लोकसत्ता व्यापार प्रतिनिधीमुंबई : सामान्य विमा क्षेत्रातील सरकारी मालकीची कंपनी असलेल्या जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या (जीआयसी) आंशिक भागभांडवली हिस्सा विक्री अर्थात ऑफर फॉर सेलसाठी (ओएफएस) संस्थात्मक गुंतवणूकदारांनी बुधवारी सुमारे २,३०० कोटी रुपयांच्या बोली लावल्या. विद्यमान आर्थिक वर्षातील पहिली सरकारी निर्गुंतवणूक असलेल्या जीआयसीच्या ‘ओएफएस’ला गुंतवणूकदारांकडून कमी प्रतिसाद दिसून आला. मुंबई शेअर बाजारच्या आकडेवारीनुसार, बाजाराच्या कामकाजाचा कालावधी संपण्याआधी ‘ओएफएस’चा भरणा पूर्ण झाला. बिगर किरकोळ गुंतवणूकदारांकडून ५.८१ कोटी समभागांची बोली प्राप्त झाली. जे त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या ५.३५ कोटी समभागांच्या १०८.४९ टक्के आहे. आता किरकोळ गुंतवणूकदारांना गुरुवारी ओएफएससाठी बोली लावता येईल. जीआयसीने प्रति समभाग ३९५ रुपये किंमत निश्चित केली आहे. कंपनीने ग्रीन-शूचा अर्थात अधिक भरणा झाल्यास तो राखून ठेवण्याचा पर्यायदेखील निश्चित केला आहे. त्यामुळे ‘ओएफएस’च्या माध्यमातून ६.७८ टक्क्यांपर्यंत समभाग विक्री केली जाऊ शकते. हेही वाचा >>>Stock Market Today : ‘निफ्टी’ची १४ सत्रांतील अविरत तेजीनंतर माघार; ‘सेन्सेक्स’मध्ये दोन शतकी घसरण समभाग कोसळला जीआयसीच्या ‘ओएफएस’ला संस्थात्मक गुंतवणूदारांकडून कमी प्रतिसाद मिळाल्याने बुधवारच्या सत्रात समभाग ५.६४ टक्क्यांची घसरण झाली. दिवसअखेर तो २३.८० रुपयांच्या घसरणीसह ३९७.८५ रुपयांवर बंद झाला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे ६९,७९८ कोटी रुपयांचे बाजार भांडवल आहे.