मुंबई : गुंतवणूकदारांच्या मोठ्या सहभागामुळे भारत कोकिंग कोल लिमिटेडचा प्रारंभिक समभाग विक्रीला (आयपीओ) मंगळवारी बोली लावण्याचा अखेरच्या दिवशी तब्बल १४६.८१ पटीने भरणा करणारा प्रतिसाद मिळाला. आता देशभरातील गुंतवणूकदारांचे २०२६ मधील या पहिल्या कंपनीच्या सूचिबद्धतेकडे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, या आयपीओच्या माध्यमातून ३४.६९ कोटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले होते, प्रत्यक्षात गुंतवणूकदारांकडून ५,०९३ कोटी समभागांना मागणी नोंदवण्यात आली. पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या हिश्श्यासाठी ३१०.८१ पट प्रतिसाद प्राप्त झाला, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव भागाला २५८.०४ पट तर, किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेल्या श्रेणीला ४९.२६ पट प्रतिसाद मिळाला.
भारत कोकिंग कोल लिमिटेडचा आयपीओ शुक्रवारी बोलीसाठी खुला झाल्यानंतर काही मिनिटांतच त्याने भरणा पूर्ण केला होता. कंपनीने त्या आधी सुकाणू गुंतवणूकदारांकडून २७३ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारला होता. कंपनीला आयपीओच्या माध्यमातून १,०७१ कोटी रुपयांची निधी उभारणी अपेक्षित आहे. विद्यमान २०२६ वर्षातील मुख्य मंचावर सूचिबद्ध होणारी भारत कोकिंग कोल लिमिटेड ही पहिली कंपनी आहे. कंपनीने आयपीओसाठी प्रति समभाग २१-२३ रुपये किंमतपट्टा निश्चित केला होता.
