नवी दिल्ली : मोबाईल फोन सेवांच्या दरात निरंतर घसरण झाली असून या सेवा सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्या गेल्याचे केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी गुरुवारी संसदेत सांगितले. वर्ष २०१४ पासून दरात तब्बल ९४ टक्क्यांनी घट झाल्याचा त्यांनी दावा केला. देशात सध्या ११६ कोटी मोबाईल फोन ग्राहक आहेत.

शिवाय इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या २०१४ मध्ये २५ कोटी होती ती आज ९७.४४ कोटींवर पोहोचली आहे. ज्यावेळी ग्राहकांची संख्या वाढते तेव्हा दरांवर देखरेख ठेवणे आवश्यक बनते, असे शिंदे म्हणाले. २०१४ मध्ये एका मिनिटांच्या कॉलसाठी ५० पैसे शुल्क पडत होते आणि सध्या ते तीन पैसे आहे. म्हणजेच त्यात सुमारे ९४ टक्क्यांची घसरण झाली आहे. २०१४ मध्ये एक गिगाबाइट ब्रॉडबँड सेवेचे शुल्क प्रति जीबी २७० रुपये होते, ते आता ९.७० रुपये प्रति जीबी आहे. ज्यामुळे या शुल्कात ९३ टक्के घट झाली आहे. भारत हा विदा सेवांच्या आधारावर जगातील सर्वात किफायतशीर देश आहे.

Story img Loader