US Japan Joint Intervention Japanese Yen : सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. नुकतेच महासत्ता असलेल्या अमेरिका आणि जपान यांनी हातमिळवणी करत मोठा निर्णय घेतला आहे. जपानी चलन ‘येन’मधील तीव्र अस्थिरता रोखण्यासाठी दोन देशांनी एकत्र येत संयुक्त पाऊल उचलले आहे. २०११ नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांनी एकत्र येत चलन बाजारात असा हस्तक्षेप केला आहे. या कारवाईमुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जपानी ‘येन’ मजबूत झाला असला, तरी या बदलांमुळे भारतीय शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सप्टेंबर २०२५ मधील अमेरिका-जपान वित्तमंत्र्यांच्या संयुक्त करारानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
या संयुक्त हस्तक्षेपामागची नेमकी कारणे काय?
- गेल्या जुलै महिन्यात जपानी ‘येन’ तब्बल ४० वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला होता. याचा थेट परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर पाहायला मिळाला. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जपानसारखे देश अमेरिकेचे ट्रेझरी बाँड खरेदी करुन कर्ज देतात. यावर अमेरिकेला वार्षिक व्याज द्यावे लागते. जपानकडे अमेरिकन बाँडचा मोठा हिस्सा असल्याने, येन कमजोर राहिल्यास जपानला आपले अमेरिकन बाँड विकावे लागतील, ज्यामुळे बाँड यील्ड आणखी वाढू शकतात.
- अमेरिकेचे एकूण कर्ज ४० ट्रिलियन डॉलरवर पोहोचले आहे. अशा स्थितीत बाँड यील्डमध्ये १० ते २० बेसिस पॉईंट्सची जरी वाढ झाली, तरी अमेरिकेच्या तिजोरीवर मोठा ताण येऊ शकतो. म्हणूनच डॉलरचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेला जपानची साथ देण्यावाचून पर्याय नाही.
- महागाई नियंत्रणात आणण्यासाठी जपानने व्याजदर वाढवणे गरजेचे होते. परंतु, सध्या व्याजदर वाढवले तर बाजारातील मागणी कमी होईल, या भीतीपोटी मध्यवर्ती बँकांनी व्याजदर न वाढवता थेट ‘बाजार हस्तक्षेपाचा’ मार्ग पत्करला.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, जपानी सरकारने आपले चलन सावरण्यासाठी तब्बल ५९ अब्ज डॉलरच्या सिक्युरिटीज विकल्या असाव्यात. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रोन यांनीही, “त्यांचे चलन कमजोर होत होते आणि त्यांना मदतीची गरज होती, आम्ही नेहमी जपानच्या पाठीशी आहोत,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
चलनावर झालेला तात्काळ परिणाम
जपानच्या अर्थमंत्रालयाने या घोषणेनंतर, जपानी ‘येन’च्या मूल्यात सुमारे १ टक्क्याची सुधारणा झाली असून तो प्रति डॉलर १५५.२३ वर पोहोचला. गेल्या तीन महिन्यांतील हा सर्वात उच्च स्तर आहे.
भारतीय बाजारावर याचा काय परिणाम होणार?
- भारतीय बाजाराचा जपानी येनशी कॅरी ट्रेड’च्या माध्यमातून मोठा संबंध आहे. कॅरी ट्रेडमध्ये गुंतवणूकदार जपानसारख्या कमी व्याजदर असलेल्या देशातून ‘येन’ कर्जाच्या रूपात घेतात आणि भारतासारख्या बाजारांमध्ये उच्च परताव्यासाठी गुंतवणूक करतात.
- येन मजबूत झाल्यास परदेशी गुंतवणूकदार कॅरी ट्रेड कमी करू शकतात, ज्यामुळे भारतीय बाजारातून भांडवल बाहेर जाण्याचा धोका निर्माण होतो.
- चालू वर्षात (२०२६) आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) भारतीय बाजारातून तब्बल २७.२ अब्ज डॉलर काढून घेतले आहेत. जुलै महिन्यात २.१ अब्ज डॉलरची अल्पशी खरेदी झाली असली, तरी येनच्या हालचालींमुळे हा दबाव वाढू शकतो.
- आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे संशोधन प्रमुख पंकज पांडे यांच्या मते, “कॅरी ट्रेड मागे घेतल्याने काही काळ दबाव येईल; मात्र भारतासाठी सध्या ‘कच्च्या तेलाच्या किमती’ स्थिर राहणे हा अधिक मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे.”
