कोल्हापूर : बांगलादेशात निर्माण झालेल्या अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा भारतीय वस्त्रोद्याोगाला होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. विशेषत तयार कपडे (गारमेंट) निर्यातीत बांगलादेशचे स्थान पाहता, ही मागणी भारताकडे वळण्याची शक्यता वस्त्रोद्योगातून व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम म्हणून देशातील प्रमुख वस्त्रोद्याोग निर्यातदार कंपन्यांच्या समभागांचे मूल्यही मंगळवारी वधारले.

पाच दशकांच्या प्रयत्नानंतर बांगलादेश वस्त्रोद्योगातील अग्रणी निर्यातदार देश झाला आहे. आता तेथील अस्थिर परिस्थितीचा विपरीत परिणाम वस्त्रोद्योगावरही दिसू लागला आहे. बांगलादेश टेक्स्टाईल मिल असोसिएशनने त्यांचे उत्पादन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामस्वरूप सध्या या देशाकडे अन्य देशांची असलेली तयार कपड्यांची मागणी रद्द होण्याची शक्यता आहे. अशा वेळी भारताला यातून मोठी संधी मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> Stock Market Today : अस्थिरतेच्या छायेत ‘सेन्सेक्स’ची १६६ अंश माघार

याबाबतीत भारत व बांगलादेश दरम्यान असलेल्या वस्त्रोद्योग संबंधाचे उदाहरण खूप बोलके आहे. २०२३-२४ मध्ये भारतातून बांगलादेशाला १२२.२ कोटी डॉलरची सूत निर्यात झाली होती, तर बांगलादेशातून भारतात याच काळात २५३.२ कोटी डॉलर किमतीच्या तयार कपड्यांची आयात झाली.

वस्त्र निर्यातदार कंपन्यांचे समभाग वधारले

बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीचा लाभ भारताला होऊ शकतो याचे संकेत मिळताच त्याचा परिणाम शेअर बाजारातही दिसला. भारतातील प्रमुख वस्त्रोद्याोग निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकलदास एक्सपोर्ट, सेंच्युरी एन्का, किटेक्स गारमेंट्स, एस. पी. अॅपरल्स कंपन्यांच्या समभागांचे मूल्य मंगळवारी वधारले. बाजारात अन्यत्र पडझड होत असताना वस्त्रोद्याोगाने अपेक्षा उंचावल्या आहेत.

बांगलादेशमधील अस्थिरतेमुळे वस्त्रोद्याोगातील २० टक्के व्यवसाय जरी भारताकडे वळू शकला तरी ती भारतासाठी पर्वणी ठरेले. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणात काम आले, तरी ते पूर्ण करण्याची आपली क्षमता आहे का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. भारतात स्थिर राजकीय स्थिती, करोनानंतर वस्त्रोद्याोगाला मिळालेली चालना ही आपली पूरक बाजू आहे. भारताने ही संधी गमावू नये. – निकुंज बगाडिया, वस्त्रोद्योग निर्यातदार

सुमारे ४०० कोटी रुपयांची मागणी नजीकच्या काळात भारताकडे येण्याचा अंदाज आहे. मात्र याच वेळी चीन, व्हिएतनामसारखे देश या स्पर्धेत उतरणार असल्याने भारताला ही बाजारपेठ मिळवण्याच्या गतीने प्रयत्न आणि केंद्राकडून या प्रयत्नांना सहाय्य गरजेचे आहे.

गजानन होगाडेसंचालक, पॉवरलूम डेव्हलपमेंट अँड एक्स्पोर्ट प्रोमोशन कौन्सिल (पीडीक्सेल)