वस्तू आणि सेवा करात (जीएसटी) झालेल्या कपातीतून किमती कमी झाल्यामुळे ग्राहकांनी सणासुदीच्या हंगामात वाहनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्या परिणामी वाहन कंपन्यांकडून वितरकांना विक्रमी प्रवासी मोटारी, दुचाकी आणि तीन चाकींची रवानगी केली गेली, असे वाहन निर्मात्यांची संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चर्स (सियाम)’ने शुक्रवारी स्पष्ट केले.

ऑक्टोबरमध्ये एकूण प्रवासी वाहनांची घाऊक विक्री ४,६०,७३९ वाहनांवर पोहोचली, जी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ३,९३,२३८ पातळीवर होती. त्यात वार्षिक आधारावर १७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात दुचाकी वाहनांची विक्री २२,१०,७२७ वर पोहोचली. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत २१,६४,२७६ दुचाकी विक्री झाली होती, असे सियामच्या निवेदनात म्हटले आहे.

गेल्या महिन्यात स्कूटर विक्रीत वार्षिक आधारावर १४ टक्क्यांनी वाढ होऊन ती ८,२४,००३ वर पोहोचली आहे, तर ऑक्टोबर २०२४ मध्ये ती ७,२१,२०० स्कूटरवर मर्यादित होती. मात्र, ऑक्टोबरमध्ये मोटारसायकलची विक्री वार्षिक तुलनेत ४ टक्क्यांनी घसरून १३,३५,४६८ वर स्थिरावली. तर तीन चाकी वाहनांची विक्री ६ टक्क्यांनी वाढून ८१,२८८ झाली आहे.

सणासुदीच्या मागणीमुळे आणि काही वाहतूक मर्यादांमुळे अडचणी येत असूनही, प्रवासी वाहने, दुचाकी आणि तीन चाकी वाहनांच्या विभागांनी ऑक्टोबरमध्ये वितरकांना आतापर्यंतची सर्वाधिक विक्री हंगाम मिळवून दिला, असे सियामचे महासंचालक राजेश मेनन म्हणाले. २२ सप्टेंबरपासून लागू झालेल्या जीएसटी कपातीमुळे, ऑक्टोबरमध्ये वाहन नोंदणीमध्ये मोठी वाढ झाली, ज्याचे लक्षणीय प्रतिबिंब विक्रीत उमटले, असे त्यांनी सांगितले.