scorecardresearch

ॲमेझॉनकडून नोकरकपातीला सुरुवात; अमेरिका, कॅनडा आणि कोस्टारिकामधील कर्मचाऱ्यांना नारळ

जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरण आणि गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने केलेल्या आक्रमक भरतीमुळे चालू वर्षांत परिस्थितीच्या पुनरावलोकनाची ही वेळ ओढवली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

ॲमेझॉनकडून नोकरकपातीला सुरुवात; अमेरिका, कॅनडा आणि कोस्टारिकामधील कर्मचाऱ्यांना नारळ
ॲमेझॉनकडून नोकरकपातीला सुरुवात; अमेरिका, कॅनडा आणि कोस्टारिकामधील कर्मचाऱ्यांना नारळ ( संग्रहित छायाचित्र )

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ई-व्यापार क्षेत्रातील जागतिक महाकाय कंपनी ॲमेझॉनने चालू वर्षात जागतिक पातळीवर १८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला असून, त्याची सुरुवात अमेरिका, कॅनडा आणि कोस्टारिकापासून तिने केली आहे. तेथील काही कर्मचाऱ्यांना कंपनीकडून बुधवारी नोटीस बजावण्यात आली.

कंपनीने वरिष्ठ श्रेणीतील नोकरकपात टप्प्याटप्प्याने राबवत, पुढील वर्षांत ती अधिक गतिमान केली जाईल, असा इशारा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ॲमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी दिला होता. जागतिक पातळीवरील प्रतिकूल परिस्थिती आणि व्यवसायातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने गेल्या काही महिन्यांत आपल्या व्यवसायाच्या विविध क्षेत्रांमध्ये काटकसर आणि खर्चात कपात सुरू केली आहे.

Spotify Layoff: Spotify करणार पुन्हा कर्मचाऱ्यांची कपात, जाणून घ्या काय आहे प्रकरण ?

कंपनीतील एकूण कार्यरत ३ लाख कर्मचाऱ्यांपैकी ६ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार असून त्याचा सर्वाधिक परिणाम ई-कॉमर्स आणि मानव संसाधन विभागांवर होण्याची शक्यता वर्तविली आहे. काही कर्मचाऱ्यांना ऐच्छिक निवृत्तीचा पर्यायदेखील देऊ केल्याची माहिती ॲमेझॉनने दिली. याव्यतिरिक्त आणखी कुठे खर्चात बचत केली जाऊ शकते अशा विविध पर्यायांचा शोध घेतला जात आहे. जागतिक पातळीवरील प्रतिकूल वातावरण आणि गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने केलेल्या आक्रमक भरतीमुळे चालू वर्षांत परिस्थितीच्या पुनरावलोकनाची ही वेळ ओढवली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

बड्या ‘टेक’ कंपन्या इतकी घाऊक कर्मचारी कपात करतात, हे लक्षण कशाचं?

जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर

जागतिक स्तरावर अनेक मोठय़ा तंत्रज्ञान कंपन्यांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येऊ घातले आहे. जागतिक मंदीचे संकट अधिक गडद होत असल्याने महाकाय अमेरिकी कंपन्यांनी नोकरकपातीचा वेग वाढविला आहे. या मालिकेत तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पने आर्थिक वर्ष २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीच्या अखेरीस १०,००० कर्मचारी म्हणजेच सुमारे ५ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची योजना पटलावर आणली आहे. तसेच मेटानेदेखील गेल्या वर्षी ११,००० नोकऱ्या कमी करण्याची घोषणा केली आणि इलॉन मस्क यांनी ताबा मिळविल्यापासून ट्विटरच्या मनुष्यबळात निम्म्याने कपात झाली आहे.

आधी ऑफिसला घाईत बोलावलं, मग म्हणाले, … Out! Amazon चा कर्मचाऱ्यांना मोठा दणका!

भारतात ‘स्विगी’ची नोकरकपातीची योजना

ॲपवर आधारित घरोघरी खाद्यपदार्थाचा बटवडा करणारे व्यासपीठ असलेल्या ‘स्विगी’कडून नोकरकपातीची शक्यता आहे. जागतिक प्रतिकूलतेपायी कंपन्यांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागत असून निधीच्या कमतरतेअभावी स्विगीकडून ८ ते १० टक्के म्हणजेच ६,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करेल, असे वृत्त ‘फायनान्शियल एक्प्रेस’ने दिले आहे. नियोजित नोकरकपातीचा सर्वाधिक परिणाम उत्पादन, अभियांत्रिकी आणि कार्यकारी विभागातील कर्मचाऱ्यांवर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात तंत्रज्ञान आधारित कंपन्यांची भांडवली बाजारातील कामगिरी निराशाजनक राहिली. त्या परिणामी नव्याने भांडवली बाजारात प्रवेश करू इच्छिणाऱ्या अनेक तंत्रज्ञानाधारित कंपन्यांनी भांडवल उभारणीची योजना गुंडाळली आहे. त्यामुळे त्यातील बहुतांश कंपन्यांना निधीची चणचण जाणवू लागल्याने खर्च कपातीसाठी नोकरकपातीचा मार्ग अनुसरला जात आहेत. स्विगीची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या झोमॅटोने गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२२ मध्ये ३,८०० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 10:33 IST

संबंधित बातम्या