पीटीआय, नवी दिल्ली

अग्रिम कराच्या वाढलेल्या भरण्यामुळे विद्यमान आर्थिक वर्षात आतापर्यंत (१७ जूनअखेर) केंद्र सरकारचे प्रत्यक्ष कर संकलन २१ टक्क्यांनी वाढून ४.६२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाने मंगळवारी दिली. अग्रिम कराचा पहिला हप्ता, १५ जून रोजी देय होता, त्यातून संकलन २७.३४ टक्क्यांनी वाढून १.४८ लाख कोटी रुपये झाले. यामध्ये कंपनी कर १.१४ लाख कोटी आणि वैयक्तिक प्राप्तिकराच्या माध्यमातून ३४,४७० कोटी रुपये जमा झाले आहेत.

सुमारे ४,६२,६६४ कोटी रुपयांच्या निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात कंपनी कराचे १,८०,९४९ कोटी रुपये आणि वैयक्तिक प्राप्तिकर (रोखे उलाढाल कर – एसटीटीच्या समावेशासह) २,८१,०१३ कोटी रुपये समाविष्ट आहेत, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. १७ जूनपर्यंत ५३,३२२ कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा (रिफंड) देखील देण्यात आला आहे, जो मागील वर्षातील याच कालावधीत दिलेल्या परताव्यांच्या तुलनेत ३४ टक्के अधिक आहे.

हेही वाचा >>>नवपदवीधर उमेदवारांना ‘आयटी’ क्षेत्रातून मागणीत ५ टक्क्यांची वाढ; गत सहा महिन्यांत अनेक क्षेत्रात नोकरभरतीचे सकारात्मक चित्र

एप्रिल ते १७ जून २०२४ पर्यंत प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन (परताव्यापूर्वी) ५.१६ लाख कोटी रुपये होते, जे मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीतील ४.२३ लाख कोटी रुपयांच्या तुलनेत २२.१९ टक्के अधिक आहे.