मुंबई : समूहातील कंपन्यांतील प्रवर्तकांचे समभाग गहाण ठेवून मिळविलेल्या सर्व कर्जाची परतफेड केल्याच्या दाव्यासंबंधाने साशंकतेने अदानी समूहातील सर्व १० कंपन्यांचे समभाग मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात लक्षणीय प्रमाणात घसरले. चार कंपन्यांचे समभाग तर पाच टक्क्यांच्या खालच्या सर्किटपर्यंत गडगडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी विल्मर या चार कंपन्यांचे समभाग मंगळवारच्या सत्रात ५ टक्के खालच्या सर्किटपर्यंत लोळण घेताना दिसले. अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्स हे निफ्टी निर्देशांकात सामील दोन समभागही मागील बंदच्या तुलनेत अनुक्रमे ७ टक्के आणि ५ टक्क्यांनी गडगडले. अदानींच्या मालकीचे अंबुजा सिमेंट आणि एसीसीचे समभाग १.२ ते २.८ टक्क्यांच्या श्रेणीत खाली आले. एनडीटीव्हीचा समभागही ४ टक्क्यांहून अधिक घसरला.

हेही वाचा >>> डिमॅट, ट्रेडिंग खातेधारकांना नामनिर्देशनासाठी मुदतवाढ

एकंदर पडझडीमुळे अदानी समूहाच्या समभागांच्या एकत्रित बाजार भांडवलात, २७ मार्च अखेरीस असलेल्या ९.३९ लाख कोटी रुपये पातळीवरून ८.८९ लाख कोटी रुपयांपर्यंत घसरण झाली. म्हणजेच एका सत्रात तब्बल ५०,१७० कोटी रुपयांचे नुकसान अदानी समूहाला सोसावे लागले. मंगळवारी भांडवली बाजाराच्या सत्रअखेरीस, राष्ट्रीय शेअर बाजार अर्थात ‘एनएसई’ने अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडकडून अलीकडील एका बातमीच्या संदर्भात स्पष्टीकरण मागितले. या बातमीमध्ये अदानी समूहाने प्रवर्तकांचे समभाग गहाण ठेवून मिळविलेल्या सर्व कर्जाची परतफेड केल्याचा दावा करण्यात आला आहे. तथापि, या त्यांच्या दाव्याबाबत प्रश्न उपस्थित करणारे वृत्तही मंगळवारी प्रसिद्ध झाले आहे. या परस्परविरोधी बातम्यांमुळे गुंतवणूकदारांचा कल नकारात्मक बनवला आणि याच भावनेतून समूहातील कंपन्यांच्या समभागांची विक्रीही सलग दोन सत्रांमध्ये वाढल्याचे आढळून आले.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adani 10 stocks fall for second consecutive session zws
First published on: 29-03-2023 at 11:00 IST