नवी दिल्ली : ई-वाहनांना प्रोत्साहनपर ‘फेम-३’ योजनेला अंतिम स्वरूप मिळेपर्यंत या सध्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी ‘ॲक्मा’च्या वार्षिक अधिवेशनात बोलताना सोमवारी दिली.
कुमारस्वामी म्हणाले की, ई-वाहनांचा जलद स्वीकार आणि निर्मिती (फेम) योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला अद्याप अंतिम स्वरूप मिळालेले नाही. यासाठी आणखी काही कालावधी लागेल. सध्याची फेम-२ प्रोत्साहन योजनेची मुदत या महिनाअखेरीस समाप्त होत आहे. त्यामुळे या योजनेला आणखी एक अथवा दोन महिन्यांसाठी मुदतवाढ दिली जाईल. त्यामुळे फेम-३ ची घोषणा होईपर्यंत उद्योगांनी घाबरून जाऊ नये, असे आश्वासनही त्यांनी दिले.
हेही वाचा >>> जयगड, धरमतर बंदरांचा क्षमता विस्तार; ‘जेएसडब्ल्यू इन्फ्रा’ची २,३५९ कोटींच्या गुंतवणुकीची योजना
नेमकी योजना काय?
इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजनेची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली. ही योजना १ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीसाठी होती. तिच्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ही योजना यंदा एप्रिल महिन्यात सुरू झाली. तिला ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. या योजनेत सरकारकडून ई-दुचाकीसाठी प्रत्येकी १० हजार रुपयांपर्यंत आणि ई-तीनचाकीसाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. तसेच, अवजड ई-तीनचाकी वाहनांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे.