मुंबई : कोकिंग कोळशाची अग्रगण्य उत्पादक आणि कोल इंडिया लिमिटेड या महारत्न कंपनीची उपकंपनी असलेल्या भारत कोकिंग कोल लिमिटेडचे शेअर्स सोमवारी बाजारातील पदार्पणातच जवळपास दुपटीने वधारले. या सरकारी मालकीच्या कंपनीच्या मागील आठवड्यात पार पडलेल्या प्रारंभिक सार्वजनिक विक्रीने (आयपीओ) देखील तब्बल १४७ पटीने अधिक भरणा पूर्ण करणारा प्रतिसाद गुंतवणूकदारांकडून मिळविला होता. तर २०२६ मधील या पहिल्या सूचिबद्धतेने गुंतवणूकदारांना दोन वर्षांतील सर्वोत्तम लाभही मिळवून दिला.
भारत कोकिंग कोलचे शेअर्स सकाळी औपचारिक सूचिबद्धतेनंतर, राष्ट्रीय शेअर बाजारावर ९५.७ टक्के जास्त अधिमूल्य दर्शवत ४५ रुपयांना सूचीबद्ध झाले. पुढे या उच्चांकाला ते टिकवू शकले नसले तरी ४०.५८ रुपये अर्थात ७७ टक्के अधिमूल्यासह दिवसअखेरीस स्थिरावले. भांडवली बाजाराला मंदीने घेरले असताना आणि सेन्सेक्स-निफ्टी या प्रमुख निर्देशांक जवळपास अर्धा टक्क्यांनी घसरणीला असताना गुंतवणूकदारांना हा सूचिबद्धता लाभ असामान्यच म्हणता येईल.
मागील आठवड्यात १३ जानेवारीला बंद झालेल्या या १,०७१ कोटी रुपये उभारू पाहणाऱ्या आयपीओसाठी तब्बल १.१७ लाख कोटी रुपयांच्या बोली गुंतवणूकदारांकडून आल्या. ज्यामुळे तो अलीकडच्या वर्षांतील सर्वाधिक भरणा झालेल्या सरकारी कंपन्यांच्या आयपीओपैकी एक ठरला. शिवाय, गुंतवणूकदारांना सूचिबद्धता लाभाच्या दृष्टीनेही अलीकडच्या वर्षांत उत्कृष्ट कामगिरीही त्याने केली.
सातवी सर्वोत्तम सूचिबद्धता
मागील वर्षी म्हणजेच २०२५ कॅलेंडर वर्षात, हायवे इन्फ्रास्ट्रक्चर, अर्बन कंपनी, आदित्य इन्फोटेक आणि मीशो या चार कंपन्यांनी त्यांच्या पदार्पणाच्या सत्रात अनुक्रमे ७२ टक्के, ६२ टक्के, ६० टक्के आणि ५३ टक्के अधिमूल्य मिळवत पहिल्या दिवसाचे व्यवहार बंद केले. त्या तुलनेत भारत कोकिंग कोलने २०२५ च्या तुलनेत सर्वोत्तम लाभ गुंतवणूकदारांच्या पदार्पणालाच दिला आहे. तर आयपीओ गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्कृष्ट वर्ष ठरलेल्या २०२४ मध्ये पाच कंपन्यांनी पहिल्याच दिवशी बहुप्रसवा (मल्टीबॅगर) लाभ गुंतवणूदारांना दिला.
विभोर स्टील ट्यूब्सने या यादीत आघाडी घेताना शेअर्स मूल्यात १९५ टक्के वाढ पदार्पणालाच दाखविली, त्यानंतर बीएलएस ई-सर्व्हिसेस (१७९ टक्के), ममता मशिनरी (१५९ टक्के), बजाज हाउसिंग फायनान्स (१३६ टक्के) आणि केएनआर हीट एक्सचेंजर (११८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. युनिकॉमर्स ई-सोल्यूशन्सनेही आयपीओमधील विक्री किमतीपेक्षा ९५ टक्के जास्त वाढीसह बंद नोंदवला, त्यानंतर भारत कोकिंग कोलच्या शेअर्सची मागील दोन वर्षात सातवी सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
विशेषतः कमी किमतीचा (प्रत्येकी २३ रुपये) आयपीओ असल्याने गुंतवणूकदारांना यात एक आकर्षक जोखीम-लाभ समीकरण दिसून आले आणि त्याचे प्रतिबिंब आयपीओला मिळालेल्या प्रतिसादाने दाखवून दिले, असे मेहता इक्विटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तापसे म्हणाले. शिवाय ही कंपनी सरकारी मालकीच्या कोल इंडियाची एक उपकंपनी आहे, जी जगातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादकांपैकी एक आहे.
