Adani Power Pvt Ltd Godda Project: गेल्या महिन्यात बांगलादेशमध्ये जनता रस्त्यावर उतरली आणि व्यापक आंदोलन झालं. यामध्ये मोठ्या संख्येनं तरुण होते. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटनाही घडल्या. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर बांगलादेशच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार होऊन देश सोडावा लागला. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं. त्याचवेळी अदाणींच्या गोड्डा येथील वीज प्रकल्पातून बांगलादेशला पुरवल्या जाणाऱ्या विजेचं काय होणार? अशी चर्चा सुरू झाली होती. ठरल्याप्रमाणे वीजपुरवठा कायम राहील असं तेव्हा ‘अदाणी’कडून सांगण्यात आलं होतं. आता मात्र अदाणींनी बांगलादेशला इशारा दिला आहे.

झारखंडच्या गोड्डा येथील वीज प्रकल्पातून बांगलादेशला वीज पुरवली जाते. हा प्रकल्प अदाणींचा असून २०१७ साली या प्रकल्पातील वीजपुरवठ्यासंदर्भात करार झाला होता. अदाणी पॉवर लिमिटेडनं बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड अर्थात बीपीपीबीशी २५ वर्षांसाठी हा करार केला आहे. या प्रकल्पातून बांगलादेशला १४९६ मेगावॅट वीज पुरवण्यासंदर्भात करार आहे. या प्रकल्पाची १०० टक्के वीज बांगलादेशला पुरवली जात आहे. २०२३ पासून या कराराची अंमलबजावणी सुरू झाली.

१०० टक्के वीज निर्यात करणारा एकमेव प्रकल्प

दरम्यान, या प्रकल्पातून होणार्‍या वीजपुरवठ्याची मोठ्या प्रमाणावर थकबाकी प्रलंबित असून बांगलादेशमधील बदललेल्या राजकीय स्थितीमुळे या थकबाकीच्या वसुलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या थकबाकीचा आकडा जवळपास ५० कोटी अमेरिकी डॉलर्स इतका प्रचंड आहे. यासंदर्भात अदाणी समूहाने बांगलादेश सरकारला इशारा दिल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं ब्रिटनमधील फायनान्शियल टाईम्सच्या हवाल्याने दिलं आहे. बांगलादेशकडे असणारी या प्रकल्पाची ही थकबाकी चिरकाल राहणार नसून त्यांनी ती फेडावी लागणार आहे, असे सूतोवाच कंपनीकडून करण्यात आले आहेत. गोड्डा हा १०० टक्के उत्पादित वीज निर्यात करणारा भारतातील एकमेव प्रकल्प आहे.

“आम्ही सातत्याने बांगलादेशमधील हंगामी सरकारच्या संपर्कात आहोत आम्ही त्यांना सध्याच्या परिस्थितीची जाणीव करून दिली आहे. आम्ही त्यांना सांगितलंय की एकीकडे ५० कोटी डॉलर्सची थकबाकी झालेली असूनही आम्ही फक्त आमचा वीजपुरवठा ठरल्याप्रमाणे करतोय असं नाही, तर आम्ही ज्यांच्याकडून निधी घेतला आहे आणि ज्यांच्याकडून आम्हाला कच्चा माल पुरवला जातो, त्यांच्याशीही आम्ही योग्य व्यवहार राखला आहे”, असं अदाणी पॉवर लिमिटेडनं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, थकबाकीच्या वाढत्या रकमेबाबत अप्रत्यक्षपणे अदाणी पॉवर लिमिटेडनं चिंता व्यक्त केली असली, तरी गोड्डामधून बांगलादेशला वीजपुरवठा कायम ठेवला जाईल, असंही समूहाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Bangladesh Political Crisis: बांगलादेशात अस्थिरता; आता अदाणींच्या ‘त्या’ कराराचं काय होणार? कंपनीचे प्रवक्ते म्हणाले…

बांगलादेशसमोर आर्थिक संकट!

दरम्यान, नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांच्या अध्यक्षतेखाली बांगलादेशमधील हंगामी सरकारसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. देशाला आर्थिक संकटातून वाचवण्यासाठी बांगलादेश सरकारनं अनेक आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांकडून कर्जाची मागणी केली आहे. यामध्ये वर्ल्ड बँकचाही समावेश आहे.