वृत्तसंस्था, नवी दिल्ली

इराण-इस्रायलमधील वाढता संघर्ष आणि त्या परिणामी जागतिक पातळीवरील वाढती अनिश्चितता बघता रिझर्व्ह बँकेकडून सोने खरेदी सुरू राहण्याची शक्यता आहे. मध्यवर्ती बँका येत्या १२ महिन्यांच्या कालावधीत सुवर्णसाठ्यात वाढ करत राहतील, अशी अपेक्षा जागतिक सुवर्ण परिषदेने मंगळवारी अहवालातून व्यक्त केली.

वर्ष २०२५ च्या ‘सेंट्रल बँक्स गोल्ड रिझर्व्हज’ या अहवालानुसार, ४३ टक्के मध्यवर्ती बँका पुढील वर्षात त्यांच्या सुवर्णसाठ्यात भर घालण्याची योजना आखत आहेत. दीर्घकालीन मूल्याच्या साठवणुकीसाठी, पोर्टफोलिओमध्ये वैविध्यासाठी आणि संकटाच्या काळात उत्तम परतावा कामगिरी अशा तीन प्रमुख कारणांमुळे सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. सध्या सुरू असलेल्या आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चिततेचा अर्थव्यवस्थेवर ताण पडत असल्याने जोखीम कमी करण्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.

उदयोन्मुख आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमधील मध्यवर्ती बँकांनी सोन्याच्या विक्रमी किमती आणि सलग १५ वर्षांच्या खरेदीच्या पार्श्वभूमीवरही सोन्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन कायम राखला आहे. विशेष म्हणजे सर्वेक्षणात सहभागी प्रत्येक १० पैकी ९ हून अधिक (९५ टक्के) प्रतिसादकर्त्यांना वाटते की, त्यांच्या स्वतःच्या सोन्याच्या साठ्यात पुढील १२ महिन्यांत वाढ होईल. अनेक मध्यवर्ती बँकांनी त्यांच्याकडील सोन्याचा साठा वाढवत नेला असून, २०२४ मध्ये त्यात एकत्रित ४१ टक्के वाढ झाली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोन्याच्या किमतीने वर्ष २०२५ मध्ये विक्रमी पातळी गाठली आहे. जग अनिश्चितता आणि गोंधळाचा सामना करत असताना सोने ही एक धोरणात्मक मालमत्ता बनली आहे. मध्यवर्ती बँकांचे व्याजदर, महागाई आणि अस्थिरतेमुळे सोने खरेदीचा कल वाढला आहे. जोखीम कमी करण्यासाठी इतर मालमत्ता वर्गापेक्षा सोन्याकडे ओढा वाढतो आहे, असे मध्यवर्ती बँकांचे जागतिक प्रमुख शाओकाई फॅन यांनी मत व्यक्त केले.