UPI Circle feature: बँकिंग व्यवहार अधिक सुलभ आणि डिजिटल करण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) कडून सातत्याने नवनवीन सुविधा सादर केल्या जात आहेत. याच डिजिटल क्रांतीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ‘यूपीआय सर्कल’ (UPI Circle). या सुविधेमुळे मुख्य बँक खातेदार आपल्या घरातील सदस्य, मुले, ज्येष्ठ नागरिक किंवा विश्वासू कर्मचाऱ्यांना स्वतःच्या खात्यावरून ठराविक मर्यादेत यूपीआय पेमेंट करण्याचे अधिकार देऊ शकतो.

ना अडचण, ना वैताग

अचानक आपल्या मुला-मुलींना पैशांची गरज भासते… काहीतरी अर्जंट खरेदी करताना घरातल्या ज्येष्ठांकडे पैसे नसतात… आपण कुठे तरी मिटिंगमध्ये अडकलेलो असतो, नॉट रिचेबल असतो… जेव्हा अशी वेळ येते तेव्हा त्यांची अडचण होते, आपला वैताग होतो. बहुदा आप्तांची, व्यवसायातल्या साथीदारांची हीच अडचण ओळखून बँकिंग क्षेत्रात यूपीआय सर्कल नावाची नवी सुविधा सुरु झालीय. विश्वासातून व्यवहाराला चालना देणारी काय आहे, ही सुविधा? कोणती आहेत, तिची वैशिष्ट्यं ? काय आहेत तिचे फायदे?

बँकेचे तोंड न पाहाताही व्यवहार शक्य

बँक आणि ग्राहकांचं मोठं गमतीशीर नातं असतं. म्हणजे काय, तर ग्राहक विश्वासानं आपले पैसे बँकेच्या हवाली करतो. त्या विश्वासाला प्रतिसाद म्हणून बँका ग्राहकांचं हित नजरेपुढे ठेऊन पैशांचे व्यवहार अधिक सुलभ आणि सोपे करण्याकडे लक्ष देते. जेव्हापासून व्यवहार अधिकाधिक ऑनलाइन होऊ लागलेत, तेव्हापासून बँका ग्राहकांवर अधिकाधिक विश्वास टाकू लागल्या आहेत. महिनोन् महिने बँकांचं तोंड न पाहता पैशांची देवाणघेवाण सुरळीतपणे पार पडतेय. याच विश्वासाच्या भावनेचं विस्तारीत रुप म्हणून बँकिंग तज्ज्ञ मंडळी आता यूपीआय सर्कल या सुविधेकडे पाहू लागलीत.

UPI Circle Feature Guide Marathi | UPI Circle Limit and Benefits | यूपीआय सर्कल सुविधा कशी वापरावी | UPI पेमेंट नवीन नियम आणि मर्यादा
यूपीआय सर्कल सुविधा वापरून करा सुलभ ऑनलाइन पेमेंट (Image- Gemini)

यूपीआय पेमेंटच्या व्यापक प्रसारासाठी

आपल्याला हे तर ठाऊकच आहे, की, यूपीआय -एटीएम व यूपीआय- क्रेडीट कार्ड या बँकिंग सुविधांबाबतची माहिती आता आम जनतेपर्यंत बऱ्यापैकी पोहोचलीय. सातत्यानं वाढतच जात असलेल्या यूपीआय पेमेंट सुविधेचा प्रसार आणखी व्यापक होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) वेळोवेळी नवनवीन सुविधा यूपीआय अॅपवर (भीम/ गुगलपे/ फोनपे इ.) सुरु करीत आहे. यूपीआय- सर्कल यातलीच एक नवी सुविधा आहे.

यूपीआय सर्कलची फारशी माहिती सामान्यांना नाही

गंमत म्हणजे, एनपीसीआयने ही सुविधा सुरु करण्याबद्दची घोषणा १३ ऑगस्ट २०२४ रोजीच केली होती. पुढच्या वर्ष-सव्वा वर्षांत म्हणजेच, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी ही सुविधा प्रत्यक्षात सुरुही झाली. मात्र, चांगले ७-८ महिने होऊनसुद्धा सर्वसामान्य यूपीआय अॅप युजर्सपर्यंत या सुविधेची फारशी माहिती पोहोचली नाही. म्हणूनच कदाचित या सुविधेचा अपेक्षित तो वापर होताना दिसून येत नाही. पण हरकत नाही. सुविधा ग्राहकांच्या आप्तस्वकीयांशी असलेल्या नातेसंबंधांचं वर्तुळ विस्तारणारी, त्या वर्तुळाला बळकटी देणारी आहे. त्यामुळे या सुविधेबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं आहे.

यूपीआय सर्कल म्हणजे नेमकं काय ?

एनपीसीआयने भीम/ गुगलपे/ फोनपे इत्यादींसारख्या मार्गांनी नित्याचे व्यवहार करणाऱ्या यूपीआय अॅप धारकांना ही सुविधा पुरवलीय. ही सुविधा वापरून बँक खातेदार आपल्या बँक खात्यातून अन्य विश्वासू व्यक्तीस पेमेंट करण्याचा काही ठरविक मर्यादेपर्यंत अधिकार देऊ शकतो, ही या सुविधेची सगळ्यात मोठी खासियत आहे. यात ज्याच्या नावाचे बँक खाते आहे, त्याला प्रायमरी युजर म्हटले जाते.

विश्वासू व्यक्तीस पेमेंटचा अधिकार

तर हा प्रायमरी युजर ज्याला अधिकार देणार आहे, त्याला सेकंडरी युजर म्हटले जाते. थोडक्यात, असं करून तुम्ही तुमचा युपीआय पेमेंट करण्याचा अधिकार तुमच्या विश्वासू व्यक्तीस देऊ शकता. या सुविधेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सेकंडरी युजरचं स्वत:चे बँक खाते नसलं तरी काही बिघडत नाही. तो तुमच्या (प्रायमरी युजरच्या ) बँक खात्यातून स्वतःच्या मोबाइलवरून थेट पेमेंट करू पैसे ट्रान्सफर करू शकतो.

सुविधा वापरायची कशी ?

एकदम सोप्पंय. यूपीआय अॅप वापरणाऱ्यांसाठी यात नवीच काहीच नाही. इथं प्रायमरी युजरने काय करायचं तर,
१) मोबाइलमधलं यूपीआयअॅप उघडायचं. सेटिंगमध्ये जाऊन यूपीआय सर्कल पर्यायावर क्लिक करायचं. नंतर ‘नवीन सदस्य जोडणे’ या पर्यायावर क्लिक करायचं. आपल्या मोबाइल मधल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून ज्याला आपल्या ‘पेमेंट सर्कल’मध्ये अॅड करायचंय, त्या मोबाइल नंबरवर क्लिक करायचं, की झाला पहिला टप्पा पार.

२) सेकंडरी युजरला अंशत: किंवा संपूर्ण अधिकार द्यायचा तो आपणास आवश्यक वाटणारा पर्याय निवडायचा आणि आपला यूपीआय पीन नंबर टाकून जोडणी पूर्ण करायची. बरं ही सुविधा एका नावापुरती मर्यादित नाही. अशा प्रकारे आपल्याला जास्तीतजास्त ५ जणांना सर्कल मध्ये समाविष्ट करून घेऊ शकतं. त्यातही आणखी एक वैशिष्ट्यं असं की, तुम्ही जर सेकंडरी युजरला पेमेंटचा संपूर्ण अधिकार (फूल डेलिगेशन) दिला असेल, तर तर सेकंडरी युजर स्वतंत्रपणे पेमेंट करू शकतो प्रत्येक वेळी प्रायमरी युजरची अनुमती घ्यावी लागत नाही.

१५ हजारांची मर्यादा

अर्थात, हा अधिकार अमर्याद नाही. अशा प्रकारे सेकंडरी युजरला दरमहा एकूण. १५ हजार रुपयांपर्यंतच पेमेंट करण्याचे स्वातंत्र्य असतं. आणि एकाच वेळी जास्तीतजास्त पाच हजार इतकंच पेमेंट करता येते. याउलट आपण सेकंडरी युजरला अंशत: अनुमती (पार्शल डेलिगेशन) दिली असेल, तर प्रत्येकवेळी पेमेंट करताना आपली अनुमती घ्यावी लागते. ती आपण पीन टाकून द्यायची असते. थोडक्यात काय, यूपीआय मर्यादेपर्यंतचे सर्व व्यवहार सेकंडरी युजर करू शकतो.

सुविधा कुणाला उपयोगी ठरणारी आहे?

१) कुटुंब: कुटुंबाचा विचार करता, प्रायमरी युजर असलेले पालक आपल्या शाळेत जाणाऱ्या किंवा कॉलेजगोइंग मुला-मुलींना पॉकेट मनी देण्यासाठी यूपीआय सर्कल सुविधेचा वापर करून त्यांची नावं यात समाविष्ट करू शकतात. यामुळे मुलांना पैशांचे छोटे-मोठे व्यवहार करतेवेळी रोख रक्कम देण्याची गरज राहत नाही. मुलं गरजेनुसार आवश्यक तो खर्च करू शकतात. खर्च केलेली रक्कम आपल्या खात्यात डेबिट पडत असल्याने मुलं नेमका कुठे खर्च करत आहेत, याचा तपशीलही पालकांना लगेच एसएसएस द्वारे मिळतो. यामुळे मुलांच्या अनाठाई खर्चावरही पालकांचा आवश्यक तो वॉच राहतो.

घरातील ज्येष्ठांनाही सुविधा

मुलांप्रमाणेच घरातल्या ज्येष्ठांनाही ऐन वेळी पैशांची गरज भासू शकते. अनेकदा वरचेवर पैसे मागत राहणे, त्यांनाही आवडत नाही. मग अशा वेळी युपीआय सर्कलचा पर्याय उपयोगी येतो. मुलांप्रमाणेच प्रमाणे घरातल्या जेष्ठांना सुद्धा यात समाविष्ट केलं तर तुम्ही सोबत असा वा नसा, त्यांना आवश्यक तो खर्च सहजगत्या करता येतो.

विश्वासू कर्मचाऱ्यांनाही सुविधा

२) या शिवाय आपला एखादा लहान व्यवसाय आहे, आपण नसताना आवश्यक खर्चाची वेळ येते पण आपण तिथे हजर नसतो. अशा वेळी आपल्या विश्वासू कर्मचाऱ्यांना यात सुविधेत अॅड केलं, तर त्याला वेळच्या वेळची व्यवसायातले व्यवहार पार पाडता येतात.

काय आहेत सुविधेची ठळक वैशिष्ट्ये ?

  • १) यूपीआय- सर्कल वापरणारा प्रायमरी युजर जास्तीत जास्त ५ सेकंडरी युजर जोडू शकतो.
  • २) एक सेकंडरी युजर एका वेळी फक्त एकाचा सर्कलचा सदस्य असू शकतो.
  • ३) फुल डेलिगेशनमध्ये एका वेळी जास्तीजास्त ५००० रुपयांइतका व्यवहार पेमेंट सेकंडरी युजर करू शकतो. तर एका महिन्याची पेमेंट मर्यादा रु.१५००० इतकी असते.
  • ४) प्रायमरी युजर असा अधिकार १ महिन्या पासून ते ५ वर्षापर्यंत कितीही कालावधीसाठी देऊ शकतो. आणि अर्थातच केव्हाही हा कालावधी बदलण्याचा त्याला अधिकार असतो. तो त्याला वाटेल तेव्हा सेकंडरी युजरचा अधिकार रद्दही करू शकतो.
  • ५) सेकंडरी युजरला सर्कलला लिंक केल्यानंतर प्रारंभीची ३० मिनिटे हा कुलिंग पिरीयड असतो, या कालावधीत सेकंडरी युजर पेमेंट करू शकत नाही.
  • ६) पार्शल डेलिगेशन सुविधेमध्ये सेकंडरी युजरने पेमेंटसाठी केलेली विनंती, फक्त १० मिनिटे वैध असते. त्यामुळे प्रायमरी युजरने हा ऑप्शन निवडताना, आपली ही जबाबदारीही लक्षात ठेवणं गरजेचं ठरतं.

प्रायमरी युजरने काय खबरदारी घ्यावी?

१) अर्थातच, फक्त अतिशय विश्वासू व्यक्तीलाच सर्कल मध्ये समाविष्ट करावं.
२) अगदी सुरुवातीस मोकळा हात न सोडता, फुल डेलिगेशन देण्याऐवजी पार्शल डेलिगेशनचा ऑप्शन क्लिक करावा.
३) सुरवातीस महिन्याची खर्चाची मर्यादा कमी ठेवून पाहावी, पुढे गरज वाटल्यास १५ हजार रुपयांपर्यंत वाढवावी.
४) सर्कल मधील सदस्यांशी आपला पिन नंबर सांगणं टाळा. कारण, नियमाप्रमाणे व्यवहार करताना त्यांना पिन टाकण्याची गरजच नसते.

थोडक्यात काय, तर निअर अँड डिअर मंडळींचे व्यवहार सुलभ करण्याची संधी चालून आलीय. ती टाळू नका. ही केवळ संधी नाही, तर तुम्ही ऑफर करत असलेली विश्वासाची पावती आहे.