नवी दिल्ली : सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात सर्व प्रकारच्या एकूण वाहन विक्रीत १५.९५ टक्क्यांची वाढ झाली आणि एकूण १७.७५ लाख वाहने विकली गेली, अशी माहिती फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन अर्थात ‘फाडा’ने गुरुवारी दिली.
गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात (२०२२) भारतातील वाहनांच्या एकूण किरकोळ विक्रीने १५.३१ लाखांचा टप्पा गाठला होता. मात्र करोनाकाळात जागतिक पातळीवर निर्माण झालेला अर्धसंवाहकाचा (सेमीकंडक्टर) सुधारलेला पुरवठा आणि वाहन निर्मात्या कंपन्यांकडून वाढलेल्या वाहनाच्या पुरवठय़ामुळे महिना दर महिना वाहनांच्या विक्रीत वाढ होते आहे. सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात १२.६७ लाख दुचाकींची विक्री झाली. फेब्रुवारी २०२२च्या तुलनेत त्यात १४.७५ टक्क्यांनी वाढ झाली आहे, त्या वेळी ११.०४ लाख दुचाकींची विक्री झाली होती.
प्रवासी वाहनांच्या विक्रीतदेखील ११ टक्के वाढ झाली आहे. सरलेल्या महिन्यात २.८७ लाख प्रवासी वाहनांची विक्री झाली, जी फेब्रुवारी २०२२ मध्ये २.५८ लाख वाहने अशी होती. या काळात तीनचाकी वाहनांच्या विक्रीत सर्वाधिक ८१.४७ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सरलेल्या महिन्यात ७२,९९४ तीनचाकी वाहने विकली गेली, तर गेल्या वर्षी या महिन्यात ४०,२२४ तीनचाकी वाहने विकली गेली होती. वाणिज्य वाहनांच्या विक्रीत देखील १७.२७ टक्क्यांची वाढ झाली.
महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची विक्री घटली
एकूण वाहन विक्रीमध्ये कायम अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत ३.४२ टक्क्यांची घसरण झाली. फेब्रुवारी २०२३ मध्ये ३०,८४३ प्रवासी वाहनांची विक्री झाली. गेल्या वर्षी याच महिन्यात ३१,९३५ वाहनांची विक्री झाली होती. राज्यात एकूण वाहन विक्रीत १०.९१ टक्के वाढ झाली असून १.८७ लाख वाहने विकली गेली.