लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : येत्या काही महिन्यांमध्ये महत्त्वाच्या राज्यांत विधानसभा निवडणुका असल्याने त्याआधी पुढील तीन ते चार महिन्यांत प्राथमिक बाजारात खुल्या समभाग विक्री अर्थात ‘आयपीओ’ची नवीन लाट येण्याची शक्यता आहे. ३० हून अधिक कंपन्या येत्या काही महिन्यांत गुंतवणूकदारांना अजमावणार असून, या माध्यमातून ५०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. त्यापैकी तब्बल २४ कंपन्या ३०,००० कोटी रुपयांहून अधिक निधी उभारतील, असे संकेत आहेत.

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’ने गुरुवारी ओला इलेक्ट्रिक, एमक्युअर फार्माला प्रारंभिक समभाग विक्रीसाठी मंजुरी दिली. तर ह्युंदाईने २५,००० कोटींच्या महाकाय आयपीओसाठी, तर त्यापाठोपाठ गृहवित्त क्षेत्रात बजाज हाऊसिंग फायनान्सदेखील ‘सेबी’कडे मसुदा प्रस्ताव दाखल केला आहे.

विद्युतशक्तीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकचा आयपीओच्या माध्यमातून ७,२५० कोटी रुपये उभारणार आहे. लवकरच कंपनीकडून समभाग विक्रीसाठी किंमतपट्टा आणि तारीख जाहीर करण्यात येईल. ओला इलेक्ट्रिकने २२ डिसेंबर २०२३ रोजी मसुदा प्रस्ताव बाजार नियामकाकडे दाखल केला होता. त्यानुसार, ती ५,५०० कोटी रुपयांच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. तर प्रवर्तकांकडील १,७५० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची आंशिक विक्री (ओएफएस) या माध्यमातून केली जाणार आहे. विद्यमान भागधारक ‘ओएफएस’च्या माध्यमातून सुमारे ९.५१ कोटी समभाग विकणार आहेत. यामध्ये ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक भाविश अग्रवाल ४.७३ कोटी समभाग विकतील. आयपीओच्या माध्यमातून मिळालेला निधी भांडवली गुंतवणूक, कर्जाची परतफेड, संशोधन व विकासासाठी कंपनीकडून करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>ऑनलाइन गेमिंगवरील कर केंद्रस्थानी, जीएसटी परिषदेची शनिवारी बैठक; स्पेक्ट्रम शुल्कावरही चर्चा अपेक्षित

याबरोबरच एमक्युअर फार्मास्युटिकल्स ८०० कोटी रुपये मूल्याचे नवीन समभाग तर भागधारक आणि प्रवर्तकांकडील १.३६ कोटी समभागांची आंशिक विक्री (ओएफएस) या माध्यमातून भांडवली बाजारात दाखल होत आहे. ओएफएसच्या माध्यमातून समभागांची विक्री करणाऱ्यांमध्ये प्रवर्तक सतीश मेहता आणि गुंतवणूकदार बीसी इन्व्हेस्टमेंट यांचा समावेश आहे. सध्या, सतीश मेहता यांच्याकडे कंपनीची ४१.९२ टक्के आणि बीसी इन्व्हेस्टमेंट्सकडे १३.०९ टक्के हिस्सेदारी आहे.

येत्या आठवड्यातील आयपीओ

अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स

ऑफिसर्स चॉइस व्हिस्कीच्या निर्मात्या अलाइड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स लिमिटेडने सुमारे १,५०० कोटींची प्रारंभिक समभाग विक्री जाहीर केली आहे. येत्या २५ जूनपासून या आयपीओसाठी अर्ज करता येणार असून २७ जूनपर्यंत तो खुला असेल. यासाठी कंपनीने २६७ ते २८१ रुपये प्रति समभाग किंमतपट्टा निश्चित केला आहे. मुंबईस्थित कंपनी १,००० कोटी रुपये मूल्याच्या नवीन समभागांची विक्री करणार आहे. तर प्रवर्तकांकडील ५०० कोटी रुपये मूल्याच्या समभागांची ‘ओएफएस’द्वारे विक्री केली जाणार आहे. आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या एकूण निधीपैकी ७२० कोटी रुपयांचा निधी कर्जाच्या भरणासाठी वापरली जाईल. डिसेंबर २०२३ पर्यंत कंपनीवर सुमारे ८०८ कोटी रुपयांचे एकूण कर्ज आहे. कंपनीच्या काही प्रमुख नाममुद्रांमध्ये ऑफिसर्स चॉइस व्हिस्की, स्टर्लिंग रिझर्व्ह व्हिस्की, जॉली रॉजर रम आणि क्लास २१ व्होडका यांचा समावेश आहे.

डिव्हाइन पॉवर एनर्जी

इन्सुलेटेड वायर्स आणि स्ट्रिप्सची उत्पादक कंपनी डिव्हाइन पॉवर एनर्जी लिमिटेडची समभाग विक्री येत्या २५ ते २७ जून दरम्यान पार पडणार आहे. यासाठी कंपनीने ३६ रुपये ते ४० रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. यातून कंपनीचा २२.७६ कोटींचा निधी उभारणीचा मानस असून त्यातही ५६.९० लाख नवीन समभागांची विक्री करण्यात येईल. उभारलेला एकूण निधीपैकी १८ कोटी त्याच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गुंतवणूकदार किमान ३,००० समभागांसाठी आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. विक्रीपश्चात कंपनीचे समभाग ‘एनएसई इमर्ज’ या बाजारमंचावर सूचिबद्ध केले जातील.