मुंबई: अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांना सोमवारी बाजार नियामकांविरुद्ध हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपांमुळे सत्रारंभी पडझडीचा फटका बसला. मात्र व्यापक बाजारातील कलाटणीमुळे समूहातील १० पैकी दोन कंपन्यांनी घसरणीला झटकत वाढ साधली. तरी एकंदरीत अदानी समभागांना २२,०६४ कोटी रुपयांचे बाजार भांडवल नुकसान सोसावे लागले. हिंडेनबर्ग रिसर्च आणि अदानी समूहातील संघर्ष १८ महिन्यांपूर्वी सुरू झाला. सेबीप्रमुखांविरोधातील ताज्या आरोपांनंतरही, सोमवारी भांडवली बाजार सुरू होताच अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग कोसळले. अदानी समूहातील सूचिबद्ध १० पैकी आठ कंपन्यांच्या समभागात सोमवारी घसरण नोंदविण्यात आली. मुंबई शेअर बाजार बंद होताना अदानी विल्मारच्या समभागात सर्वाधिक ४.१४ टक्क्यांची घसरण नोंदविण्यात आली. त्याखालोखाल अदानी टोटल गॅस ३.८८ टक्के, अदानी एनर्जी सोल्यूशन्स ३.७०, एनडीटीव्ही ३.०८, अदानी पोर्ट्स २.०२, अदानी एंटरप्रायझेस १.०९, एसीसी ०.९७ आणि अदानी पॉवर ०.६५ टक्के अशी घसरण झाली. याचवेळी समूहातील दोन कंपन्यांचे समभाग - अंबुजा सिमेंट ०.५५ टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जी ०.२२ टक्के वाढीसह बंद झाले.