मुंबई : देशांतर्गत म्युच्युअल फंड उद्योगाने गेल्या दशकभरात अभूतपूर्व विस्तार साधला असून, देशातील सर्व फंड घराण्यांची व्यवस्थापनाखालील मालमत्ता डिसेंबर २०१३ मधील ८.३ लाख कोटी रुपयांवरून सात पटीने वाढून जून २०२४ मध्ये ६१.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
म्युच्युअल फंडातील पॅसिव्ह अर्थात निष्क्रिय व्यवस्थापित फंडाकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला आहे. एकूण म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील मालमत्तेत पॅसिव्ह फंडाचे योगदान १७ टक्क्यांनी वधारून १०.२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. तर जून २०२४ पर्यंत ॲक्टिव्ह अर्थात सक्रियपणे व्यवस्थापन होणाऱ्या फंडांची मालमत्ता ५०.९ लाख कोटी रुपये आहे, असे मोतीलाल ओसवाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनीने नुकत्याच केलेल्या ‘व्हेअर द मनी फ्लोज’ या अहवालातून समोर आले. ८३ टक्के बाजार वाट्यासह सक्रिय (ॲक्टिव्ह) फंडांचे वर्चस्व कायम आहे, तर निष्क्रिय (पॅसिव्ह) फंडाचे योगदान १७ टक्के आहे.
हेही वाचा…अलीबाबा समूहाकडून झोमॅटोमधील २.२ टक्के हिस्साविक्री
अहवालानुसार, एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्तेत सध्या समभागसंलग्न (इक्विटी) योजनांचा वाटा ५९.७५ टक्के, रोखेसंलग्न (डेट) योजनांचा २६.९५ टक्के, हायब्रीड ८.८५ टक्के आणि इतर योजनांचे ४.४४ टक्के योगदान आहे. सरलेल्या जून तिमाहीत म्युच्युअल फंडांमध्ये एकूण ३,२५,००० कोटी रुपयांचा ओघ आला. ज्यामध्ये समभागसंलग्न आणि रोखेसंलग्न फंडांची जवळपास समान म्हणजेच अनुक्रमे १,४३,००० कोटी रुपये आणि १,६६,००० कोटी रुपये अशी हिस्सेदारी राहिली आहे. मल्टी ॲसेट फंडांमध्ये या तिमाहीत ८ कोटी रुपयांची गुंतवणूक आली. उल्लेखनीय म्हणजे तिमाहीत, एकंदर ३५ नवीन योजना बाजारात दाखल झाल्या आणि त्यांनी त्यातून एकत्रितपणे २७,००० कोटी रुपयांची गुंतवणूक गोळा केली.