scorecardresearch

सेवा क्षेत्राची उत्साही कामगिरी; फेब्रुवारीत तब्बल १२ वर्षांतील उच्चांकी मजल

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात ५९.४ गुणांवर नोंदला गेला.

service sector, performance, February
सेवा क्षेत्राची उत्साही कामगिरी; फेब्रुवारीत तब्बल १२ वर्षांतील उच्चांकी मजल ( संग्रहित छायाचित्र )

पीटीआय, नवी दिल्ली

देशाच्या सेवा क्षेत्राने सरलेल्या फेब्रुवारी महिन्यात १२ वर्षांतील उच्चांकी कामगिरी नोंदवली आहे. नव्याने आलेला कामांचा ओघ आणि सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या नफ्यात झालेली वृद्धी यामुळे ही वाढ झाल्याचे शुक्रवारी जाहीर झालेल्या मासिक सर्वेक्षणातून समोर आले.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणारा ‘एस ॲण्ड पी ग्लोबल इंडिया सर्व्हिसेस पीएमआय’ निर्देशांक फेब्रुवारी महिन्यात ५९.४ गुणांवर नोंदला गेला. या निर्देशांकाने नोंदविलेली ही १२ वर्षांतील उच्चांकी पातळी आहे. जानेवारी महिन्यात हा निर्देशांक ५७.२ गुणांवर होता. फेब्रुवारीमध्ये सलग १९ व्या महिन्यात सेवा क्षेत्राची दमदार वाटचाल सुरू राहिली. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचा निदर्शक मानला जातो.

जानेवारी महिन्यात सेवा क्षेत्राची कामगिरी फारशी चमकदार झालेली नव्हती. फेब्रुवारी महिन्यात मात्र सेवा क्षेत्राने उसळी घेत १२ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठली. मागणीत झालेली सातत्यपूर्ण वाढ आणि स्पर्धात्मक किंमत धोरणामुळे मागील महिन्यात विक्रीत मोठी वाढ नोंदवण्यात आली, अशी माहिती ‘एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी दिली.

रोजगारात मात्र अल्प वाढ

सेवा प्रदात्या कंपन्यांनी फेब्रुवारी महिन्यात नोंदवलेल्या नवीन कामांच्या मागणीत वाढ झाली आहे. स्पर्धात्मक किंमत धोरणामुळे विक्री वाढल्याचे अनेक कंपन्यांनी म्हटल्याचे सर्वेक्षणाने नमूद केले आहे. असे असले तरी सेवा क्षेत्राच्या क्षमतेवर आलेला ताण सौम्य प्रमाणात आहे. त्यामुळे रोजगारांमध्ये अल्प प्रमाणात वाढ झाली आहे. व्यवसायात पुरेसे आत्मविश्वासपूर्ण वातावरण नसल्यामुळे नवीन कामगार भरती कमी आहे, असे सर्वेक्षणाने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त ( Finance ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 09:00 IST
ताज्या बातम्या