मुंबईः इंडकल टेक्नॉलॉजीजने तैवानच्या एसर इन्क.शी विशेष परवान्यासह दीर्घोद्देशी सामंजस्य करारातून, ऑगस्टअखेरीस एसर या नाममुद्रेने भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोन दाखल केले आहेत. यासह भविष्यात अन्य इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची प्रस्तुती आणि स्वतःच्या उत्पादन सुविधेचे नियोजन असलेल्या कंपनीने एकूण उलाढाल डिसेंबर २०२५ पर्यंत २,००० कोटींवर नेण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे.

बेंगळूरु येथे मुख्यालय असलेल्या इंडकल टेक्नॉलॉजीजचे सुरुवातीला वर्षाला दहा लाख हँडसेट तयार करण्याचे लक्ष्य आहे. कंपनीने केंद्राच्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन योजनेसाठी (पीएलआय) अर्ज केला असून, स्वतःच्या उत्पादन सुविधेसाठी महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर अथवा पुण्यानजीक औद्योगिक वसाहतीपैकी एका ठिकाणासंबंधाने सध्या चाचपणी सुरू आहे, असे इंडकल टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि संचालक ऋषिकेश जाधव यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

हेही वाचा >>>‘बजाज हाऊसिंग फिन’पाठोपाठ अन्य ‘एनबीएफसी’ही सूचिबद्धतेचा मार्ग अनुसरणार!

जगातील तिसऱ्या मोठ्या संगणक हार्डवेअर निर्माता असलेल्या एसर या नाममुद्रेने भारतात आता स्मार्टफोनही उपलब्ध होणे आणि त्यांची निर्मिती आमच्याकडून केली जाणे, या उत्साहदायी घडामोडीसाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न व परिश्रम सुरू होते, असे जाधव यांनी स्पष्ट केले.उच्च श्रेणीतील प्रोसेसर, उत्कृष्ट कॅमेरा तंत्रज्ञान आणि अनेक नवीनतम वैशिष्ट्यांसह विकसित केलेली एसर स्मार्टफोनच्या श्रेणी ग्राहकांच्या पसंतीस उतरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एसर नाममु्द्रेने भारतात टीव्ही संच, होम ऑडियो उत्पादने आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या उत्पादन आणि वितरणाचा परवाना २०२१ पासून इंडकल टेक्नॉलॉजीजकडे असून, कंपनीने गेल्या वर्षापासून एसर वातानुकूलन यंत्र आणि वॉशिंग मशीन भारतीय बाजारात दाखलदेखील केली आहेत. याच धर्तीचा परवाना कंपनीने ब्लॅक ॲण्ड डेकर या अमेरिकी कंपनीकडूनही मिळविला असून, त्यांचीही गृहोपयोगी उत्पादनांची श्रेणी इंडकलद्वारे बाजारात दाखल झाली आहे. शिवाय ‘वॉबल’ या नाममुद्रेने स्व-विकसित स्मार्टवॉच व ऑडियो उत्पादनांची मालिका इंडकलने दाखल केल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>>सेवा क्षेत्राची उच्चांकी सक्रियता, ऑगस्ट महिन्यात पीएमआय निर्देशांक ६०.९ गुणांवर

फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन यांसारख्या प्रमुख ई-कॉमर्स मंचांशी सहयोगासह, इंडकल टेक्नॉलॉजीजने त्यांच्या उत्पादनांसाठी देशभरात वितरक आणि विक्रेत्यांचे मजबूत जाळे विणले आहे. देशभरात १८,००० हून अधिक पिन कोड क्रमांकावर ही उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचतील, असे भक्कम वितरण जाळे हा इंडिकलचा सशक्त आधार असून, वाढत्या विक्रीतूनही हे प्रतिबिंबित होते, असे जाधव म्हणाले. साधारण १५ हजार ते ५० हजार रुपये किमत श्रेणीतील एसर स्मार्टफोनच्या मालिकेसह, नजीकच्या भविष्यात येऊ घातलेल्या अन्य दर्जेदार उत्पादनांसह, सध्या ७५० कोटी रुपये असलेली उलाढाल, पुढील दीड वर्षात २,००० कोटी रुपयांवर जाणे अपेक्षित असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. सध्या वेगवेगळ्या कंत्राटी उत्पादकांकडून तयार केली जात असलेली उत्पादने स्वतःच्या उत्पादन प्रकल्पांमधून २०२६ च्या मध्यापासून उत्पादित करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.