नवी दिल्ली : EPS pensioners to get pension from any bank कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेमार्फत (ईपीएफओ) चालवल्या जाणाऱ्या ‘कर्मचारी निवृत्ती वेतन योजना १९९५’ (ईपीएस-९५) अंतर्गत आता निवृत्तिवेतन धारकांना कोणत्याही बँकेतून आणि कोणत्याही शाखेतून त्यांचे नियत निवृत्तिवेतन काढता येणार आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी दिली. केंद्र सरकारने ‘ईपीएस-९५’धारकांसाठी केंद्रीकृत देयक प्रणालीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या प्रस्तावानुसार, राष्ट्रीय पातळीवर केंद्रीकृत प्रणाली स्थापन होणार असल्याने योजनेतील निवृत्तिवेतन धारकांना देशभरातील कोणत्याही बँकेच्या शाखेतून त्यांचे वेतन मिळविता येईल. ही नवीन प्रणाली १ जानेवारी २०२५ पासून कार्यान्वित होणार आहे. हेही वाचा >>> Stock Market Today : ‘निफ्टी’ची १४ सत्रांतील अविरत तेजीनंतर माघार; ‘सेन्सेक्स’मध्ये दोन शतकी घसरण ‘ईपीएफओ’च्या आधुनिकीकरणात कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीकृत निवृत्तिवेतन देयक प्रणालीची मान्यता हा महत्त्वाचा टप्पा आहे. निवृत्तिवेतन मिळवताना ज्येष्ठांना अनेक अडचणींचा तोंड द्यावे लागते. निवृत्ती वेतनधारकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याचा ‘ईपीएस-९५’मधील सुमारे ७८ लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे. याव्यतिरिक्त, नवीन प्रणालीमुळे ‘ईपीएफओ’च्या निवृत्ती वेतन वितरणाचा खर्च लक्षणीय कमी होण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मांडविया हे केंद्रीय कामगारमंत्री या नात्याने ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत. हेही वाचा >>> Gold Silver Price : ऐन सणासुदीत सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण, ग्राहकांना दिलासा; पाहा मुंबई, पुण्यासह ‘या’ शहरांतील नवीन दर नव्या प्रणालीचे फायदे काय? निवृत्तिवेतनधारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना किंवा त्याची बँक किंवा शाखा बदलली तरीही केंद्रीकृत देयक प्रणालीअंतर्गत संपूर्ण देशभरात ‘पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ)’ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता, निवृत्तिवेतनाचे वितरण सुनिश्चित करणे शक्य होणार आहे. निवृत्तीपश्चात गावी गेलेल्या ज्येष्ठांना त्यामुळे नजीकच्या बँक शाखेतून मासिक निवृत्तिवेतन मिळविण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे.