एपी, हाँगकाँग : इराणविरुद्ध लष्करी कारवाईच्या धमक्यांपासून फारकत घेणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदललेल्या भूमिकेचे पडसाद खनिज तेलाच्या बाजारावर उमटले आहेत. तेलाचे दर प्रतिपिंप गुरुवारी ३ डॉलरने घसरले, त्या आधी सलगपणे वाढत त्या अनेक महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या होत्या.

अमेरिकी क्रूड २.७३ डॉलर म्हणजेच ४.५ टक्क्यांनी घसरून ५९.१३ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले, तर भारताच्या आयातीसाठी आंतरराष्ट्रीय मानक असलेल्या ब्रेंट क्रूडचे भाव पिंपामागे २.९४ डॉलर किंवा ४.४ टक्क्यांनी घसरून ६३.५८ प्रति पिंपापर्यंत खाली आल्या.

विद्यमान वर्षात खनिज तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. रशिया, व्हेनेझुएला आणि इराणशी संबंधित भू-राजकीय धोके हे पुरवठ्यातील अस्थिरता वाढवत असले तरी, अन्य स्रोतातून वाढलेल्या पुरवठ्याने बाजारात अतिरिक्त साठा निर्माण होईल, अशी शक्यता गोल्डमन सॅक्सने अहवालात व्यक्त केली आहे. गोल्डमन सॅक्सने वर्षभरात पिंपामागे ५६ ते ५२ डॉलर सरासरी किमतीचा अंदाज कायम ठेवला आहे. रारासरी किमतीत जवळपास २० टक्के घट सुचविणारी, २०२० नंतरची तेलाच्या किमतीची ही सर्वात वाईट कामगिरी ठरेल.