पुणे: स्विगी, झोमॅटोकडून १० मिनिटांत किराणा वस्तू घरपोच दिल्या जातात, त्याच धर्तीवर ई-कॉमर्स क्षेत्रातील ॲमेझॉनची द्रुत व्यापार (क्विक कॉमर्स) सेवा सध्या बंगळुरूमध्ये सुरू झाली असून, महाराष्ट्रात देखील ही सेवा लवकरच सुरू होणे अपेक्षित आहे.

ॲमेझॉनचे उत्पादन व्यवस्थापन संचालक विक्रम देशपांडे या संबंधाने माहिती देताना म्हणाले की, आम्ही बंगळुरूमध्ये मर्यादित भागात सध्या क्यू-कॉमर्स सेवा सुरू केली आहे. यात उत्पादनांची व्यापक श्रेणी, त्यांची गुणवत्ता आणि ती जलद ग्राहकांपर्यंत पोहोचविणे या तीन गोष्टींवर आम्ही भर देत आहोत. याचबरोबर ग्राहकांना आकर्षक किमतीत आम्ही उत्पादने देत आहोत. त्यामुळे क्यू-कॉमर्स क्षेत्रात आम्ही उशिराने प्रवेश करीत असलो तरी आम्ही या बाजारपेठेत स्थान निर्माण करू. या सेवेचा विस्तार लवकरच महाराष्ट्रात केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ॲमेझॉनने लहान व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी ‘रेफरल शुल्का’त कपात केली आहे. ‘रेफरल शुल्क’ म्हणजे ॲमेझॉन व्यासपीठावर विकल्या जाणाऱ्या प्रत्येक उत्पादनासाठी आकारली जाणारी अडत (कमिशन) असून, जे विक्री किंमतीच्या टक्केवारीत मोजले जाते. कंपनीने ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या १.२ कोटी उत्पादनांवर हे शुल्क आता शून्यावर आणले आहे. याचा फायदा १३५ श्रेणींतील उत्पादनांना होत आहे. याचबरोबर कंपनीने १ किलोपेक्षा हलक्या वजनाच्या वस्तूंसाठी वजन हाताळणी शुल्कात देखील १७ रुपयांपर्यंत कपात केली आहे. यामुळे विक्रेत्यांना उत्पादनांची वाजवी किंमत राखणे शक्य होत असून, त्यांच्या व्यवसाय वृद्धीसही यातून हातभार लागत आहे, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.

व्यवसायात वाढ

यावेळी पुण्यातील ॲमेझॉनवरील विक्रेते व पॅन्का कंपनीचे मालक गोपाळ अगरवाल म्हणाले की, आमचा ॲमेझॉनवरील प्रवास केवळ १० उत्पादनांपासून सुरू झाला होता. आता आमची दोनशेहून अधिक उत्पादने आहेत. ॲमेझॉनने रेफरल शुल्कात कपात केल्याचा फायदा आम्हाला होत आहे. त्यामुळे आम्ही उत्पादनांच्या किमती ग्राहकांसाठी कमी करू शकलो आहोत. त्यातून आमची विक्री वाढून व्यवसायात वाढ होत आहे.