भांडवली बाजार नियामक सेबीने अमेरिकेतील जेन स्ट्रीट (जेएस) समूहावर बाजारातील व्यवहारांवर बंदी घालण्याची शुक्रवारी कारवाई केली आणि बाजारातील कथित समभाग व्यापार आणि किंमत फेरफाराच्या कृष्णकृत्यांतून समूहाने कमावलेला ४,८४३ कोटी रुपयांचा बेकायदेशीर नफा जप्त करण्याचे निर्देश दिले.भारताच्या रोखे बाजारात नियामकांद्वारे केली जात असलेली ही आतापर्यंतची सर्वाधिक उलटवसुलीद्वारे (डिसगॉर्जमेंट) जप्तीची रक्कम आहे.
शुक्रवारी दिलेल्या अंतरिम आदेशात, नियामकांनी समूहातील – जेएसआय इन्व्हेस्टमेंट्स, जेएसआय२ इन्व्हेस्टमेंट्स प्रा. लि., जेन स्ट्रीट सिंगापूर प्रा. लि. आणि जेन स्ट्रीट एशिया ट्रेडिंग या संस्थांना पुढील सूचनेपर्यंत व्यापार करण्यापासून बंदी घातली आहे, तर त्यांच्या कारवायांबाबत चौकशी सुरू राहिल असे स्पष्ट केले आहे. या संस्थांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोखे खरेदी, विक्री किंवा इतर प्रकारे व्यवहार करण्यास मनाई असेल.
सेबीच्या अंतरिम आदेशानुसार, जेएस समूहाने तिच्या भारतातील संस्थेचा, जेएसआय इन्व्हेस्टमेंट्स प्रा, लि.चा वापर रोख (कॅश) बाजारात मोठ्या प्रमाणात त्याच दिवशी खरेदी आणि विक्रीचा व्यवहार करण्यासाठी केला. अशा व्यवहार क्रिया आणि रणनीती परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (एफपीआय) प्रतिबंधित आहेत आणि त्यामुळे त्या बेकायदेशीर ठरल्या आहेत. जेन स्ट्रीट ग्रुप एलएलसी ही वित्तीय सेवा क्षेत्रातील २००० सालात स्थापित जागतिक मालकीची रोखे व्यवहार संस्था आहे. तिच्या अमेरिका, युरोप आणि आशियातील पाच कार्यालयांमध्ये २,६०० हून अधिक कर्मचारी कार्यरत असून, ४५ देशांमधील बाजारमंचांवर तिचे व्यापारी व्यवहार सुरू आहेत.
सेबीने केलेल्या तपासात दिसून आले की, जानेवारी २०२३ ते मे २०२५ दरम्यान तब्बल २१ वायदे सौद्यांच्या मुदत संपण्याच्या दिवसांमध्ये, जेएस समूहाने अत्यंत तरल बँक निफ्टी तसेच निफ्टी निर्देशांकांच्या हालचालींवर प्रभाव पाडण्यासाठी आणि ऑप्शन्स बाजारातील मोठ्या प्रमाणात घेतलेल्या शॉर्ट्स व्यवहारांतून नफा मिळवण्यासाठी रोख बाजारात अंतर्निहित निर्देशांकातील समभागांचे मोठे व्यवहार केले. हे प्रकरण एप्रिल २०२४ मधील माध्यमांतील वृत्तावरून पटलावर आले. जेन स्ट्रीट आणि तिच्याशी संलग्न संस्थांनी ऑप्शन्स व्यवहारांमध्ये अनधिकृत ट्रेडिंग रणनीती (स्ट्रॅटेजी) वापरल्याचा या वृत्तात संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यापश्चात फेब्रुवारीमध्ये राष्ट्रीय शेअर बाजाराने आरोपी संस्थांना इशारा दिला आणि त्यावर अशा व्यवहार पद्धती बंद करत असल्याचे त्यांनी आश्वासनही दिले. तथापि त्यानंतरही जेएस समूहाने संशयास्पद व्यापाराचे क्रियाकलाप सुरूच ठेवले, असे सेबीने अंतरिम आदेशात नमूद केले आहे.
व्यवहारनीती कशी?
सकाळी बाजार सुरू होताच बँक निफ्टी निर्देशांकातील समभाग निवडून त्यात आक्रमकपणे रोख बाजारातून (कॅश मार्केट) खरेदी करायची आणि दिवसाच्या शेवटी ते तितक्याच आक्रमकपणे असेल त्या किमतीत विकून टाकायचे, अशी जेएस समूहाची व्यवहारनीती होती. यातून रोख बाजारात समभागांच्या किमतीत मोठी घसरण करणारा प्रभाव निर्माण होत असे. असे व्यवहार आर्थिकदृष्ट्या तर्कविसंगत आणि वरकरणी आतबट्ट्याचे दिसून आले आणि त्यातून अनेकदा तोटाही होत होता. तरी त्याच निर्देशांकांच्या अर्थात इंडेक्स ऑप्शन्समध्ये मोठ्या प्रमाणात समांतर शॉर्ट्स अर्थात कॉल्सची विक्री आणि पुट्सच्या खरेदीच्या व्यवहारामधून मोठा नफाही कमावला जात असे. जानेवारी २०२३ ते मार्च २०२५ दरम्यान किमती जाणीवपूर्वक पाडून केलेल्या शॉर्ट ऑप्शन्स व्यवहारांतून ३६,६७१ कोटी रुपयांचा नक्त नफा समूहातील संस्थांनी केल्याचा आरोप आहे.