मुंबई : देशाची परकीय चलन गंगाजळी २७ जूनअखेर समाप्त आठवड्यात ४.८४ अब्ज डॉलरने वाढून ७०२.७८ अब्ज डॉलर्सवर पोहोचली, असे रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी सांगितले. मागील आठवड्यात, परकीय चलन साठा १.०१ अब्ज डॉलरने घसरून ६९७.९३ अब्ज डॉलर नोंदविला गेला होता. चलन साठ्यावर युरो, पौंड आणि येन सारख्या अमेरिकेतर चलनांमधील वाढ किंवा अवमूल्यनाचा देखील परिणाम होत असतो. २७ जून रोजी संपलेल्या आठवड्यात सोन्याचा साठा १.२३ अब्ज डॉलरने कमी होऊन ८४.५ अब्ज डॉलरवर आला आहे.

चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर ७०० अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी असणारी भारत ही जगातील चौथी अर्थव्यवस्था आहे. बाह्य व्यापार आणि आयातीच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने सध्या आपण सुस्थितीत आहोत, असे रिझर्व्ह बँकेने सांगितले. गंगाजळीने ७०० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची ही दुसरी वेळ आहे. या आधी सप्टेंबर २०२४ अखेर परकीय चलन साठा ७०४.८८ अब्ज डॉलरच्या सर्वोच्च पातळीवर होता. वर्ष २०१३ पासून देशाच्या परकीय चलन साठ्यात निरंतर वाढ सुरू आहे. सुदृढ गंगाजळीमुळे अस्थिर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील आकस्मिक उद्भवणाऱ्या जोखमींविरूद्ध संरक्षक कवच मिळण्यासह, चलन व्यवस्थापनात रिझर्व्ह बँकेलाही अधिक लवचिकता प्राप्त होते.