Semiconductor Unit : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत भारतातील सहाव्या सेमीकंडक्टर युनिटच्या स्थापनेला मान्यता दिली. उत्पादन २०२७ पासून सुरू होणार आहे. हे नवीन युनिट उत्तर प्रदेशातील जेवर येथे असेल. एचसीएल ग्रुप आणि फॉक्सकॉन यांच्यातील सुमारे ३ हजार ७०६ कोटी गुंतवणुकीचा हा संयुक्त उपक्रम आहे.
एचसीएलचा हार्डवेअर विकसित करण्याचा आणि उत्पादन करण्याचा मोठा इतिहास आहे. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात जागतिक स्तरावरील प्रमुख कंपनी आहे. ते एकत्रितपणे यमुना एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरणमध्ये जेवर विमानतळाजवळ एक प्लांट स्थापित करतील.
दोन हजार नोकऱ्या उपलब्ध होणार
हे उत्तर प्रदेशातील पहिले चिप युनिट असणार आहे, असं केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी म्हटलंय. या प्लांटमध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाइल्स, पीसी आणि डिस्प्ले असलेल्या असंख्य इतर उपकरणांसाठी डिस्प्ले चिप्स तयार केल्या जातील. यातून सुमारे दोन हजार नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशच्या यमुना प्राधिकरण क्षेत्रात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल आहे. ३ हजार ७०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकींसह हे युनिट मोबाईल, फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स आणि इतर विविध उपकरणांसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार करेल. भारत आता सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक नेतृत्त्वाकडे वाटचाल करत आहे आणि उत्तर प्रदेश दर्जाच्या इलेक्ट्रॉनिक्स व सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे.