मुंबई: खनिज तेलाच्या किमतीतील वाढती अस्थिरता आणि परदेशी निधीचे निर्गमन यामुळे रुपया सलग तिसऱ्या सत्रात घसरला आणि शुक्रवारी तर अमेरिकी डॉलरच्या तुलनेत तो ५० पैशांनी कोसळून ९०.८४ या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीजवळ स्थिरावला.

परकीय चलन व्यापाऱ्यांच्या मते, जागतिक बाजारातील अस्थिर भावना आणि अमेरिकी चलनाच्या मजबुतीमुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी निधी काढून घेण्याचा वेग वाढवला. देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मूल्याधारित खरेदीचा अवलंब केल्याने सेन्सेक्स-निफ्टीने सकारात्मक बंद नोंदवला. डिसेंबर २०२५ मध्ये भारताची व्यापार तूट नोव्हेंबरमधील २४.५३ अब्ज डॉलर आणि डिसेंबर २०२४ मधील २२ अब्ज डॉलर्सच्या तुलनेत किंचित वाढून २५.०४ अब्ज डॉलर झाल्याचे दिसून आल्यानंतर रुपयाच्या मूल्यावर ताण वाढला. परकीय चलन बाजारात, रुपयाने ९०.३७ या पातळीवरून व्यवहाराला सुरुवात केली आणि दिवसाच्या व्यवहारात ९०.८९ ही नीचांकी पातळी त्याने गाठली होती.

बुधवारी रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ११ पैशांनी घसरून ९०.३४ वर बंद झाला होता, तर मंगळवारी त्यात ६ पैशांनी घसरण झाली होती. म्हणजेच गेल्या तीन सत्रात मिळून रुपया ६७ पैशांनी घसरला आहे.परदेशी निधीचा सततचे निर्गमन आणि रात्रभरात डॉलरच्या मजबुतीमुळे रुपया सलग तिसऱ्या सत्रात घसरला. बाजार विश्लेषकांच्या मते, अपेक्षेपेक्षा चांगल्या अमेरिकी बेरोजगारी दाव्यांच्या आणि उत्पादन क्षेत्राच्या आकडेवारीनंतर डॉलर मजबूत झाला आहे. व्यापार कराराच्या चर्चेतील अनिश्चितता आणि भू-राजकीय तणावामुळे रुपया यापुढेही नकारात्मक दिशेने व्यवहार करेल अशी अपेक्षा आहे. मजबूत डॉलर, भांडवली बाजारातून परकीय गुंतवणुकीचा बहिर्वाह आणि तेलाच्या वाढलेल्या किमती हे सर्व घटक रुपयावर दबाव आणू शकतात, असे मिरॅ ॲसेट शेअरखानचे संशोधन विश्लेषक अनुज चौधरी म्हणाले.