scorecardresearch

‘आयटेल’कडून लवकरच सर्वात स्वस्त ५ जी समर्थ स्मार्टफोन

‘आयटेल’ने दिवाळीच्या तोंडावर देशातील सर्वात स्वस्त ५ जी समर्थ स्मार्टफोन बाजारात दाखल करण्याचे स्पष्ट संकेत दिले.

Intel, 5G, Smart Phone, cheapest
‘आयटेल’कडून लवकरच सर्वात स्वस्त ५ जी समर्थ स्मार्टफोन ( Image Source – financial express )

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : देशात आजही २ जी तंत्रज्ञानावरील फोन वापरणाऱ्यांची संख्या सव्वादोन कोटींच्या घरात असली तरी नजीकच्या काळात ५ जीकडील संक्रमण हे तुलनेने अतिवेगवान असेल आणि ८,००० रुपयांखालील श्रेणीतील क्रमांक एकची मोबाइल फोन नाममुद्रा ‘आयटेल’ने दिवाळीच्या तोंडावर देशातील सर्वात स्वस्त ५ जी समर्थ स्मार्टफोन बाजारात दाखल करण्याचे स्पष्ट संकेत दिले.

ग्राहक-केंद्रित नाममुद्रा म्हणून आयटेलने नेहमीच बाजारपेठेतील स्पर्धेचा पट बदलणाऱ्या नवकल्पना साकारून आणि स्मार्टफोन वापरकर्त्यांचा अनुभव समृद्ध करण्यावर भर दिला आहे. येत्या काळात ५ जीला वाढती स्वीकृती पाहता, या श्रेणीत ग्राहकांना ८ ते १० हजार रुपयांच्या श्रेणीत साजेसा स्मार्टफोनही उपलब्ध होईल, हे कंपनीकडून पाहिले जाईल, असे ‘आयटेल’ नावाने हँडसेट निर्मिती करणाऱ्या ट्रान्सियन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजित तालपात्रा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

ट्रान्सियनच्या आयटेल, इन्फिनिक्स आणि टेक्नो या फोन नाममुद्रांचे १० हजारांखालील फोनच्या बाजारपेठेत २० टक्के असा लक्षणीय वाटा आहे. हा बाजारहिस्सा आणखी सुदृढ करण्यासाठी कंपनीने बॉलीवूड अभिनेता हृतिक रोशनला वाणिज्यदूत म्हणून नुकतेच करारबद्ध केले आहे.

तालपात्रा यांच्या मते, २ जी ते ३ जी आणि ४ जी या संक्रमणाच्या तुलनेत ५ जी संक्रमण हे अधिक वेगवान असेल आणि २०२४ अखेरपर्यंत देशातील ५५ टक्के अर्थात साडेसात ते आठ कोटी मोबाइल फोन हे ५ जी समर्थ असतील. अर्थात देशातील ५.५ कोटी जनता ही आजही ८,००० रुपये अथवा त्याहून कमी किमतीचे फोन वापरते ही बाब दुर्लक्षिता येणार नाही आणि ५ जीकडील त्यांचे संक्रमण हे अशाच परवडणाऱ्या हँडसेटच्या माध्यमातून शक्य होईल, असे ते म्हणाले.

सर्वाधिक नागरीकरण झालेल्या महाराष्ट्राच्या बाजारपेठेवर कंपनीची मोठी मदार असून, त्यानुसार विस्ताराच्या दिशेने तिचे नियोजन आहे. राज्यात सध्या तिच्या विक्रेत्यांची संख्या जवळपास ११ हजारांवर तर वितरकांची संख्या शंभराच्या घरात गेली असल्याचे तालपात्रा यांनी सांगितले. विक्रीपश्चात सेवा देणारी राज्यभरात तिची १२० हून अधिक केंद्रे कार्यरत आहेत.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-02-2023 at 12:54 IST