पीटीआय, नवी दिल्ली : सरलेल्या डिसेंबर महिन्यात देशाची वस्तू निर्यात आणि आयात काहीशी वाढल्याने, दोहोंमधील तफावत असलेली देशाची व्यापार तूट किरकोळ वाढून २५.०४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. आधीच्या महिन्यांत म्हणजेच नोव्हेंबरमध्ये वस्तू व्यापार तूट कमी होऊन २४.५३ अब्ज डॉलर नोंदवली गेली होती.

जागतिक व्यापारात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता असूनही, देशाची वस्तू निर्यात डिसेंबर २०२४ मधील ३७.८ अब्ज डॉलरवरून सरलेल्या डिसेंबर महिन्यात ३८.५१ अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे. दुसरीकडे, आयात डिसेंबर २०२५ मध्ये ६३.५५ अब्ज डॉलरवर पोहोचली, जी मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत ५८.४३ अब्ज डॉलर होती. सेवा निर्यात किरकोळ घसरून ३५.५० अब्ज डॉलर झाली, तर सेवा आयात १७.३८ अब्ज डॉलरवर स्थिर राहिली, अशी माहिती वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली.

वस्तू आणि सेवा एकत्र मिळून सरलेल्या डिसेंबर २०२५ मध्ये भारताची एकूण निर्यात ७४.०१ अब्ज डॉलर नोंदवली गेली, जी डिसेंबर २०२४ मधील ७४.७७ अब्ज डॉलरपेक्षा किंचित कमी होती, तर आयात मागील वर्षाच्या ७६.२३ अब्ज डॉलरवरून वाढून ८०.९४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे.

अग्रवाल म्हणाले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत देशाच्या एकूण निर्यातीत ४.३३ टक्के वाढ झाली आहे आणि आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी एकूण निर्यात ८५० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या एप्रिल-डिसेंबर या कालावधीत अमेरिकेला होणाऱ्या भारताच्या निर्यातीत वार्षिक ९.८ टक्के वाढ झाली आहे.

भारत-अमेरिकेदरम्यान व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. मात्र व्यापार कराराला कधीपर्यंत अंतिम रूप मिळेल याबाबत निश्चित तारीख सांगता येत नाही, असे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात वाणिज्य मंत्री आणि अमेरिकेच्या व्यापारी प्रतिनिधीमंडळसह दूरस्थ संपर्क माध्यमांतून बैठक झाली. कराराबाबत सहमतीसाठी वाटाघाटी करणाऱ्या पथकांमधील निरंतर चर्चा सुरू असून, त्या अंतिम टप्प्यात आहेत. मात्र तरी सहमतीबाबत निश्चित कालावधी सांगता येत नाही. युरोपिय महासंघाशी मुक्त व्यापार करार मात्र अंतिम टप्प्यात आहे. २४ पैकी २० मुद्दे निकाली निघाले असून अजूनही काहींबाबत तोडगा अपेक्षित आहे, असे त्यांनी सांगितले.