Faruk Patel KP Group success story : उद्योजक होण्यासाठी मोठ्या उद्योगपतीच्या पोटी जन्म घ्यावा लागत नाही, तर त्यासाठी चिकाटी, योग्य विचारसरणी आणि सातत्यपूर्ण शिकण्याची तयारी असावी लागते. साध्या १०x१० फुटांच्या खोलीत बालपण गेलेल्या आणि बस कंडक्टर असलेल्या मुलाने हे सिद्ध करुन दाखवलं आहे. केपी ग्रुपचे संस्थापक, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक फारुक जी. पटेल यांचे आज तब्बल १०,९६४ कोटी रुपयांचे साम्राज्य आहे. एका सामान्य कुटुंबातून त्यांनी एवढी मोठी झेप कशी घेतली? कोणत्या गोष्टीने त्यांच्यातील उद्योजकाने जन्म घेतला?
अपयशाच्या पायऱ्यांवरून यशाच्या शिखरापर्यंत
फारुक पटेल आज जरी मोठे उद्योजक असले तरी त्यांचा हा प्रवास कधीही सरळ रेषेतला नव्हता. भरूचमधील सलादारा गावात १९७२ मध्ये जन्मलेल्या फारुक यांच्या वडिलांनी जी.एस.आर.टी.सी. (GSRTC) मध्ये बस कंडक्टर म्हणून नोकरी केली. नंतर बदली झाल्यानंतर कुटुंब सुरतमध्ये आले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, १० बाय १० च्या खोलीत वास्तव्य असतानाही पालकांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही.
शाळा ठरली टर्निंग पॉईंट
इयत्ता पाचवीत खासगी शाळेत प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. श्रीमंत वर्गातील मित्रांच्या सहवासामुळे त्यांची महत्त्वाकांक्षा रुंदावली. ‘जोपर्यंत तुम्ही मोठी स्वप्नं पाहत नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाऊ शकत नाही,’ हा कानमंत्र त्यांनी आयुष्यात तंतोतंत पाळला.
टेक्सटाइल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केल्यानंतर ते ब्रिटन गेले. पण, दोनदा अपयशी ठरल्याने त्यांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. सुरतमध्ये परतल्यावर ऑप्टिकल शॉपपासून ते कपड्यांच्या व्यवसायापर्यंत अनेक छोटी-मोठी कामे त्यांनी केली. या काळात अनेकांनी त्यांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला.
‘केपी’ नावाचा ब्रँड आणि लॉजिस्टिक्सपासून सुरुवात
सर्व अडथळ्यांवर मात करत १९९४ मध्ये त्यांनी लॉजिस्टिक्स क्षेत्रातून आपल्या खऱ्या व्यावसायिक प्रवासाची सुरुवात केली. त्यांच्या मूळ गाव ‘कोठी’ आणि आडनाव ‘पटेल’ यांवरून या समूहाला ‘केपी’ हे नाव देण्यात आले. व्यवसाय वाढल्यानंतर त्यांनी १९९७ साली कन्स्ट्रक्शन क्षेत्रात पदार्पण केले, तर पुढील दोनच वर्षात १९९९ मध्ये मोबाईल आणि टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातही प्रवेश केला. २००१ मध्ये समूहाच्या व्यवसायांना एकत्र करत ‘केपी बिल्डकॉन’ची स्थापना केली.
टेलिकॉम क्षेत्रात मोठा धक्का
टेलिकॉम क्षेत्रात त्यांनी सुरुवातील देशभरात अनेक राज्यांमध्ये मोठे प्रकल्प उभे केले. परंतु, काही कालावधीनंतर टेलिकॉम क्षेत्रात आलेल्या मोठ्या आर्थिक मंदीमुळे त्यांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आणि व्यवसाय धोक्यात आला. अशा कठीण प्रसंगीही खचून न जाता, झपाट्याने योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेने त्यांनी पुन्हा शून्यातून विश्व उभे केले.
रिन्यूएबल एनर्जीचा धाडसी निर्णय
टेलिकॉमच्या धक्क्यानंतर फारुक पटेल यांनी आपली रणनीती पूर्णपणे बदलली. २००८ मध्ये त्यांनी ‘केपीआय ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर’च्या माध्यमातून रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात पाऊल ठेवले. त्यानंतर २०१० मध्ये पवन ऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी ‘केपी एनर्जी’ सुरू केली.
आज केपी ग्रुपचे तीन मोठ्या कंपन्यांचे जाळे
फारुक पटेल यांच्या आज ३ कंपन्या बाजारात सूचीबद्ध आहेत. केपीआय ग्रीन एनर्जी, (हरित वीज निर्मिती), पवन ऊर्जा प्रकल्पांसाठी सेवा आणि सोल्यूशन्स देणारी केपी एनर्जी आणि इंजिनिअरिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर उत्पादन करणारी केपी ग्रीन इंजिनिअरिंग या कंपन्या लिस्टेड आहे.
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, आज समूहाकडे ९.२ गिगावॉटपेक्षा अधिक रिन्यूएबल एनर्जी पोर्टफोलिओ आणि १२,००० एकरहून अधिक जमीन बँक उपलब्ध आहे. ऑगस्ट २०२६ मध्ये या समूहाचे मूल्य १०,९६४ कोटी रुपये नोंदवले गेले असले, तरी यापूर्वी त्यांच्या सर्वकालीन उच्चांकी मूल्याने २२,८00 कोटींचा टप्पा ओलांडला होता.
