scorecardresearch

अदानी समूह समभाग विक्रीतून २०,००० कोटी उभारणार, कर्जभार कमी करण्यासाठी योजना

येत्या २७ जानेवारीला ही समभाग विक्री खुली होत असून गुंतवणूकदारांना त्यात ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.

अदानी समूह समभाग विक्रीतून २०,००० कोटी उभारणार, कर्जभार कमी करण्यासाठी योजना
अदानी समूह समभाग विक्रीतून २०,००० कोटी उभारणार, कर्जभार कमी करण्यासाठी योजना ( संग्रहित छायाचित्र )

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : बंदरांपासून ऊर्जा क्षेत्रापर्यंतच्या विविध क्षेत्रांत प्रस्थापित असलेल्या अदानी समूहाने, अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या ‘फॉलो-ऑन पब्लिक ऑफर -एफपीओ’द्वारे समभागांची विक्री करून २०,००० कोटी रुपये उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. येत्या २७ जानेवारीला ही समभाग विक्री खुली होत असून गुंतवणूकदारांना त्यात ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करता येईल.

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचा ‘एफपीओ’च्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या २०,००० कोटी रुपयांपैकी १०,८६९ कोटी रुपये ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, विद्यमान विमानतळांवरील कामे आणि एक्स्प्रेसवेच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहेत. तर ४,१६५ कोटी रुपये विमानतळ, रस्ते आणि सौर प्रकल्प उपकंपन्यांनी घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी वापरले जाणार आहेत.

अदानी एंटरप्रायझेस ही ऊर्जा आणि उपयुक्तता, वाहतूक व लॉजिस्टिक, ग्राहकोपयोगी सेवा आणि प्राथमिक उद्योग या चार प्रमुख उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे. त्याचबरोबर मुंबई, अहमदाबाद, लखनऊ, मंगळूरु, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम या सात शहरांमधील विमानतळांचे व्यवस्थापनाचा व्यवसायही तिच्याकडे आहे. अदानी समूहाने गेल्या काही वर्षांत बंदरे, वीज केंद्रे आणि खाणकाम यांच्या संचालनाच्या मुख्य उद्योगांपलीकडे जाऊन विमानतळे, डेटा सेंटरपर्यंतच्या विविध क्षेत्रांत मजल मारली असून, गेल्या वर्षी पहिल्यांदाच सिमेंट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. अंबुजा आणि एसीसी सिमेंट कंपनी खरेदी केल्यानंतर अदानी समूह हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक बनला आहे.

अदानी एंटरप्रायझेस समभागाची कामगिरी कशी?

अदानी एंटरप्रायझेसचा समभाग गेल्या वर्षी जानेवारी २०२२ मध्ये १,८२८ रुपयांवर व्यवहार करत होता. तो विद्यमान महिन्यात (जानेवारी २०२३) बुधवारच्या सत्रात ३,५८४.९० पातळीवर बंद झाला, वर्षभरात समभागाचे मूल्य दुपटीहून अधिक वधारले आहे. तर त्या तुलनेत बाजारातील मोठ्या चढ-उतारांमुळे सेन्सेक्स जानेवारी २०२२ मध्ये असलेल्या ६१,०४५ अंशांच्या पातळीजवळच सध्या व्यवहार करत आहे.

‘एफपीओ’ म्हणजे काय?

भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनीला भविष्यात आणखी व्यवसाय विस्तार करण्यासाठी भांडवली आवश्यकता भासल्यास कंपनी पुन्हा एकदा समभाग विक्री करते, म्हणजेच त्याला फॉलोऑन पब्लिक ऑफर अर्थात ‘एफपीओ’ असे म्हणतात.

सवलतीत समभाग खरेदीची संधी

अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडच्या ‘एफपीओ’साठी ३,११२ ते ३,२७६ रुपयांचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. सध्याच्या समभागाच्या बाजारभावापेक्षा १३.५ टक्के सवलतीच्या दराने त्यामुळे हा समभाग गुंतवणूकदारांना मिळविता येईल. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान ४ आणि त्यानंतरच्या ४ च्या पटीत समभागांसाठी बोली लावून, कंपनीच्या या भागविक्रीत सहभागी होता येईल.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 10:37 IST

संबंधित बातम्या