मुंबई : अमेरिकेतील गुंतवणूक सल्लागार आणि संशोधन संस्था हिंडेनबर्गच्या अदानी समूहावरील लबाडी आणि अनियमिततांचा आरोप करणाऱ्या अहवालाच्या प्रसिद्धीनंतर, सलग दुसऱ्या दिवशी अदानींच्या समभागांत घसरण कळा कायम आहेत. शुक्रवारच्या सत्रात देखील भांडवली बाजारात अदानी समूहाच्या कंपन्यांचे समभाग मोठ्या आपटीसह कोसळले. समूहाचे बाजार भांडवल शुक्रवारच्या सत्रात सुमारे ३.४ लाख कोटींची घसरले. या सत्रादरम्यान अदानी समूहातील कंपन्यांच्या एकूण बाजार भांडवलात १८.५ टक्क्यांची घसरण झाली. बुधवारी बसलेल्या दणक्यासह समूहाच्या बाजार भांडवलात एकूण ४.२ लाख कोटी रुपयांचा ऱ्हास झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>Gold-Silver Price on 27 January 2023: सोन्याच्या दरात विक्रमी वाढ, तर चांदीच्या किंमती किती? जाणून घ्या आजचा भाव

हिंडेनबर्गच्या अहवालात केल्या गेलेल्या दाव्याप्रमाणे भारतातील या अग्रणी उद्योग समूहाने अनेक दशकांपासून ताळेबंदात आणि लेख्यांमध्ये खोटेपणा करण्यासह, समूहातील कंपन्यांच्या समभागांच्या किमती फुगवण्यासाठी अनेक लबाड्या केल्याचे आरोप केले आहेत. मात्र हे सर्व आरोप तथ्यहीन आणि एकतर्फी असल्याचा खुलासाही अदानी समूहाने लगोलग केला आहे.अदानी समूहाच्या भांडवली बाजारातील दहा सूचिबद्ध समभागांपैकी किमान चार कंपन्यांचे समभाग शुक्रवारच्या सत्रात घसरणीच्या स्वीकारार्ह कमाल मर्यादेपर्यंत अर्थात लोअर सर्किटपर्यंत गडगडले. म्हणजेच या समभागांत २० टक्क्यांपर्यंत घसरण झाली.

अदानी टोटल गॅस २९३४.५५ -७३३.६० (-२०.०० टक्के)
अदानी ग्रीन एनर्जी : १४८४.५० – ३७०.९५ (-१९.९९ टक्के)
अदानी ट्रान्समिशन २००९.७० -५०२.०५ (-१९.९९ टक्के)
अदानी इंटरप्रायझेस २७६२.१५ -६२७.७० (-१८.५२ टक्के)
अदानी पोर्ट्स ५९८.६० -११४.३० (-१६.३० टक्के)
अदानी विल्मर ५१७.३० -२७.२० (-५.०० टक्के)
अदानी पॉवर २४८.०५ -१३.०५ (-५.०० टक्के)
अंबुजा सिमेंट ३८१.१५ -७८.९५ (-१७.१६ टक्के)
एसीसी १८८४.०५ -२८२.५५ (-१३.०४ टक्के)
एनडीटीव्ही २५६.३५ -१३.४५ (४.९९ टक्के)
(मुंबई शेअर बाजारातील शुक्रवारचा बंद भाव)

हेही वाचा >>>हिंडेनबर्ग’चा फसवणुकीचे आरोप करणारा अहवाल; अदानी समूहातील कंपन्यांच्या बाजारभांडवलाचे ४६ हजार कोटींनी पतन

हिंडेनबर्गवर खटल्याची तयारी
अदानी समूह अमेरिकेतील हिंडेनबर्गवर खटला भरण्याची योजना आखत आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या नियोजित भागविक्रीच्या तोंडावर समूहाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या मुख्य उद्देशाने आणि समूहाबद्दल गुंतवणूकविश्वात साशंकता निर्माण करणारा हा अहवाल हिंडेनबर्गकडून जाणीवपूर्वक आणला गेल्याचे अदानी समूहाने म्हटले आहे. ‘आम्ही हिंडेनबर्गविरुद्ध दंडात्मक कारवाईसाठी पावले टाकत असून, त्या संबंधातील अमेरिका आणि भारतीय कायद्यांतर्गत तरतुदींचे मूल्यमापन करत आहोत,’ असे अदानी समूहाच्या कायदा विभागाचे समूह प्रमुख जतीन जलुंधवाला यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अदानी समूहाच्या कायदेशीर कारवाईच्या इशाऱ्याला प्रतिक्रिया देताना हिंडेनबर्ग रिसर्चने, ‘आम्ही आमच्या अहवालावर ठाम आहोत. तसेच आमच्या विरूद्ध केल्या गेलेल्या कोणतीही कायदेशीर कारवाई ही आमच्याकडे असणारे पुरावे योग्य त्या ठिकाणी मांडण्याची संधीच असेल,’ असे म्हटले आहे. त्यांनी गुरुवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या या निवेदनात, ‘गेल्या ३६ तासात अदानी समूहाने आम्ही विचारलेल्या ८८ मुद्देसूद प्रश्नांपैकी एकाचेही उत्तर दिलेले नाही. त्या उलट दोन वर्षांच्या अथक संशोधनाअंती तयार झालेल्या १०६ पानी अहवालाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून अदानी समूहाने खटला भरण्याची धमकी दिली आहे,’ असे नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decline in total market capitalization of adani group companies amy
First published on: 27-01-2023 at 19:58 IST