Why Rich People Rent Homes : शहरात राहणाऱ्या प्रत्येक मध्यमवर्गीय व्यक्तीचे स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न असते. यासाठी निवृत्तीपर्यंत त्यांची गृहकर्ज फेडण्याची तयारी असते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याच्या उलट श्रीमंत लोकांची मानसिकता असते. जूनमध्ये भारतीय टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत तब्बल १८.५० लाख रुपये महिना भाड्याने आलिशान घर घेतले. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा कपूरनेही मुंबईतील आपला एक लक्झरी फ्लॅट तब्बल ५.५१ लाख रुपये प्रतिमहिना भाड्याने दिला आहे. या दोन्ही घटनांनंतर एका सामान्य माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न निर्माण होतो की “एखाद्याकडे महिन्याला ५ ते १८ लाख रुपये फक्त भाडे भरण्याची ताकद असेल, तर ती व्यक्ती स्वतःचे घर का खरेदी करत नाही? यामागे आहे श्रीमंत लोकांची एक बिझनेस स्ट्रॅटेजी.

१. ‘कॅश फ्लो’ आणि गुंतवणुकीवरील परतावा

समजा मुंबईतील उच्चभ्रू भागात एका लक्झरी अपार्टमेंटची किंमत ३५ कोटी रुपये आहे. घर खरेदी केल्यास खरेदीदाराची ३५ कोटी रुपयांची मोठी रक्कम एकाच ठिकाणी अडकून पडते. तेच ३५ कोटी रुपये जर उद्योग, शेअर बाजार, खासगी इक्विटी किंवा स्टार्ट-अप्समध्ये गुंतवले, तर तिथून वार्षिक १२ ते १५ टक्के परतावा मिळू शकतो. म्हणजे ३५ कोटींवर वर्षाला ४ ते ५ कोटी रुपयांची कमाई होऊ शकते. अशा वेळी वर्षाला ६० ते ७० लाख रुपये भाडे भरणे जड नसते.

२. भाड्यातून मिळणारे अल्प उत्पन्न

भारतातील मोठ्या शहरांमध्ये लक्झरी घरांच्या भाड्यातून मिळणार उत्पन्न अवघे २ ते ४ टक्के असते. ३० कोटींच्या घराचे वार्षिक भाडे ६० लाख ते १ कोटी रुपयांच्या दरम्यान असते (म्हणजेच २ ते ३%). त्यामुळे एवढी मोठी रक्कम घर खरेदीत अडकवण्यापेक्षा अल्प भाड्यावर राहणे श्रीमंतांना अधिक परवडणारे वाटते.

श्रीमंत लोक भाड्याच्या घरात का राहतात?

  • व्यावसायिकांसाठी हातात रोख रक्कम असणे ही सर्वात मोठी ताकद असते. नवीन व्यवसायाची संधी आल्यास ही रक्कम तात्काळ वापरता येते.
  • अभिनेते, सीईओ आणि बड्या उद्योगपतींचे काम वेगवेगळ्या शहरांत असते. आज मुंबईत काम आहे, तर काही वर्षांनी परदेशात जावे लागू शकते. घर विकण्याच्या झंझटीपेक्षा भाड्याचे घर सोडणे सोपे असते.
  • स्विमिंग पूल, जिम, खाजगी क्लब आणि हाय-सिक्युरिटी असलेल्या ५० ते १०० कोटींच्या घराचा उपभोग अगदी कमी भाड्यात घेता येतो.
  • महागड्या घरांचा प्रॉपर्टी टॅक्स, मोठे स्ट्रक्चरल रिपेअर आणि मेंटेनन्सचा सर्व खर्च मालकाला करावा लागतो, भाडेकरूला नाही.

बिझनेस स्ट्रॅटेजी काय आहे?

भाड्याने राहून उरलेला पैसा इतरत्र गुंतवून अधिक नफा कमवण्याची ही रणनीती फक्त प्रचंड भांडवल आणि जास्त परतावा कमवण्याची क्षमता असणाऱ्यांसाठीच योग्य ठरते. सामान्य कुटुंबांसाठी आजही स्वतःचे घर खरेदी करणे हीच आर्थिक सुरक्षेची आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीची सर्वात मजबूत पायरी मानली जाते.

श्रेयस अय्यरचा ३६ महिन्यांचा महागडा भाडेकरार

गेल्या महिन्यात श्रेयस अय्यर याने मुंबईतील उच्चभ्रू भागाग एक अलिशान अपार्टमेंट भाड्याने घेतले. हा भाडेकरार एकूण ३६ महिने म्हणजे ३ वर्षांसाठी केला असून, यात दरवर्षी भाड्यात वाढ होणार आहे. यामध्ये पहिल्या वर्षात दरमहा १८.५० लाख रुपये भाडे ठरले असून दुसऱ्या वर्षी भाड्यात सुमारे ७% वाढ होऊन ते दरमहा १९.७९ लाख रुपये होईल. तर तिसऱ्या वर्षात श्रेयसला दरमहा २१.१८ लाख रुपये भाडे द्यावे लागेल. या तीन वर्षांच्या संपूर्ण कालावधीत श्रेयस अय्यर एकूण ७.१४ कोटी रुपये केवळ भाड्यापोटी मोजणार आहे.