लोकसभा निवडणूक निकाल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठ्या उलाढाली पाहायला मिळत आहेत. निकालाच्या दिवशी मोठी घसरण दाखवणाऱ्या सेन्सेक्सनं शपथविधीनंतर ती सगळी घट भरून काढत नवे उच्चांक प्रस्थापित केले आहेत. निफ्टी५०नंही सेन्सेक्सच्या पावलावर पाऊल ठेवत रोज नवनवे उच्चांक प्रस्थापित करण्याचा कित्ता कायम ठेवला आहे. गुरुवारी शेअर बाजार उघडताच सेन्सेक आणि निफ्टी५०नं नव्या उच्चांकांनिशी पुन्हा रेकॉर्डब्रेक वाटचाल केली आहे!

गुरुवारी शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सनं तब्बल ४०० अंकांची वाढ नोंदवत थेट ७७१४५.४६ पर्यंत मजल मारली. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. त्याचंच प्रतिबिंब पुढच्या दोन तासांत शेअर बाजारात झालेल्या व्यवहारांमध्येही दिसून आलं.

सेन्सेक्सनं उसळी घेतल्यानंतर पाठोपाठ निफ्टीनंही वरचा गिअर टाकत ०.५१ टक्क्यांची वाढ नोंदवली. गुरुवारी सकाळी ११८.३५ अंकांनी वाढून निफ्टी थेट २३४४१.३० पर्यंत पोहोचला. शेअर बाजार उघडल्यानंतर निफ्टीनं नोंदवलेली ही वाढ अवघ्या काही मिनिटांत थेट २३४८१ पर्यंत पोहोचली.

शेअर बाजारातील तेजीचे शिलेदार!

गुरुवारी सेन्सेक आणि निफ्टीच्या उसळीमुळे मुंबई शेअर बाजारात दिसून आलेली तेजी नेसले इंडिया, एचसीएल टेक, इन्फोसिस आणि विप्रोनं नोंदवलेल्या वाढीमुळे आल्याचं पाहायला मिळालं. त्याशिवाय लार्ज कॅप श्रेणीतील टीसीएस, कोटक बँक यांचे शेअर्सदेखील जवळपास दीड टक्क्यांनी वाढल्याचं पाहायला मिळालं. मिडकॅप श्रेणीत ओएफएसएस, जेएसडब्लू इन्फ्रा, मॅक्स हेल्थ आणि पीएफसीच्या शेअर्सच्या किमतीही २ ते ६ टक्क्यांनी वाढल्या.

विश्लेषण : सेन्सेक्स @ ७५०००…शेअर बाजारात तेजीचा हा जोश कुठवर टिकणार?

भारतीय शेअर बाजारावर अमेरिकेतील ‘या’ घटनेचा परिणाम?

दरम्यान, अमेरिकेतील शेअर बाजार वा अर्थव्यवस्थेमध्ये होणाऱ्या घडामोडींचा भारतीय शेअर बाजारावर परिणाम होत असल्याचं दिसून येतं. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेकडून गेल्या काही दिवसांत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे भारतीय शेअर बाजारात सकारात्मक पडसाद उमटल्याचं मानलं जात आहे. अमेरिकेच्या फेडरल बँकेनं आपले व्याजदर स्थिर ठेवले आहेत.