वृत्तसंस्था, नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून संकटांनी घेरल्या गेलेल्या अदानी समूहाने, यादरम्यान काही कंपन्यांची मुख्यालये मुबंईतून अहमदाबादला हलविली आहेत. यात एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांतील महत्त्वाच्या विभागांचे कामकाज सध्या अहमदाबादमधून सुरूही झाले आहे. उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात ६.५ अब्ज डॉलरला एसीसी आणि अंबुजा सिमेंट या कंपन्यांची खरेदी केली. तेव्हा या कंपन्यांची मुख्यालये मुंबईत होती. या कंपन्यांचा ताबा मिळाल्यानंतर त्यातील प्रमुख विभागांचे कामकाज अहमदाबादला हलवण्यात आले. त्यामुळे या कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज तेथून होऊ लागले आहे. कंपनीतील अनेक वरिष्ठ अधिकारी हे अहमदाबादमध्ये आणि त्यांचे कनिष्ठ अधिकारी मुंबईत अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांना वारंवार एका शहरातून दुसऱ्या शहरात चकरा माराव्या लागत आहेत. या त्रासाला कंटाळून अनेक जण बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. कंपन्यांचे प्रशासकीय कामकाज दोन शहरांमध्ये विभागले गेल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. यामुळे अनेकांनी अन्य संधींचा शोध सुरू केला आहे. एसीसी आणि अंबुजा सिमेंट या दोन्ही कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी प्रतिस्पर्धी कंपन्यांकडील रिक्त जागांची विचारणा करीत असल्याचे दिसत आहे. दोन्ही कंपन्यांचे मिळून सुमारे १० हजार मनुष्यबळ मुंबईत कार्यरत आहे. एसीसीमध्ये सहा हजार तर अंबुजा सिमेंटमध्ये ४,७०० कर्मचारी आहेत, असे सूत्रांनी सांगितले.