मुंबई : बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत विस्तार फैलावलेल्या अदानी समूहातील प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेसने २५,००० कोटी रुपयांची निधी उभारण्याची योजना आखली आहे. हक्कभाग (राइट्स इश्यू) विक्रीसाथ कंपनीने १७ नोव्हेंबर ‘रेकॉर्ड तारीख’ निश्चित केली आहे.
अदानी एंटरप्रायझेस १३.८५ कोटी समभाग विक्री करणार आहे. राईट्स इश्यूद्वारे एकूण २४,९३० कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. यासाठी प्रति समभाग १,८०० किंमत निश्चित करण्यात आली आहे, जी मंगळवारच्या सत्रातील अदानी एंटरप्रायझेसच्या बंद किमतीपेक्षा २४ टक्के सवलत दर्शवते आहे. राईट्स इश्यूसाठी १७ नोव्हेंबर ‘रेकॉर्ड तारीख’ निश्चित करण्यात आली आहे. ज्या भागधारकांकडे १४ नोव्हेंबर रोजी अदानी एंटरप्रायझेसचे समभाग असतील तेच भागधारक राइट्स इश्यू योजनेत सहभागी होण्यास पात्र असतील.
अदानी एंटरप्रायझेसच्या पात्र भागधारकांना त्यांच्याकडे असलेल्या २५ समभागांमागे प्रत्येकी तीन समभाग राईट्स इश्यूच्या माध्यमातून मिळवता येऊ शकतील. या हक्कभाग विक्रीतून मिळणारा निधी पायाभूत सुविधा उपक्रमांमध्ये आणि कंपनीच्या विस्तार मोहिमेसाठी वापरला जाणार आहे. याआधी जुलै महिन्यात अदानी एंटरप्राइजेसने १,००० कोटी रुपयांच्या अपरिवर्तनीय रोख्यांची विक्री केली होती. त्याला गुंतवणूकदारांकडून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता. या रोख्यांसाठी अवघ्या तीन तासांत १०० टक्के भरणा झाला होता.
त्याआधी जानेवारी २०२३ मध्ये अदानी एंटरप्राइजेसने ‘एफपीओ’द्वारे समभागांची विक्री करून २०,००० कोटी रुपयांची निधी उभारणीची घोषणा केली होती. ही देशाच्या भांडवली बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी समभाग विक्री होती. मात्र हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील अनियमितता आणि लबाड्यांच्या आरोपांनी अदानी समूहातील समभागांची मोठी वाताहात झाली होती. हे पाहता प्रतिकूल बाजार परिस्थितीचे कारण सांगत कंपनीने ‘एफपीओ’मध्ये भरणा पूर्ण होऊनही, त्यातून माघारीची घोषणा केली होती.
