मुंबईः कृत्रिम (सिथेंटिक) कापडाच्या निर्मितीचे केंद्र असलेल्या सुरतस्थित या उद्योगातील प्रमुख कंपनी बोराना वीव्हज लिमिटेडने आपल्या चौथ्या उत्पादन प्रकल्पाच्या स्थापनेच्या उद्देशाने प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) प्रस्तावित केली आहे. येत्या मंगळवार २० मे ते गुरुवार २२ मे असे तीन दिवस सुरू राहणाऱ्या या विक्रीतून कंपनीला १४४.८९ कोटी रुपयांचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे.
तब्बल ७०० अत्याधुनिक यंत्रमागांद्वारे वेगवेगळ्या तीन प्रकल्पांतून बोराना वीव्हज लिमिटेडकडून प्रति वर्ष २,३३३ लाख मीटर सिंथेटिक ग्रे फॅब्रिक या कृत्रिम कापडाची निर्मिती केली जाते. ज्याचा वापर पारंपरिक वस्त्रोद्योग, फॅशन, टेक्निकल टेक्स्टाइल, गृह सजावट वगैरे उद्योगांकडून केला जातो. कंपनीचे तिन्ही प्रकल्प सरासरी ९० टक्क्यांहून अधिक क्षमतेने कार्यरत असून, वाढती मागणी पाहता चौथा प्रकल्प लवकरच कार्यान्वित केला जाईल, असे कंपनीचे कार्यकारी संचालक राजकुमार बोराना म्हणाले.
आयपीओतून उभारल्या जाणाऱ्या १४५ कोटींपैकी ७१.३१ कोटी रुपये हे चौथ्या प्रकल्पासाठी भांडवली खर्च म्हणून वापरात येतील, तर २६ कोटी रुपये खेळत्या भांडवलासाठी वापरले जातील, असे बोराना यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पाच्या कार्यान्वयनातून एकूण यंत्रमाग क्षमता १,०५० इतकी होईल आणि उत्पादन क्षमतेतही ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. खर्चात कपातीसाठी कंपनीचे १० मेगावॉट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचेही नियोजन आहे.
आयपीओअंतर्गत, कंपनीच्या ६७.०८ लाख समभागांची प्रत्येकी २०५ रुपये ते २१६ रुपये किमतीला सार्वजनिक विक्री केली जाणार आहे. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी १० टक्के समभाग राखीव असून, किमान ६९ समभागांसाठी गुंतवणूकदारांना बोली लावणारा अर्ज करता येईल. विक्रीपश्चात कंपनीचे समभाग मुंबई (बीएसई) तसेच राष्ट्रीय (एनएसई) शेअर बाजारात सूचिबद्ध केले जातील.