अद्याप प्रलंबित आहे.

टाटा समूहात वादाचे मूळ कारण काय?

टाटा सन्समधील ६६% भागभांडवल टाटा ट्रस्ट्सकडे आहे. नोएल टाटा हे ऑक्टोबर २०२४ पासून टाटा ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. विश्वस्त आणि टाटा सन्सचे व्यवस्थापन यांच्यातील मतभेद हे या संघर्षाचे मुख्य कारण ठरले आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे टाटा सन्स शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यावरुन मंडळातील सदस्यांमध्ये मतभेद पाहायला मिळाले. नोएल टाटा यांचा याला विरोध आहे, तर वेणू श्रीनिवासन आणि विजय सिंग टाटा सन्स सूचिबद्ध करण्याच्या बाजूने आहेत. चंद्रा या विषयावर स्पष्ट/एकतर्फी भूमिका घेण्यास असमर्थ आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा वाद थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापर्यंत पोहोचला होता.

नोएल टाटा आणि चंद्रशेखरन यांच्यातील मतभेद

या निर्णयामागे टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष नोएल टाटा आणि एन. चंद्रशेखरन यांच्यातील मतभेद असल्याचे सूत्रांनुसार समोर आले आहे. आरबीआयच्या नियमांनुसार टाटा सन्सला शेअर बाजारात सूचिबद्ध करणे किंवा त्याला पर्याय शोधणे आवश्यक आहे. नोएल टाटा हे कंपनीच्या लिस्टिंगच्या विरोधात होते, तर चंद्रशेखरन यावर व्यावहारिक तोडगा काढण्याच्या बाजूने होते.

टाटा सन्समध्ये अल्पसंख्याक भागधारक असलेल्या शापूरजी पालनजी समूहाला बाहेर पडण्यासाठी कायदेशीर व आर्थिक मार्ग कसा उपलब्ध करून द्यायचा, यावरही मतभेद होते. टाटा सन्सच्या संचालक मंडळावर ट्रस्टचे नियंत्रण किती असावे, यावरूनही दोन्ही संस्थांमध्ये वाद सुरू होता.

एन. चंद्रशेखरन यांनी का दिला राजीनामा?

एन. चंद्रशेखरन यांचा निर्णय: ५ वर्षांची मुदतवाढ सर्वानुमते न मिळाल्यामुळे आणि संचालक मंडळात एकवाक्यता नसल्यामुळे चंद्रा यांनी मुदत संपल्यानंतर पद सोडण्याचे जाहीर केले. २०१७ मध्ये जेव्हा चंद्रशेखरन यांची ‘टाटा सन्स’चे नियोजित अध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली, तेव्हा त्यांनी आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल रतन टाटा आणि ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळाचे विशेष आभार मानले होते.

नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू

विविध क्षेत्रांत विस्तारलेल्या टाटा समूहाची मुख्य नियंत्रक कंपनी असलेल्या ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांचे उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रिया ‘टाटा ट्रस्ट्स’नी अधिकृतपणे सुरू केली आहे.टाटा सन्सच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती न स्वीकारण्याचा निर्णय चंद्रशेखरन यांनी गेल्या आठवड्यात अचानक जाहीर केला. त्यांना अध्यक्षपदाचा तिसरा कार्यकाळ देण्याबाबत संचालक मंडळात जवळपास सहा महिने एकमत होऊ न शकल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.

टाटा सन्समध्ये विविध टाटा ट्रस्ट्सचा दोन तृतीयांश मालकी हिस्सा असून, त्यात सर्वाधिक वाटा असणाऱ्या ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, चंद्रशेखरन यांच्या कारकीर्दीचा सन्मानजनक उल्लेख करताना, अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती न स्वीकारता, राजीनामा देण्याच्या त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. टाटा सन्स आणि टाटा समूहासाठी गेल्या दशकभरात त्यांनी दिलेल्या योगदानाचा पत्रकात उल्लेख केला आहे.

सर दोराबजी टाटा ट्रस्टने नवीन अध्यक्ष निवडीसाठी समिती स्थापन करणारा ठरावही मंजूर करण्यात आला आहे. या समितीकडून, नवीन अध्यक्षांची संचालक मंडळात नियुक्ती करण्याबाबत शिफारस करेल. टाटा सन्सचे नेतृत्व नवीन व्यक्तीकडे सोपविण्याच्या प्रक्रियेला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. ही प्रक्रिया सुरळीतपणे आणि योग्य वेळेत पूर्ण होईल. टाटा सन्स आणि टाटा समूहाचे दीर्घकालीन हित आणि मूल्ये यातून जपली जातील, असा विश्वासही ट्रस्टने व्यक्त केला.